मुंबई: आशिया चषक २०२३ साठी (Asia cup 2023) १७ सदस्यीय भारतीय संघाची (indian team) घोषणा झाली आहे. या संघात काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे तर काहींच्या हाती निराशा लागली आहे. त्यापैकीच एक म्हणजे भारताचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहल (spinner yuzvendra chahal). चहलला आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
चहलने याबाबत सोशल मीडियावर काही लिहिलेले नाही मात्र त्याने इमोजीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चहलने एका बाजूला झाकोळलेला सूर्याचा इमोजी आणि त्यानंतर दुसऱ्या दिशेला उगवलेला सूर्य अशी इमोजी शेअर केली आहे. संघात निवड न झाल्याने चहल निराश झाल्याचे या इमोजीवरून दिसत आहे.
⛅️——> 🌞
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) August 21, 2023
मोठ्या स्पर्धेत निवड न होणे हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधीही २०२१ आणि २०२२च्या टी-२० वर्ल्डकपमध्येही त्याला भारतीय संघात सामील करण्यात आले नव्हते. त्याची कामगिरी चांगली असतानाही त्याला वगळण्यात आले होते.
चहलबाबत काय म्हणाले अजित आगरकर आणि रोहित शर्मा
आगरकरसोबत बसलेला कर्णधार रोहित शर्मा चहलला सामील न करण्याबाबत म्हणाला, आम्ही अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या रूपाने एक ऑफ स्पिनर संघात ठेवण्याबाबत विचार करत होतो मात्र तुम्ही पाहत आहात की चहल बाहेर आहे कारण आम्ही केवळ १७ खेळाडूंचीच निवड करू शकत होतो. एखाद्या वेगवान गोलंदाजाच्या जागीच त्याला संधी मिळू शकत होती. मात्र आम्ही तसे करू शकत नाही कारण पुढील दोन महिने वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
रोहित पुढे म्हणाला, यासोबतच मी हे ही स्पष्ट करतो की कोणासाठी दरवाजे बंद झालेले नाहीत. कोणताही खेळाडू कोणत्याही वेळेस पुनरागमन करू शकतो. जर आम्हाला वाटले की वर्ल्डकपसाठी आम्हाला चहलची गरज आहे तर तो संघात कसा फिट बसू शकेल याचा आम्ही विचार करू. हीच बाब अश्विन आणि वॉशिंग्टन यांनाही लागू होते.