इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर
काँग्रेस पक्षाने देशावर साठ दशकांहून अधिक काळ सत्ता उपभोगली. पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी असे एकाच परिवाराने तीन पंतप्रधान देशाला दिले. लाल बहादूर शास्त्री, नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग असे गांधी परिवाराच्या बाहेरील काँग्रेस पक्षाच्या मोजक्याच नेत्यांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली.
परिवाराच्या बाहेरील काँग्रेसचा पंतप्रधान झाला तरी सत्ताकेंद्री गांधी परिवारच कायम राहिले आहे. म्हणूनच नेहरू-गांधी परिवारातील नेत्यांचीच सर्वाधिक नावे देशातील सार्वजनिक संस्थांना आणि शासकीय योजनांना दिली गेली आहेत. राजधानी दिल्लीत नेहरू मेमोरिअल प्रसिद्ध आहे. देशाच्या पंतप्रधानांना मिळालेल्या भेट वस्तूंचे हे संग्रहालय आहे. देशात विविध पक्षांचे अनेक पंतप्रधान झाले, मग या संग्रहालयाला केवळ पंडित जवाहरलाल नेहरू यांचेच नाव का? असा कोणी विचारही केला नाही. अनेकांना नेहरूंचे नाव इतके वर्षे खटकत होते. पण त्यावर उघडपणे कोणी बोलत नव्हते. काँग्रेसव्यतिरिक्त मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंग, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी आणि आता गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पण त्यांचे नाव संग्रहालयाला द्यावे असे कोणी म्हटले नाही. सार्वजनिक संस्था व शासकीय योजना नेहरू-गांधी परिवाराच्या नावानेच चालल्या पाहिजेत, देशाचे कर्तेकरविते केवळ नेहरू-गांधी परिवारच आहे, असे काँग्रेस हायकमांडला वाटत असावे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धाडस दाखवले व नेहरू संग्रहालयाचे नाव प्रधानमंत्री (पंतप्रधान) संग्रहालय असे करून दाखवले. नेहरूंचे नाव हटवून प्रधानमंत्री संग्रहालय असे नामकरण झाल्यावर गांधी परिवार व त्यांच्याशी जोडलेला काँग्रेस नेत्यांचा परिवार अस्वस्थ व संतप्त झाला. मोदी हे द्वेषाचे राजकारण करीत आहेत, असा आरोप झाला.
केंद्र सरकारने यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशीच म्हणजे १४ ऑगस्ट रोजी दिल्लीतील नेहरू मेमोरिअलचे नामांतर प्रधानमंत्री संग्रहालय असे केले. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटले, पंडित नेहरूंची ओळख ही त्यांचे कार्य आहे, त्यांचे नाव नाही… नेहरू मेमोरिअल हा फलक हटवून प्रधानमंत्री संग्रहालय असा नवा फलक झळकल्यावर काँग्रेस पक्षातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले, आम्ही सर्वच माजी पंतप्रधानांचा आदर करतो, ते कुठल्याही पक्षांचे असले तरी आम्ही त्यात भेदभाव करीत नाही. प्रधानमंत्री संग्रहालय असे नामांतर केल्यामुळे काँग्रेस विनाकारण राजकीय मुद्दा बनवत आहे. प्रधानमंत्री नाव देण्यात काँग्रेसला काय समस्या वाटते हे मला समजत नाही?
दि. १४ ऑगस्टला नेहरू मेमोरिअल हे नाव हटवून प्रधानमंत्री संग्रहालय हा नवा फलक लागला तरी नामांतराचा निर्णय याच वर्षी दि. १५ जून रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला होता. ज्या वास्तुत प्रधानमंत्री संग्रहालय आहे, ती वास्तू म्हणजेच दिल्लीतील प्रसिद्ध तीन मूर्ती भवन, ब्रिटिश काळात १९२९-३० मध्ये उभारण्यात आले होते. त्यावेळी कमांडर इन चीफ यांचे ते निवासस्थान होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हीच वास्तू पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान झाले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही नेहरू मेमोरिअलच्या नामांतरावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ज्यांच्याकडे इतिहास नाही, ते दुसऱ्याचा इतिहास मिटविण्याचे काम करीत आहेत. स्मारकाचे नाव बदलून आधुनिक भारताचे निर्माते व लोकशाहीचे समर्थक पं. नेहरू यांचे व्यक्तिमत्त्व संकुचित करता येणार नाही. नामांतरातून सत्ताधारी पक्षांची मानसिकता दिसून येते.
सन २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांना समर्पित असे संग्रहालय असावे असे बोलून दाखवले होते. काँग्रेसचा विरोध डावलून नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी उभी केली व २१ एप्रिल २०२२ रोजी त्याचे उद्घाटनही केले. एडविन लुटियन्स यांनी राजधानीत १९२९-३० मध्ये तीन मूर्ती भवन उभारले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू याच वास्तुत १६ वर्षे राहिले. नेहरूंचे २७ मार्च १९६४ रोजी निधन झाले. नेहरूंच्या निधनानंतर तत्कालीन सरकारने तीन मूर्ती भवन नेहरूंना समर्पित करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्या वास्तुत एक संग्रहालय व एक पुस्तकालय उभारण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला.
