Friday, November 8, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यउच्चशिक्षित, सुशिक्षित महिला आणि अशिक्षित सासर... बसत नाहीये मेळ....

उच्चशिक्षित, सुशिक्षित महिला आणि अशिक्षित सासर… बसत नाहीये मेळ….

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

लग्नासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकाला, अथवा लग्न झाल्यावर पण पती-पत्नीला आपला जोडीदार सुशिक्षित, उच्चशिक्षित, स्मार्ट, अॅक्टिव्ह, सर्वगुणसंपन्न असाच हवा असतो. लग्न जमवताना प्रत्येक जण मुला-मुलींच्या डिगऱ्या, शैक्षणिक पात्रता, नोकरी-व्यवसाय करण्याची कुवत, त्यातून मिळणारे उत्पन्न यांसारख्या गोष्टी पडताळून घेतात. खरं तर आपल्या समाजात लग्न ठरण्याच्या प्रक्रियेत फक्त मुलाचं आणि मुलीचं शिक्षण पाहिलं जातं आणि दोघांच्याच संदर्भातील इतर बाबी जुळवून लग्न लावलं जातं. यावेळी मुलींच्या सासरी असणारी इतर माणसं, त्यांचं बौद्धिक अथवा शिक्षण, त्यांची हुशारी, व्यक्तिमत्त्व, विचारसरणी आपण बारकाईने लक्षात घेत नाही. पण जेव्हा अत्यंत शिकलेली मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिच्या सासरी असणारा तिचा नवरा सोडला, तर इतर कोणीही नातेवाईक फारसे शिकलेले अथवा शाळा-कॉलेजचं तोंड न पाहिलेले असतील, अशिक्षित असतील तर मात्र तिला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असे. असे आजकालचे सामाजिक चित्र आहे.

कोणत्याही स्त्रीच्या लग्नानंतर जास्तीत जास्त संपर्कात येणारे सासू, सासरे, दीर, जावा, नणंदा अथवा इतर जवळचे नातेवाईक हे जर अशिक्षित अथवा कमी शिकलेले असतील, तर प्रचंड मोठी वैचारिक तफावत लग्न होऊन आलेल्या मुलीत आणि सासरच्या लोकांमध्ये आढळते. कारण फक्त नवरा बायकोच्या बरोबरीने शिकलेला असतो. प्रपंच करताना कोणत्याही स्त्रीला नवऱ्या व्यतिरिक्त पण दररोजच्या दैनंदिन कामात, व्यवहारात घरात वावरताना इतरांशी जमवून घ्यायचे असते. छोट्या छोट्या घरगुती गोष्टी, घरातलं वळण, निर्णय, सवयी, वागणूक, दिनचर्या यांमध्ये लहानपणापासून चांगलं शिक्षण घेत आलेली मुलगी आणि अजिबात न शिकले-सावरलेले सासरचे लोक यांच्यात कमालीचा फरक असतो. कोणत्याही परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समस्येवर करावयाची उपाययोजना, स्वभाव, आपलं वागणं-बोलणं, भाषाशैली हे सर्व आपल्या शैक्षणिक कुवतीनुसार घडत असतं.

