मुंबई : इस्त्रोची चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली. भारताच्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग केले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. आता लवकरच इस्रोचे हे यश मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी मिशन मंगलचे दिग्दर्शक जगन शक्ती यांनी चांद्रयान-३ वर आता चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे.
जगन शक्ती हे हा ऐतिहासिक क्षण मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी सज्ज आहेत. शक्ती यांनी मिशन मंगलच्या टीमसोबत हा चित्रपट बनवणार असल्याची पुष्टी केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जगन शक्ती यांनी सांगितले की, “आम्ही ही संधी जाऊ देणार नाही. मी आता या विषयावर थोडा विचार करतोय. माझी मोठी बहीण इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहे. या चित्रपटासाठी माझ्या मोठ्या बहिणीकडून काही माहिती घेत आहे.”
पुढे ते म्हणाले की, चांद्रयान ३ वर बनवल्या जाणार्या चित्रपटात ‘मिशन मंगल’मध्ये काम करणाऱ्या टीमलाच घ्यायचे आहे. मात्र या चित्रपटात अक्षय कुमार असेल का याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही.
त्यांनी सांगितले की, या मोहिमेच्या यशानंतर लगेचच त्यांनी चित्रपट बनविण्याचा विचार सुरू केला आहे. मिशन मंगल बनवण्याचे काम सुरू झाले तेव्हा देखील त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची मदत घेतली होती. या चित्रपटात अक्षय मुख्य भूमिकेत होता.
मिशन मंगलमध्ये अक्षय कुमारसह विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी, नीती मेनन आणि शर्मन जोशी यांसारखे कलाकार होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्याने जगभरात सुमारे २९० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. मागील चित्रपटाचा अनुभव आणि चांद्रयान ३ ची क्रेझ यामुळे जगन शक्ती ही आता मिळालेली नामी संधी सोडणार नाहीत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra