ऐझॉल : मिझोरामची (Mizoram) राजधानी ऐझॉलजवळ (Aizawl) निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळल्याने (Railway Bridge Collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १७ मजुरांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अजूनही ३० ते ४० मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
हा पूल दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा उंच आहे. या पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर मिझोराम देशाच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
ऐझॉलजवळील सायरंग येथे बांधकामाधीन रेल्वे ओव्हरब्रिज बुधवारी कोसळून किमान १७ कामगारांचा मृत्यू झाला, असे मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर सांगितले.
“निर्माणाधीन, ऐझॉल जवळ सैरंग येथे रेल्वे ओव्हरब्रिज आज कोसळला; किमान १७ कामगारांचा मृत्यू झाला. बचावकार्य सुरू आहे,” झोरामथांगा यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर सांगितले.
Under construction railway over bridge at Sairang, near Aizawl collapsed today; atleast 17 workers died: Rescue under progress.
Deeply saddened and affected by this tragedy. I extend my deepest condolences to all the bereaved families and wishing a speedy recovery to the… pic.twitter.com/IbmjtHSPT7
— Zoramthanga (@ZoramthangaCM) August 23, 2023
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांना या दुर्घटनेने खूप दु:ख झाले आहे आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी इच्छा व्यक्त करताना सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच बचाव कार्यात मदत करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पूल दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
“मिझोराममधील पुलाच्या दुर्घटनेमुळे दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल शोक. जखमी लवकर बरे होवोत. बचाव कार्य सुरू आहे, आणि बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे,” असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
एका ट्विटमध्ये, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मृतांपैकी काही त्यांच्या राज्यातील मालदा जिल्ह्यातील आहेत.
“मी माझ्या मुख्य सचिवांना मिझोराम प्रशासनाशी त्वरित बचाव आणि मदत कार्यासाठी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. मालदा जिल्हा प्रशासनाला सर्व शक्य मदत करण्यासाठी शोकग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास सांगण्यात आले आहे,” असे त्या म्हणाल्या. बॅनर्जी यांनी पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.