दैनंदिन आयुष्य जगताना, रोज घरातल्या लोकांशी विविध कामानिमित्त, स्वयंपाकानिमित्त, खरेदी करताना, खर्च करताना, संपर्क साधताना अथवा नोकरी-उद्योग सांभाळून घरातील कामे हाताळतांना, घर सांभाळतांना, मुलांचं संगोपन करताना सुशिक्षित महिलांना सासरच्या अडाणी अथवा अशिक्षित मनोवृत्तीच्या लोकांमुळे अनेक प्रकारच्या मानसिक यातनांना सामोरे जावे लागते. मुळात या महिलेचं शिक्षण काय, तिची बौद्धिक पात्रता काय किंवा बाहेर किती मोठ्या आघाड्यांवर ती काय कर्तृत्व गाजवते याचा मागमूस पण घरातील, नात्यातील अनेक लोकांना नसतो. समाजात आपल्या घरातील सुनेला काय स्थान आहे, तिची काय प्रतिमा आहे याबाबत हे लोक पूर्णतः अनभिन्य असतात. त्यामुळे ते त्यांच्याच पद्धतीने, त्यांच्याच सवयीने, त्यांच्याच विचारशैलीने सुनेशी वागताना दिसतात. मोठमोठ्या डिगऱ्या घेतलेली, आत्मविश्वासाने नोकरी-व्यवसाय करणारी, गावोगावी टूर्सनिम्मित एकटी फिरणारी, चांगलं उत्पन्न घरात आणणारी, बाहेरील जगात नावलौकिक कामावणारी, सर्व आघाड्यांवर धावपळ करू शकणारी, आपल्याच घरातील कर्तबगार महिला असून सुद्धा केवळ अडाणीपणामुळे तिची किंमत अथवा तिचा मानसन्मान राखणे अनेकांना जमत नाही. अशा कुचक्या आणि खवचट स्वभावाच्या लोकांमुळे घरात सातत्याने खटके उडतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात आणि कौटुंबिक वातावरण बिघडत राहाते.

बायकोने यातील काही समस्या नवऱ्याला सांगाव्यात, तर त्याची अपेक्षा असते मला माझं काम आहे, मला माझी टेन्शन आहेत, बायकांच्या भानगडीत मला पाडू नका. नवरा देखील पत्नीला हेच समजावून सांगतो की, घरातले अडाणी आहेत पण तू तर शिकलेली आहेस ना, मग तू समजावून घे, जुळवून घे अथवा दुर्लक्ष कर आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. अगदीच समजुदार नवरा असेल, तर एक- दोन वेळा मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील करतो, दोन्ही बाजूंना समतोल राखायचा प्रयत्न करतो. पण त्याचा परिणाम काही फार कालावधीसाठी टिकत नाही. नवऱ्याला दोन्ही नाती सांभाळायची असल्यामुळे त्यालाही तारेवरची कसरत करणं
कठीण जातं.

समुपदेशनला आलेल्या जास्तीत जास्त सुशिक्षित महिलांना घरातील कमी शिकलेल्या अथवा बौद्धिक पातळी कमी असलेल्या लोकांसोबत जुळवून घेताना त्रास होत असल्याचे लक्षात येते. बाहेर आम्ही कोण आहोत, काय आहोत याला आमच्या घरात काहीच किंमत नाही, पण घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून आम्हाला सतत कुरकुर केली जाते, टोमणे मारले जातात, आम्हाला कौतुक तर मिळत नाहीच, पण सतत चुका शोधून काढून बोललं जातं, सतत आमच्या शिक्षणाचा उद्धार केला जातोय, उलट आम्ही शिकलोय पण आम्हाला अक्कल नाही, शिकेल तितके हुकेल, व्यावहारिक ज्ञान नाही, जगाचा अनुभव नाही, असं एकवलं जातंय, आमचा पदोपदी अपमान केला जातोय, आम्हाला घरातील कामावरून, वैयक्तिक सवयीवरून, आमच्या राहण्याच्या, वागण्या-बोलण्याच्या पद्धतीवरून, आमच्या रुटीनवरून, सतत भुणभुण केली जाते अशा तक्रारी सातत्याने येत असतात. आमच्या छोट्या छोट्या चुकांचे पण अवडंबर केले जातेय, आम्हाला सतत हिणवलं जातंय असं आगतिक होऊन चांगल्या उच्चशिक्षित महिला बोलत असतात.

सीमा (काल्पनिक नाव) केवळ या त्रासाला कंटाळून घटस्फोट घेण्याच्या विचारापर्यंत आलेली उच्चशिक्षित, विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात नावलौकिक असलेली वकिली करणारी महिला. लग्नाला पंधरा वर्षे होऊन दहा वर्षांचा एकुलता एक हुशार मुलगा असून नवरा पण अतिशय शिकलेला, सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर, परदेशात नोकरीनिमित्त दौरे करणारा असून सुद्धा सीमा घरातील अशिक्षित, अडाणी लोकांच्या वागणुकीमुळे, त्यांच्या तिला सतत घालून-पाडून बोलण्यामुळे प्रचंड वैतागून गेलेली होती. नवरा तर सीमाचं ऐकून घेऊन त्यातून काही पर्याय काढण्याइतका वेळही देऊ शकणारा नव्हता. कारण त्याचा कामाचा व्याप मोठा होता. सीमा पण त्याला रोज रोज या घरातील कटकटी सांगायचे टाळत होती. पण या वातावरणाला ती खूप कंटाळलेली होती.

