Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीChandrayaan 3 : चांद्रमोहीम फत्ते!

Chandrayaan 3 : चांद्रमोहीम फत्ते!

Chandrayaan 3 :चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँड होणारा भारत हा पहिलाच देश

श्रीहरिकोटा : भारताचे चांद्रयान लँडर चंद्रावर भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी सुरक्षितरित्या लॅण्डिंग झाले आणि भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर सत्यात उतरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

२०१९ साली भारताच्या चंद्रयान-२ या मोहिमेत अंतिम क्षणी अपयश आल्याने इस्त्रोसह देशवासियांची निराशा झाली होती. मात्र या अपयशाने खचून न जाता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने प्रयत्न करत चंद्रयान-३ मोहिमेची आखणी केली होती. २०१९ मधील चांद्रयान-२चा अनुभव लक्षात घेऊन इस्रोने चांद्रयान-३ साठी संपूर्ण काळजी घेतली होती. यावेळी विक्रम लँडरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे लँडर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळत होते. चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर इस्रोला हे यश मिळालं आहे. भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम फत्ते झाली आहे.

चंद्रयान-३ हे १४ जुलै २०२३ रोजी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एक एक टप्पा पार करत हे चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला. त्याबरोबरच एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा भारत हा चौथा देश ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा!

चंद्रयान-३ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसह इस्रोच्या संशोधकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या काळात भारत गगनयान, आदित्य-१ या मोहिमांसह शुक्र ग्रहावरील मोहिमांचेही सुतोवाच केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ”जीवन धन्य झाले आहे. विजयाच्या मार्गावर चालण्याचा हा अभूतपूर्व क्षण आहे. आज भारतामधील प्रत्येक घरात सेलिब्रेशन सुरू झाले आहे. मी चांद्रयान-३ च्या टीमचे आणि देशातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो” शास्त्रांच्या अथक परिश्रमामुळेच आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचण्यात यशस्वी झालोय. असा पराक्रम करणारा भारत पहिलाच देश आहे. आपण जमिनीला आई, आणि चंद्राला मामा म्हणतो. चांदो मामा खूप दूर आहे, असे म्हटले जात होते. पण आता असाही दिवस येईल, चांदो मामा फक्त एक पाऊल दूर आहे, असे मुलं म्हणतील.

‘मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो आणि तुम्ही पण!’

चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 चा इस्रोसाठी खास मेसेज

चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 नं इस्रोसाठी खास मेसेज पाठवला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा हा क्षण आणि अशी ही कौतुकास्पद इस्रोची कामगिरी आहे. इस्रोने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने ट्वीट करत म्हटलं आहे की, ”चांद्रयान-3 मिशन : भारतीयांनो, मी माझ्या मुक्कामापर्यंत (चंद्रावर) पोहोचलो आणि तुम्ही पण – चांद्रयान-3”. भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत पोहोचलं आहे. भारताने जणू चंद्रच कवेत घेतला, अशी भावना आज प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश

भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी ठरलं आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव कायम अंधारात असतो. येथील वातावरण अतिशय थंड असते. भारताच्या चांद्रयान-1 ने चंद्रावर बर्फाचा शोध लावला होता. त्यानंतर आता तेथे पाण्याचे साठे शोधणे हे चांद्रयान-3 चं प्रमुख उद्दीष्ट आहे. चंद्रावरील विविध नमुने गोळा करुन त्यावर इस्रोकडून संशोधन करण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -