काव्य, भाषासौष्ठव, दृष्टान्त, रसाळता आणि तत्त्वचिंतन या सर्वच भूमिकांतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी लोकजीवनात शिखरावर जाऊन बसला आहे. कल्पनाशक्तीची उदारता, शब्दांची समृद्धी, विचारांची श्रीमंती आणि रचनेची स्वाभाविकता व सहजता या काव्यगुणांमुळे ज्ञानदेवांनी शास्त्र सिद्धान्तालाच काव्यातून गुंफले आहे, हे ज्ञानेश्वरीचे वेगळेपण आहे आणि त्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’ मनाचं समाधान करणारी ठरते.
महर्षी व्यासांच्या प्रतिभेतून साकारलेलं भगवद्गीतेत तत्त्वज्ञान! ते अत्यंत उपयोगी, अलौकिक! जगण्याला दिशा देणारं! ते माऊलींनी मराठीत आणलं ‘ज्ञानेश्वरी’तून. त्यांची प्रतिज्ञा अशी की, ‘माझे बोल निव्वळ मराठीत आहेत खरे; परंतु ते प्रतिज्ञेने अमृतालाही सहज जिंकतील अशा गोड अक्षर-रचनेने मी सांगेन.’
‘माझा मर्हाठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके।
ऐशीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥’ अध्याय ६- ओवी क्र. १४
ही प्रतिज्ञा त्यांनी सार्थ केली. संपूर्ण ज्ञानेश्वरी अमृतमय झाली. यातील दुसऱ्या अध्यायातील अवीट गोडीचा आनंद देणाऱ्या काही ओव्या आता पाहू.
रणांगणात समोर गुरू, आपले सगेसोयरे पाहून अर्जुन व्याकुळ झाला. यांच्यावर वार कसा करू? म्हणून त्याचं मन आक्रंदन करू लागलं. तो युद्धातून माघार घेऊ लागला. त्याचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात –
‘ज्याप्रमाणे सूर्य ढगांनी झाकला जातो, त्याप्रमाणे अर्जुन यावेळी भ्रमाने झाकोळून गेला.
‘मग देखा तेथ फाल्गुनू।
घेतला असे भ्रांती कवळूनु।
जैसा घनपडळीं भानू। आच्छादिजे॥’ ओवी क्र. ७५
‘फाल्गुन’ म्हणजे ‘अर्जुन’ होय. अर्जुनासाठी ज्ञानदेव इतकी विविध, अर्थपूर्ण संबोधनं वापरतात की तो एक खास लेखाचा विषय होईल. असो. ‘भ्रांती कवळुनु’चा अर्थ आहे ‘भ्रमाने व्यापलेला’. अर्जुनाच्या मनःस्थितीचं हे अचूक वर्णन!
अर्जुन हा खरं तर सूर्यासारखा तेजस्वी, महापराक्रमी असा योद्धा, पण सूर्य ढगांनी झाकून जावा त्याप्रमाणे अर्जुन भ्रमाने भरून गेला. हा भ्रम कोणता? तर ‘मी’ म्हणजे माझं शरीर होय. मी नातेवाइकांना मारणारा आहे. ते मरणारे आहेत.
अर्जुनाचं हे अज्ञान, हा मोह दूर करण्यासाठी श्रीकृष्ण सिद्ध झाले आहेत. ते वर्णन करताना ज्ञानदेवांची लेखणी किती रसमय होते ते पाहा!
अर्जुन म्हणजे जणू वणवा पेटलेला पर्वत! हा वणवा भ्रांतीचा, अज्ञानाचा!
अर्जुनाच्या मनातील भ्रांतीचे ढग दूर करणारा महामेघ म्हणजे श्रीकृष्ण! श्रीकृष्णांचे गंभीर भाषण म्हणजे या मेघाची जणू गर्जना!
‘असा तो श्रीभगवानरूप उदार मेघ आता कसा वर्षाव करेल आणि त्या वर्षावाने अर्जुनरूप पर्वत कसा शांत होईल. मग त्याला ज्ञानाचा नवा अंकुर कसा फुटेल. ती कथा मनाच्या समाधानासाठी ऐका’
असे निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले.
‘आतां तो उदार कैसा वर्षेल।
तेणें अर्जुनाचळु निवेल।
मग नवी विरुंढी फुटेल।
उन्मेषाची॥’ ओवी क्र. ७९
‘अर्जुनाचळु’ यात, अर्जुन आणि अचळु असे शब्द आहेत. ‘अ चळु’ म्हणजे ‘न हलणारा’ अर्थात पर्वत होय. अर्जुन हा जणू वणवा लागलेला पर्वत. ‘कसं लढू’ ह्या अज्ञानाची आग अर्जुनाच्या मनात! त्याची घायाळ अवस्था, मनातील दाह या कल्पनेतून कळते. या वणव्याला, तापलेल्या अर्जुनाला आपल्या कृपावर्षावाने शांत करणारे श्रीकृष्ण! ते ‘उदार मेघ’ होय. त्यांच्या उपदेशाने, वर्षावाने अर्जुनाची आग-अज्ञान विझेल. इतकंच नव्हे तर त्याला ज्ञानाचा (उन्मेषाचा) अंकुर फुटेल. काय बहार आहे या संपूर्ण दाखल्यात! ‘अशी ही कथा मनाच्या समाधानासाठी ऐका’ ‘ते कथा आइका। मनाचिया आराणुका। ज्ञानदेव म्हणे देखा। निवृत्तिदास॥ ओवी क्र. ८० ह्या कथेने अर्जुनाच्या मनावरचं मळभ मावळलं, त्याला स्व-रूपाची खरी ओळख झाली. अशी ही कथा ऐकल्याने श्रोत्यांच्याही मनात ज्ञानाचा अंकुर फुटेल. त्यांचं समाधान होईल ही खात्री जणू ‘निवृत्तिदास ज्ञानदेव’ यातून देत आहेत.
(manisharaorane196@gmail.com)
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…