मुंबई: पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलताना मुंबई महानगरपालिकेने(Mumbai mahanagarpalika) आजपासून प्लास्टिक पिशव्यांवर(plastic bags ban) बंदी घातली आहे. महापालिकेच्या या बंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीस ३ महिन्यांचा तुरूंगवास तसेत २५ हजारांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
हल्ली प्लास्टिक हा आपल्या जीवनाचा जणू काही भागच बनला आहे. सगळ्याच गोष्टी प्लास्टिकने भरलेल्या आहेत. मात्र हे प्लास्टिक आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लास्टिक वापरावर आळा घालण्यासाठी आता मुंबई महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.
यासाठी पालिकेकडून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या भरारी पथकामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अधिकारी, पोलीस अधिकारी आणि तीन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, प्लास्टिक वापरणाऱ्यांवर या भरारी पथकराची करडी नजर असणार आहे.५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करताना कोणी आढळल्यास त्यांना ५ हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे.
मुंबईत २००५मध्ये महापूर आला होता त्यावेळेस या प्लास्टिकच्या पिशव्या पुरासाठी कारणीभूत ठरल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून २०१८मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन आणि वापर यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोरोनाच्या काळात पुन्हा प्लास्टिकचा वापर वाढला. २०२२मध्ये प्लास्टिकविरोधी कारवाईला पुन्हा सुरूवात झाली मात्र अद्यापही या कारवाईचा धाक कुठेच दिसून येत नाही. त्याचमुळे आता या कारवाईत पोलीस तसेच प्रदूषण मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मदतीने आता पुढच्या कारवाया केल्या जातील.
मुंबई पालिकेने घातलेल्या या बंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना मोठी शिक्षा होऊ शकते. यात पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजारांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजारांचा दंड ठोठावण्यात आळा आहे तर त्यानंतर केल्या जाणाऱ्या गुन्ह्यासाठी ३ महिन्यांचा तुरूंगवास तसेच २५ हजारांचा दंड अशी शिक्षा दिली जाणार आहे.