सीमा ने जेव्हा तिच्या सासूची वागणूक सांगितली तेव्हा तिचं म्हणणं होतं, मी अतिशय अभ्यास करून, कष्ट करून कायद्याची पदवी घेतली आहे. मला त्या संदर्भात विविध माहिती, पुस्तकं वाचणाचा छंद आहे, आवड आहे पण माझ्या हातात पुस्तक पाहिलं की सासू म्हणते, घरातील काम करायला, वाकायला नको हिला, बसली पुस्तकं घेऊन, आली मोठी कायदे पंडित, असे सीमा सांगत होती. मला सकाळी उठून चालायला जाणे आवडते, फिरायला आवडते पण माझी नणंद म्हणते उठल्यावर पहिली झाडू-फरशी करत जा, तोच व्यायाम उत्तम आहे, बाहेर फिरून टाइमपास करण्यापेक्षा घर स्वच्छ कर, तर सीमाची जाऊ तिला सकाळी सकाळी स्वयंपाक करूनच बाहेर कुठे जायचं तिथे जात जा, अशी वॉर्निंग देत असते. सीमाला विविध ट्रेकिंग, मॅरेथॉन, सायकलिंग अशा उपक्रमात सहभागी होण्याची खूप आवड असून तिला अशा कार्यक्रमात कायम बोलावणे असते. दरवेळी हे उपक्रम पहाटे आणि सकाळी लवकरच असतात आणि ते कधीच घरातील दररोज सकाळी कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकच्या जबाबदारीमुळे अटेंड करता येत नाहीत. यामुळे सीमा कायम डिस्टर्ब होत असते.

सीमाचा नवरा अगदी आरोग्याबाबत जागृत आणि डाईटमध्ये काटेकोर असल्यामुळे त्याला जूस, फळं, विविध भाज्या, सूप, कडधान्य, एनर्जी ड्रिंक, दूध असं वेळापत्रकानुसार देणं ही सीमाची जबाबदारी आहे. सीमाला पण स्वतःच्या आरोग्यासाठी हे सगळं खूप करावसं वाटतं. सीमा म्हणते आता चाळिशीमुळे वयोमानाने, टेन्शनने, दगदगीमुळे माझं वजन वाढलंय, मला कॅल्शियम कमी पडतंय, शारीरिक त्रास होत आहेत, पण तिचं म्हणणं सासू म्हणते बाई माणसाला कशाला पाहिजेत हे नखरे? आम्ही जे खातोय तेच निमूटपणे खात जा, फालतू खर्च वाढवू नकोस. (क्रमश:)
अजून एक समस्या सीमा समोर होती ती म्हणजे तीच राहणीमान, कपडे, फॅशन, ब्युटी पार्लर ला जाण हे घरातील सासू, मोठी जाऊ, आणि नणंदेला पसंत नव्हतं. त्यांचं म्हणणं आम्ही कधी आयुष्यात असा वायफळ खर्च केला नाही, तोंड रंगवली नाहीत, तुला बर सुचत हे सगळं. सीमा च्या सांगण्यानुसार तिला बाहेरच्या जगात वावरताना, चार चांगल्या लोकांमध्ये मिसाळताना निटनिटक राहणं गरजेचे होत. घरातील इतर महिलांना कधीही मोठे कार्यक्रम, मोठया मीटिंग, सभा, संमेलन इत्यादी ठिकाणी जाण्याची वेळच आली नाहीये त्यामुळे त्यांना ब्युटी पार्लर ला का जायचं याच महत्वच पटत नाही. बाहेर वावरताना टापटीप का राहावं लागत, कपड्यांना इस्त्री का असावी लागते, प्रसंगानुसार कपडे स्टाईल थोडीफार फॅशन बदलावी लागते हे घरात कोणीही समजावून घेत नाही. रोजच साडी मोठं मंगळसूत्र, हातभर बांगडया आणि मोठी टिकली लावून मी सगळ्याच ठिकाणी नाही जावू शकतं. पण सासू मात्र अपेक्षा करते कि सीमाने रोज कायमस्वरूपी घरात आणि बाहेर देखील अश्याच प्रकारे राहावं. प्रत्येक घरातील गृहिणी जशी सर्व सौभाग्य अलंकार परिधान करते तसेच सीमा ने वागावं. सीमा च म्हणणं होत मला टू व्हिलर चालवताना, बस ने, ट्रेन ने कामानिमित्त बाहेरगावी प्रवास करताना, धावपळ करतांना आरामदायक कपडे बरे वाटतात. सासू म्हणते आम्ही नववारी साडी घालून पण प्रवास केलेत आणि भाकरी थापल्यात, शेतातील काम पण साड्या घालूनच केलीत तुझं भलतंच कौतुक आहे. सीमा ला हे सगळं ऍडजेस्ट करणं अशक्य वाटतं होत कारण आताच्या काळात, तीच व्यावसायिक स्वरूप लक्षात घेता तिला असं राहणं आणि वावरण अजिबात सूट होणार नव्हतं.

