बुद्धिबळ विश्वचषक २०२३ स्पर्धेमध्ये कार्लसनची विजेतेपदावर मोहोर
गेले दोन दिवस दोन्ही गेममध्ये बरोबरी झाल्याने निर्णयाला हुलकावणी देणाऱ्या बुद्धिबळ विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा निकाल गुरुवारी टायब्रेकरमध्ये लागला आणि प्रज्ञानंदच्या जेतेपदाचे स्वप्न अखेर धुळीस मिळाले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने भारताच्या युवा प्रज्ञानंदचा टायब्रेकरच्या सामन्यात १.५-०.५ असा पराभव करत जेतेपदाचा चषक उंचावला.
टायब्रेकरचा पहिला रॅपिड गेम नॉर्वेच्या कार्लसनने ४७ चालींनंतर जिंकला. दुसरा गेम ड्रॉ झाला. त्यामुळे कार्लसनने विजेतेपद पटकावले. यापूर्वी मंगळवारी आणि बुधवारी झालेले दोन्ही गेम ड्रॉ झाले. प्रज्ञानंदने कार्लसनला जेतेपदासाठी चांगलेच झुंजवले.
प्रज्ञानंदने जर अंतिम सामना जिंकला असता, तर तब्बल २१ वर्षांनी भारताच्या शिरपेचात जेतेपदाचा तुरा खोवला असता. याआधी विश्वनाथ आनंदने २००२मध्ये बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तब्बल २१ वर्षे कोणत्याही भारतीय खेळाडूला जेतेपदावर मोहोर उमटवता आली नव्हती. प्रज्ञानंद ही कोंडी फोडणार अशी अपेक्षा होती. परंतु गुरुवारी टायब्रेकरमध्ये झालेल्या पराभवामुळे विजेतेपद पटकावण्याची भारताची संधी हुकली.
अंतिम सामन्यातील टायब्रेकरमधील पहिला रॅपिड गेममध्ये कार्लसनने काळ्या रंगातील प्याद्यांसह खेळायला सुरुवात केली. कार्लसनने ४७ चालींमध्ये हा गेम जिंकला. त्याने पहिल्या गेमनंतर टायब्रेकरमध्ये १-० असी आघाडी घेतली. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी प्रज्ञानंदला दुसरा गेम जिंकणे अनिवार्य होते. त्यामुळे त्याच्यावर दुसरा गेम जिंकण्याचा दबाव होता. मात्र हा गेम २२ चालींनंतर अनिर्णित घोषित करण्यात आला.
अंतिम फेरीत मंगळवारी झालेल्या पहिल्या गेममध्ये प्रज्ञानंदने काळ्या प्याद्यांसह खेळाला सुरुवात केली. हा गेम बरोबरीत सुटला. ३५ चालींनंतर हा सामना ड्रॉ घोषिक करण्यात आला. पहिल्या गेम बरोबरीत सुटल्यानंतर बुधवारी दुसऱ्या गेममध्ये प्याद्यांच्या रंगांची अदलाबदल झाली. यावेळी कार्लसन पांढऱ्या आणि प्रज्ञानंद काळ्या प्याद्यांसह मैदानात उतरले. हा गेम ९० मिनिटे चालला आणि ३० चालींनंतर अनिर्णित घोषित करण्यात आला.