सिडको ( प्रतिनिधी) : मागील दोन गुरूवारी झालेल्या हत्याकांडानंतर या गुरूवारी देखील आणखी एक हत्या झाल्याची घटना सिडको परिसरात घडली आहे. गुरुवारचे हे हत्याकांड थांबण्यास काही तयार होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून गुंडांची दहशत थांबावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.व्यसनाधीन तरुणाईला गुन्हेगारीकडे आकर्षित करून आपले इप्सीत साधणारे गल्लीतील तथा कथित पुढाऱ्यांच्या मुसक्या बांधल्याशिवाय ही गुन्हेगारी थांबणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.
शहर परिसरात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून पोलिसांचा वचक कमी झाला आहे. शहरातील सिडको परिसरात गुरुवारी भरदिवसा एका भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. तब्बल ६ ते ७ हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हा हल्ला केला. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, याप्रकरणी नाशिक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
शिवाजी चौक शॉपींग सेंटर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी दुपारी पावणेचार वाजेच्या दरम्यान दोन दुचाकीवर आलेल्या सहा ते सात जणांच्या टोळक्याने एका भाजी विक्रेत्याच्या पोटात,मानेवर,छातीत व डोक्यात धारदार शस्त्राने गंभीर स्वरूपाचे वार करत ठार केल्याची घटना घडली.,गुरुवारी दुपारी पावणे चार वाजेच्या दरम्यान संदीप आठवले (२२) हा त्याच्या भावासह शॉपिंग सेंटर येथे जात असतांना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या सहा ते सात जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने संदीप वर गंभीर स्वरूपाचे तब्बल २५ वार केले. या घटनेत संदीप जागीच कोसळला. गंभीर दुखापतीमळे संदीपचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या समवेत अधिकारी व कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिसांचा मोठा फौजफाटा शॉपिंग सेंटर येथे तैनात करण्यात आला. यासोबतच मयत संदीप याचे नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात देखील मोठा फौजफाटा तैनात केला. मयत संदिपच्या पश्चात आई वडील बहीण भाऊ परिवार आहे . दरम्यान या हत्या प्रकरणी काही संशयितांची नावे निष्पन्न झाले असून त्यांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली आहेत.
खुनाच्या घटनेतील ५ संशयितांना अटक – संदीप आठवले या युवकाच्या खून प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित ओम प्रकाश पवार उर्फ मोठ्या खटकी, ओम चौधरी उर्फ छोटा खटकी, साईनाथ गणेश मोरताटे उर्फ मॅगी मो-या, अनिल प्रजापती व एका विधी संघर्षितास अटक करण्यात आली आहे. तर आणखी एक आरोपी फरार असून तपास सुरू आहे.