कविता ( काल्पनिक नाव ) पण शिकलेली गृहिणी म्हणून राहणारी तीस वर्षीय महिला. कविताला होत असलेला एक मानसिक त्रासाचा मुद्दा होता तीच आणि तिच्या नवऱ्याचं बाहेर फिरायला जाण, हॉटेलिंग करणं तिच्या सासूला अजिबात पसंत नसायचं. सासू स्वतःच्या मुलाला याबाबत काही बोलायची नाही पण कविता ला मात्र तुझ्या मौज मजेवर, तूझ्या बाहेर खाण्यावर किती पैसा खर्च होतो, तो जरी बाहेर जेवायला चल म्हटला तरी तुला नाही म्हणता येत नाही काय? सासू कडून अशी वक्तव्य ऐकल्यावर कविता ला प्रचंड वाईट वाटायचं कारण ती पण चांगल्या घरातील मुलगी होती आणि तिच्या खाण्या पिण्याच्या खर्चावरून तिला बोलणं तिच्यासाठी खुप अपमानास्पद होत. घरात पण कविता ने काही वेगळा, नवीन, चांगला पदार्थ बनवायला घेतला किंवा बाहेरून काही पार्सल मागवले कि, काय चोचले चाललेत खाण्याचे म्हणून तिला सासुमार्फत ऐकवणूक केली जायची.

अशीच परिस्थिती होती राणी (काल्पनिक नाव) ची. इंजिनीरिंग ची डिग्री घेतलेली राणी जेंव्हा लग्नानंतर सासरी गेली, नौकरी ला सुद्धा लागली तेव्हा सासरच्या लोकांनी मुद्दाम कामवाली काढून टाकली असं तीच म्हणणं होत. अतिशय अशिक्षित सासू आणि अडाणी नणंद आहे त्यामुळे माझ्याशी असं वागल्या असं तीच मत झालं होत. आम्हाला तूझ्या करिअर वगैरे चा काही कौतुक नाही घरातली सगळी काम करुन जे करायचं ते कर असं तिला सांगण्यात आले होते आणि हे सगळं करताना तिची खूप दमछाक होऊ लागली. दोन्ही आघाड्या सांभाळून जगणं तिच्या तब्बेतीला मानवणार नव्हतं. नवऱ्यापुढे हा विषय मांडला असता तो म्हटला जमत नसेल तुला तर नौकरी सोडून दे पण माझ्या आईने आयुष्यभर खूप कष्ट केलेत तिला आता काम होत नाही, ती काहीही मदत करणार नाही. कामवाली फक्त माझं लग्न होईपर्यंत एक सोय म्हणून ठेवली होती आता तूं आहेस ना मग कामवाली ची गरज नाही. राणी च म्हणणं होत मी अतिशय उत्कृष्ट गुण मिळवून उत्तम कॉलेज मधून इंजिनीअर झाले ते घरकाम करण्यासाठी नाही. माझ्या पालकांनी लाखो रुपये खर्च करुन मला स्वतःच्या पायावर उभ केला आहे, मला करिअर महत्वाचे आहे त्यामुळे मला आता या लग्नात जमवून घेणं अशक्य आहे.

