
आपल्या शेवटच्या क्षणांत का एकटे होते रविंद्र महाजनी?
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं साधारण महिनाभरापूर्वी अत्यंत दुर्दैवी पद्धतीने निधन झालं. त्यांच्या राहत्या खोलीत त्यांचा मृतदेह निधनानंतर तीन दिवसांनी सापडला, परंतु तोपर्यंत कोणालाच याची खबर नव्हती. या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असला तरी या गोष्टीमुळे त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) याला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं. वडिलांचं अशा पद्धतीने निधन होणं आणि गश्मीरचं त्या ठिकाणी नसणं याबद्दल त्याला दोष देण्यात आला. यावर गश्मीरने लगेच काही प्रतिक्रिया देणे टाळले होते. आता मात्र त्याने याबाबत खुलासा केला आहे.
वडील रविंद्र महाजनी वेगळे का राहायचे याविषयी गश्मीर म्हणाला, "मी माझ्या वडिलांना एका छोट्या घरात सोडले आणि मी लक्झरी आयुष्य जगत आहे, असं अनेकांना वाटत होतं पण तसं नव्हतं. त्यांनी स्वतःच २० वर्षांपूर्वी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. एक कुटुंब म्हणून आम्ही काहीही करू शकलो नाही. आम्ही त्यांचं वेगळं होणं स्वीकारलं कारण कोणावरही कुणासोबत राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. त्यांना पाहिजे तेव्हा ते आमच्याकडे राहायला यायचे, आणि त्यांची इच्छा झाली की निघून जायचे.
पुढे गश्मीर म्हणाला, माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते बराच काळ आमच्यासोबत राहिले होते. ते मूडी होते अन् स्वतःची कामे स्वत: करत असत. या कारणास्तव, जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी केअर टेकरची नियुक्ती करायचो तेव्हा ते एक-दोन दिवसांत त्याला कामावरुन काढून टाकत असत.
आम्हाला त्यांच्या मृत्यूबद्दल उशीरा कळलं कारण...
गश्मीर पुढे म्हणतो, गेल्या तीन वर्षांत बाबांनी स्वतःला सगळ्यांपासून, अगदी त्यांच्या कुटुंबापासूनही दूर केलं. शेजाऱ्यांशी बोलणं किंवा मित्रांसोबत मॉर्निंग वॉक करणं सुद्धा त्यांनी बंद केलं. आम्हाला त्यांच्या मृत्यूची माहिती उशिरा कळण्याचे हे देखील एक मोठे कारण होते. मला यापेक्षा अधिक काही स्पष्ट करायचे नाही, कारण मी जे काही बोललो त्याचा गैरसमज होईल. पण आता मी समाधानी आहे.
...मला 'एवढेच' लक्षात ठेवायचे आहे
वडिलांसोबतच्या नात्याबद्दल बोलताना गश्मीर म्हणाला, 'आमच्या कुटुंबात अनेक कारणं होती, ज्यामुळे नातं खराब होतं. पण ते माझ्या आईचे पती आणि माझे वडील होते. अनेक वैयक्तिक सखोल कौटुंबिक रहस्ये सार्वजनिकपणे उघड करु शकत नाही. माझे बाबा इंडस्ट्रीतील सर्वात देखण्या अभिनेत्यांपैकी एक होते. ते खूप सुंदर हसायचे. आणि मला एवढेच लक्षात ठेवायचे आहे.