सेवाव्रती: शिबानी जोशी
राष्ट्रसेविका समितीच्या महिला कार्यकर्त्या संपूर्ण देशभरातल्या प्रांतांमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी काम करत आहेत. तसेच काम संपूर्ण उत्तर कर्नाटक भागातही समितीच्या कार्यकर्त्या करत होत्या. समाजामधील गरीब, उपेक्षित महिलांना शिक्षण, खेळ, भजनवर्ग, रोजगार संधी, शैक्षणिक उपक्रम, व्याख्याने, याद्वारे जनजागृती करून सक्षम बनवण्याच्या उद्देशानं हुबळी, बेळगाव, धारवाडसह संपूर्ण उत्तर कर्नाटक भागात समितीच्या महिला कार्यकर्त्या चाळीस वर्षांपासून काम करत होत्या; परंतु या सर्व कार्याला एकत्रितपणा यावा आणि एक संघटन असावं यासाठी २०१२ साली “संस्कृती ट्रस्ट ” या संस्थेची स्थापना करण्यात आली. बंगळूरुमध्ये अशा प्रकारेची महिला कार्यकर्त्यांनी एक संस्था सुरू केली होती. त्यातून प्रोत्साहन घेऊन संस्कृती ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला महिलांना संघटित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाऊ लागले. सुरुवातीला महिलांसाठी आरोग्य शिबीर भरवण्यात आली. त्याशिवाय कुपोषण, आरोग्यसंदर्भात पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. कामाला चांगलं यश येत आहे. तसेच महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे लक्षात आल्यानंतर २०१५ साली स्वतःच्या वास्तूची बांधणी संस्थेने सुरू केली आणि “मातृ मंदिर” या नावाने संस्कृती ट्रस्टची स्वतःची वास्तू उभी राहिली. या वास्तूमध्ये पहिलंच शिवण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. समितीच्या एक कार्यकर्त्या स्वतः शिवणाचे क्लास घेत असत. त्याचं इथे येऊन महिलांना शिवण शिकवू लागल्या. त्यासाठी अतिशय नामामात्र फी आकारून महिलाना प्रशिक्षण मिळू लागलं. त्यातून ३२ महिला प्रशिक्षित झाल्या आहेत. प्रशिक्षित महिलांना मोठ्या ऑर्डर्स मिळवून देऊन बाजारही उपलब्ध करून दिला जातो.
राष्ट्रसेविका समितीचे आराध्य दैवत असलेल्या अष्टभुजा देवीचं छोटसं मंदिर इथे असल्यामुळे भजनी मंडळाचे कार्यक्रम इथे सुरू करण्यात आले. हुबळी, धारवाड भागात भजनी मंडळांची खूप मोठी परंपरा आहे. या भागात घरोघरी जाऊन किंवा देवळा-देवळात जाऊन भजनं करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने महिला भजनी मंडळात जात असतात. त्यामुळे दर शुक्रवारी अष्टभुजा देवीच्या मंदिरात भजनी मंडळाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. दर शुक्रवारी संस्थेच्या कार्यकर्त्याचं भजन असते आणि शेवटच्या शुक्रवारी बाहेरच्या भजनी मंडळ संस्थांना येथे भजन सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात येऊ लागलं आहे. एकट्या हुबळीमध्ये जवळजवळ ४५ भजनी मंडळं असल्यामुळे त्यानिमित्ताने या महिला ट्रस्टला भेट देऊ लागल्या. वर्षात दोन मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच आयोजन केले जाते. यावेळी होम हवन, पूजा-अर्चना करून महिलांना धार्मिक, अाध्यात्मिक आनंदही देण्याचा प्रयत्न असतो.