दि. १४ नोव्हेंबर १९६४ रोजी पंडित नेहरूंच्या ७५व्या जयंतीला तत्कालीन राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांनी तीन मूर्ती भवन राष्ट्राला समर्पित केले व नेहरू स्मारक संग्रहालयाचे उद्घाटन केले. दोन वर्षांनंतर स्मारकाची देखभाल व व्यवस्थापन यासाठी एनएमएमएल सोसायटीची स्थापना केली व तेव्हापासून ही व्यवस्था कायम आहे. आता या सोसायटीचे अध्यक्ष पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी हेच आहेत. सोसायटीवर २९ सदस्य असून त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी, अनुराग ठाकूर आदींचा समावेश आहे.
नेहरू मेमोरिअलचे नामांतर झाल्यानंतर अन्य विरोधी पक्ष शांत राहिले, मात्र काँग्रेस पक्षाने आपल्यावर फार मोठा अन्याय झाला असा आक्रोश सुरू केला. नेहरूंचा वारसा मोदी सरकारला संपुष्टात आणायचा आहे, अशी टीका काँग्रेसने केली. काँग्रेसने म्हटले की, पंडित नेहरूंनी अाधुनिक भारताचा पाया रचला. त्यांनी आयआयएम, एम्स, आयआयटी, इस्त्रो, अशा अनेक संस्था उभ्या केल्या. या देशातील लोकशाही जिवंत ठेवली. पण मोदी सरकार नकारात्मक स्वरूपात इतिहास दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.
देशात पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा नेहरू-गांधी परिवाराच्या नावाने साडेचारशेहून अधिक प्रकल्प व योजना अस्तित्वात आहेत. पाँडेचेरी, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पोर्ट ब्लेअर, तेलंगणा, छत्तीसगड, तामिळनाडू, बिहार, दिव-दमण, दिल्ली, गोवा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम अशा बहुतेक सर्व राज्यांत नेहरू यांचे नाव असलेली वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये. तंत्रज्ञान विद्यापीठे, महाविद्यालये, बिझनेस मॅनेजमेंट संस्था, नवोदय विद्यालये, असा मोठा शैक्षणिक संस्थांचा पसारा आहे. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय, अहमदनगर येथे जवाहर नवोदय विद्यालय, गोव्यात जवाहर नवोदय विद्यालय आहे. देशात सर्वत्र असलेल्या नवोदय विद्यालयांना जवाहर नेहरू यांचेच नाव आहे.
दिल्ली, बुराणपूर, गुवाहटी, कोइम्बतूर, त्रिशूर, हैदराबाद, उदयपूर, जयपूर, कोयनानगर, बोकोरो आदी ठिकाणी नेहरूंच्या नावाने मोठी उद्याने (पार्क) आहेत. जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन हे नाव केंद्र सरकारच्या योजनेला आहे. नेहरू कप (क्रिकेट), नेहरू कप (फुटबॉल), नेहरू ट्रॉफी बोट रेस या नावाने स्पर्धा आहेत. चेन्नई, कोईम्बतूर, दिल्ली, कोची, शिल्लाँग, गजियाबाद, तिरुचिरापल्ली, दुर्गापूर, गुवाहटी, हुबळी, पुणे, इंदूर, कोट्यायम, शिमोगा टुमकूर या शहरांत जवाहरलाल नेहरू स्टेडियम आहेत. याखेरीज जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने चौक, सर्कल, कला केंद्र, प्लॅनेटोरियम, जलाशये, सेतू, बोगदे, रस्ते, तेल शुद्धीकरण प्रकल्प, पूल, फाऊंडेशन, नेहरू प्लेस, सायन्स सेंटर, बस स्थानके बहुसंख्य शहरांत व गावागावांत आहेत. देशात सर्वत्र इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नावाने असलेल्या संस्था, शाळा-कॉलेजेस, पुरस्कार, पारितोषिके, क्रीडा संकुल, घरकुल योजना, खुली विद्यापीठे, कन्या विद्यालये, इस्पितळे, आवास योजना, अणुसंशोधन केंद्र, उपाहारगृहे, झोपडपट्ट्या, मैदाने, विद्यापीठे, क्रीडा स्पर्धा, महिला व बाल चिकित्सालये, मूकबधिर विद्यालये, साखर कारखाने, महिला बँका, अभयारण्य, पार्क, बगीचे, विकास संशोधन संस्था, ग्रंथालये, गोदी, विमानतळ अशी भली मोठी यादी देता येईल. पण नेहरू मेमोरिअलमध्ये देशाच्या सर्व पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा संग्रह असताना केवळ एकाच पंतप्रधानांचे नाव कशासाठी असा विचार मोदी सरकारने केला, तर त्यात काय चुकले? शेकडो नावांच्या यादीतून परिवाराचे एक नाव पुसले गेले म्हणून काँग्रेसने आक्रोश करणे हे निव्वळ राजकारण आहे.
[email protected]
[email protected]