
मुंबई: देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (rain) कोसळत आहे. खासकरून उत्तर भारतात (north india) पावसाची तीव्रता वाढली आहे. डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना राज्यात मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय. राज्याच्या विविध भागांतून पाऊस गायबच झालाय. मात्र यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
भारताच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या पुढील काही दिवसांतही राज्यात पावसाचा जोर वाढणार नाही. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस कोणत्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाही. मुंबई, पुणेसह कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रच्या काही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात हवामान विभागाने दोन आठवड्याच्या अंतराने मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. आयएमडीने म्हटले की उत्तर पूर्व बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता होती. मात्र यामुळे पावसाचा जोर वाढण्यास मदत झाली नाही. दरम्यान, राज्यभरात पावसाचे ढग पाहायला मिळाले आणि हलका पाऊसही झाला.
राज्यात ऑगस्ट महिना कोरडाच राहिला. दरम्यान, ५८ टक्के पावसाचे प्रमाण घटले. राज्यात सामान्यपणे २०७.१ मिमीच्या तुलनेत या महिन्यात केवळ ८६.४ मिमी पाऊस झाला. तर ऑगस्टच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सामान्यपणे २०९.८ मिमीच्या तुलनेत ६५ टक्क्यांची घट पाहायला मिळाली.
जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. याच मुळे मान्सूनच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत राज्यात केवळ ७ टक्के पावसाची कमतरता आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सामान्य ७४१.१० मिमीच्या तुलनेत ६९२.७० मिमी पाऊश झाला आहे. मात्र जुलैनंतर पावसाला ब्रेक लागला. यामुळे याचा परिणाम पाणी साठ्यावर पाहायला मिळत आहे.