आणखी एक महत्त्वाचा उपक्रम संस्थेने सुरू केला आहे, तो म्हणजे वैद्यकीय सामग्री भंडार. काही रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर व्हील चेअरसारख्या तात्पुरत्या सामग्रीची गरज असते. रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात लागणारी व्हील चेअर, वॉकर, वॉटर बेड अशा तऱ्हेची सामग्री अत्यल्प दरात भाड्याने देण्यात येते. यासाठी इनरव्हील, रोटरी क्लब सारख्या संस्थांनी संस्कृती ट्रस्टला अशी सामग्री डोनेट केली आहे. त्याशिवाय महिलांना रोजगार मिळावा यासाठी कलात्मक कार्यशाळा घेतल्या जातात. विविध कलांचे शिक्षण दिले जाते. उत्तर कर्नाटकात भरतकाम खूप महिला करतात. त्यांना व्यवसाय उपलब्ध करून त्यातून रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
त्यानंतर संस्थेने घरबसल्या महिलांच्या हाताला काम मिळावं यासाठी उद्योग केंद्र सुरू केलं. गृहिणी असलेल्या महिलांमध्ये रुचकर, पारंपरिक पदार्थ, भोजन करण्याची शैली असते, आवड असते. त्याशिवाय हल्ली एकल कुटुंब व्यवस्था निर्माण झाली आहे. हल्लीच्या युवा पिढीला पारंपरिक पदार्थ करायला वेळ नसतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात पारंपरिक पदार्थ सर्वांना मिळावेत आणि गरजू महिलांच्या हाताला कामही मिळावं तसेच दर्जेदार पदार्थ खाता यावेत यासाठी उद्योग केंद्राची स्थापना झाली. महिला आपल्या घरीच हे पदार्थ तयार करून आणतात आणि ट्रस्ट त्यांना मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ग्राहक मिळवून देते. मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स घेतल्या जातात. सणासुदीला गोड पदार्थ, चकलीसारखे तिखट पदार्थ यांच्या अंदाजे प्रत्येकी ५०-५० किलोच्या ऑर्डर्स संस्थेला मिळत असतात. यात आणखी एक वैशिष्ट्य जपले जात ते म्हणजे ४० महिलांपैकी जर एखादी महिला सांबार मसाला बनवणार असेल तर अन्य कोणतीही महिला सांबार मसाला बनवत नाही. त्यामुळे त्यांच्या एकमेकांमध्ये कुठलीही स्पर्धा राहत नाही. ट्रस्टकडून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी वसतिगृहही चालवले जाते. तिथे उत्तम सुविधा पुरवल्या जातात. सध्या येथे एकूण १६ विद्यार्थिंनी निवास करत असून इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या मुलीचं छात्रावासातील सर्व दैनंदिन कामं करतात. प्रत्येक मुलीला स्वयंपाक, केरवारा, साफसफाई अशी कामं दिवसानुसार नेमून दिलेली असतात. यामुळे मुलींमध्ये स्वावलंबनाची, शिस्तीची तसेच घर कामाची माहिती होते. ट्रस्टच्या परिसरात समितीची शाखाही लागते.
नुकताच संस्कृती ट्रस्टनं एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी तर तो उपयुक्त आहेच, त्याशिवाय गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारा सुद्धा आहे. हा उपक्रम म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्सचे उत्पादन करणे. हे सॅनिटरी पॅड्स बांबूच्या धाग्यांपासून बनवण्यात येत आहेत. त्यासाठी गरजू महिलांना प्रशिक्षण ही देण्यात येत आहे. पहिल्याच वर्गाला १६ गरजू महिला उपस्थित होत्या. दोन दिवस सॅनिटरी पॅड तयार करण्याचं प्रशिक्षण या महिलांना देण्यात आलं. त्यांना बाजारपेठही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
याशिवाय महिला कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून लहान मुलांना श्लोक शिकवणं, शाळेमध्ये जाऊन प्लास्टिकमुक्त भारत उपक्रमाबाबत जागृती निर्माण करणे, गोसेवा असे छोटे- मोठे कार्यक्रम वर्षभर सुरूच असतात. संस्कृती ट्रस्टमध्ये हुबळी, धारवाड आणि बेळगाव इथल्या १३ ट्रस्टीज काम पाहतात. बेळगावच्या समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या अलका इनामदार ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत. धारवाडला राहणाऱ्या वेदा कुलकर्णी ट्रस्टच्या उपाध्यक्ष, तर हुबळी इथल्या शांता वेर्णेकर खजिनदार म्हणून काम पाहत आहेत. गेल्या वर्षी ट्रस्टन १० वर्षे पूर्ण केली. एखाद्या संस्थेला दहा वर्षांचा काळ तसा अल्पच आहे तरीही या ११-१२ वर्षांत ट्रस्टच्या कामांची यादी खूप मोठी झाली आहे. भविष्यात संगणकीय शिक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्कशॉप्स, उत्तम आरोग्य सेवा त्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्याचा ट्रस्टचा मानस आहे.
joshishibani@yahoo. com