नंदा (काल्पनिक नाव ) सामाजिक कार्यात अत्यंत रस असलेली, समाजासाठी झटून काम करणारी उच्च शिक्षित विवाहित स्त्री. लहानपणापासून माहेरी सामाजिक वातावरण असल्यामुळे तिच्या रक्तातच सामाजिक बांधिलकी आहे. नंदा च्या लग्नाला सुद्धा दहा बारा वर्षे झालीत पण आता तिला घरातील मागासलेल्या मनोवृत्ती चा, कमकुवत बुद्धिमत्ता असलेल्या अडाणी अशिक्षित घटस्फोटित नणंदे चा आणि प्रचंड जुन्या विचारसरणी ची सासू यांचा भयानक त्रास होऊ लागला आहे असं ती सांगत होती. तिच्या सामाजिक कार्यक्रमांवर, तिच्या समाजातील, घरा बाहेरील विविध उपक्रमावर या दोघीही सतत टीका करत. लष्कर च्या भाकरी भाजण्यापेक्षा स्वतःच बघ, स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दे, तूझ्या बाहेर राहण्यामुळे तूझ्या मुलांची जबाबदारी आमच्यावर पडते, त्याला वळण लावणं तुझीच जबाबदारी आहे. स्वतःचा संसार वाऱ्यावर टाकून कश्याला बोंबलत लोकांना मदत करत फिरते, सामाजिक कार्य फुकटात करुन कोणाचा भलं झालाय, चार पैसे कामविण्याची अक्कल नाही कश्याला नवऱ्याच्या जीवावर समाज सेविका बनते अशी निंदा आणि असभ्य भाषा तिला सतत ऐकावी लागत होती.

जे सामाजिक कार्य तीच स्वप्न आहे, तिला त्यातून पुढे मोठं व्यक्तिमत्व बनायची इच्छा आहे तिथेच तिला कोणताही पाठिंबा अथवा प्रोत्साहन न देता या दोघी सतत टोचून बोलतात यामुळे नंदा सुद्धा वेगळं होण्याच्या विचारात होती. मला माझ्या कामावरून अपमानित केलेला अजिबात सहन होत नाही, होणार नाही यावर नंदा ठाम होती.

या सारखी अनेक उदाहरणे आपल्याला समाजात दिसतात ज्यामुळे चांगल्या शिकलेल्या महिलांना त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार सासर न मिळाल्यामुळे, वैचारिक, भावनिक, मानसिक पातळीत खूप तफावत निर्माण होते आणि संसार मोडकळीस येत आहेत. फक्त पती – पत्नीचं सुशिक्षित, डिगऱ्या घेतलेले असून चालत नाही तर संपूर्ण कुटुंब थोडेफार तरी शिकलेले असणे आज काळाची गरज बनत आहे. जर तस नसेल तर ज्यांना शिक्षणाची संधी मिळालेली नाही, जे जुन्या पिढीतील आहेत अथवा स्वतः अज्ञानामुळे शिक्षण सोडून दिलेले आहेत, परिस्थिती अभावी शिकू शकलेले नाहीत अथवा जे किमान पदवीधर पण झालेले नाहीत अश्या सासरच्या लोकांनी आपल्या उच्च शिक्षित सुनेसोबत जुळवून घेणेसाठी आपली विचार सरणी, आपली वागणूक, आपले व्यक्तिमत्व, आपले स्वभाव बदलणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ आपल्या अडाणी पणामुळे, आपल्या बुरसटलेल्या वागणुकीमुळे, हेकेखोर पणामुळे, आपल्याला बाहेरील जगातील काहीही माहिती नसून देखील सुशिक्षित सुनाना केवळ मानसिक त्रास द्यायचा, कमी लेखायला हणून सासुरवास करायला जाल तर ऐका चांगल्या संसाराचा आपण स्वतः नाश करणार आहात हे लक्षात असुद्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -