
डबलिन: भारत (india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना आज रंगणार होता. मात्र सुरूवातीपासूनच पावसाने खोडा घातला.
पावसामुळे टॉस उशिराने होणार असे सांगण्यात आले मात्र पाऊस काही थांबण्यास तयार नव्हता. अखेर दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला आहे. भारताने या मालिकेतील दोन सामने आधीच खिशात घातले आहेत. त्यामुळे भारताने तीन सामन्यांची ही मालिका २-० अशी जिंकली आहे.
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंडमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत मालिकेत विजय मिळवले होते.
आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. तो सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी जिंकला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारताने १८६ धावांचे आव्हान आयर्लंडसमोर दिले होते मात्र आयर्लंडने झुंज देत १५२ धावा केल्या.