
मुंबई: नुकताच जिओ सिनेमावर सुष्मिता सेनची ताली (taali) ही वेब सीरिज (web series) लाँच झाली आहे. या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेनने ट्रान्सजेंडर गौरी सावंतची भूमिका केली आहे. यात ट्रान्सजेंडर गौरी सावंत बनलेल्या सुष्मिताचे जितके कौतुक होत आहे तितकेच तिच्या लहानपणीच्या गणेशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कृतिका देवचे होत आहे.
कृतिका देवही तिला मिळालेल्या अभिनयाच्या पावतीमुळे खूप खूश आहे. मात्र तिला तालीच्या शूटिंगदरम्यान कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले. सोबतच तिने तालीच्या एका सीनच्या शूट दरम्यान एका माणसाने तर तिला भिकारी समजून १० रूपये दिले होते हा किस्साही सांगितला.
ताली ही वेब सीरिज ट्रान्सजेंडर गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. त्या सेक्स वर्कर्ससाठी काम करतात. या वेब सीरिजमध्ये त्यांना आपल्या जीवनात पुढे येण्यासाठी किती संघर्ष करावा लागला हे दाखवले आहेत.
कृतिका देवने सांगितला तालीमधील सर्वात कठीण सीन
कृतिका देवने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले की, जेव्हा गणेशला मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा सीन करायचा होता तेव्हा तो सगळ्यात कठीण सीन होता. आम्ही रिअल लोकेशनवर लपवलेल्या कॅमेऱ्यांसोहत शूटिंग केली होती. हे एक प्रकारचे गोरिल्ला शूट होते. रस्त्यावर मी एकटी उभी होते. जसे ट्रॅफिक सिग्नल लाल होतो मी भीक मागण्यासाठी रस्त्यावर पोहोचते. एका माणसाने तर मला १० रूपये दिले आणि आशीर्वाद दिला.
View this post on Instagram
View this post on Instagram
ती घटना आठवली की माझ्या अंगावर आजही शहारे येतात. त्याला खरेच वाटले की मी भीक मागत आहे. ही खरंतर माझ्या अभिनयासाठी मला मिळालेली पावतीच आहे. आमचे डीओपी राघव सर मला म्हणाले की मी ती १० रूपयांची नोट फ्रेम करून ठेवावी. तो क्षण आठवल्यावर गौरी सावंत यांना किती संघर्ष करावा लागला याची जाणीव होते.