- दिनेश हसबनीस, शिराळा
गोरक्षनाथ महाराजांनी इसवी सन आठव्या शतकात शिराळ्यात वास्तव्यास असताना जिवंत नागाच्या नागपंचमीची परंपरा सुरू केली. ही परंपरा दशग्रंथी ब्राह्मण महाजन (सध्या पांडुरंग लक्ष्मण महाजन) यांच्या घरापासून सुरू झाली. आजही परंपरागत नागदेवतेची पालखी प्रणव पांडुरंग महाजन यांच्या घरातून निघते. या पालखीची तयारी आठ दिवस आधीपासून सुरू होते. शिराळा ग्रामदेवतेचे पुजारी गुरव अमावसेच्या दिवशी मूर्तीची लिंबू, माती, रांगोळी आणि राख यांच्या सहाय्याने स्वच्छता करतात. त्यानंतर नागपंचमीच्या आदल्या दिवशी भास्कर महाजन मूर्ती ब्रासो वापरून स्वच्छ चकचकीत करतात. या कामी पांडुरंग महाजन, प्रणव महाजन, अनिरुद्ध महाजन, प्राजक्ता महाजन व अपूर्वा महाजन मदत करतात. त्याला ठरलेल्या पारंपरिक मनमोहक रंगांनी रंगवतात. नागपंचमीच्या दिवशी परंपरागत पालखी भोई बांधवकडून तोरणा ओढ्याला स्वच्छ धुतली जाते. त्यानंतर पालखीची सजावट पारंपरिक वस्त्रालंकारांनी केली जाते. सकाळी अकरा वाजता पालखीचे मनोभावी मंत्रोपचाराने विधिवत पूजा केली जाते.आधी जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा होती, पण सध्या फक्त मूर्तीची पूजा केली जाते. यानंतर पालखीचे मानकरी पांडुरंग महाजन यांच्या घरी प्रथम पूजन पूर्ण होते. यानंतर गुरुवार पेठ मार्गे पालखी सोमवारपेठेतील मरिमी आईच्या मंदिरात प्रथम पूजेसाठी जाते. त्यानंतर ग्रामदैवत अंबाबाईच्या मंदिरात पालखीची पूजा होते.
सायंकाळी पालखी कासारगल्ली मार्गे, वैजेश्वर मंदिरात जाते, तिथे तिचे पूजन होते आणि रात्री उत्तर पूजेसाठी पालखी परत पांडुरंग महाजन यांच्या घरी येते. शिराळा गावातील या परंपरेमध्ये सर्व समाजाने बारा बलुतेदारांना सहभागी होण्याची परंपरा आहे. यामध्ये पालखी उचलण्याचा मान भोई लोकांचा आहे. नागाचा मान कोतवालांचा आहे. पालखी आणि नागाची पूजा करून नागपंचमीची सुरुवात करण्याचा मान महाजनांचा आहे. पालखीमधील नागदेवतेची मूर्ती ही जागृत देवस्थान आहे. नवसाला पावण्याची अखंड परंपरा गेली कित्येक वर्षे सुरू आहे.
विदर्भातला नागपंचमी सण
- प्रा. प्रवीण पांडे, अकोला
नागपंचमी हा विदर्भात साजरा केला जाणारा मोठा सण आहे. तसे नागपंचमी सर्वच ठिकाणी साजरी केली जाते. श्रावण पंचमी या दिवशी नागदेवतेची पूजा घरोघरी केली जाते. विवाहित मुली आपल्या माहेरी आलेल्या असतात. गावामधील बाल मैत्रिणींची भेट, बोलणे, त्यांच्यासोबत खेळणे. झाडाला झोके बांधून झोक्यावर झुलणे असे सर्व गमती जमतीचे वातावरण असते. लहान गावात किंवा खेड्यात नागपंचमीच्या दिवशी सुवासिनी सुस्नान करून नागोबाच्या पूजेकरिता लाह्या, फुटाणे, दूध, केळी, फुलांचे हार इत्यादी साहित्य घेऊन नागाच्या वारुळावर जाऊन वारुळाची पूजा करायचे. नैवेद्य दाखवून प्रसाद घेऊन घरी येऊन पूर्णा वरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून मग सर्वांनी भोजन करायचे. जवळपास कुठे नागदेवतेचे मंदिर असल्यास तिथे जाऊन दर्शन घ्यायचे. नाग देवतेचे मंदिर नसेल तर शिवालयात जाऊन नमस्कार करायचा. सायंकाळी भजन करत, गाणे म्हणत आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो. खेड्यापाड्यात प्रमुख व्यवसाय हा शेतीच असतो. शेतात काम करत असताना अनेकदा नागाचे, सापाचे दर्शन होणे हे स्वाभाविक आहे. कधी कधी दंश होण्याची सुद्धा शक्यता असते. जुन्या काळी गावोगावी दवाखाने नसतं किंवा जाणते वैद्य देखील क्वचितच आढळत. त्यामुळे नागाची पूजा करून त्याला अभय मागण्याची प्रथा पडली. अशावेळी काही विशेष अभ्यासू मंडळी झाडपाल्याद्वारे किंवा मंत्र विद्येच्याद्वारे विंचू किंवा साप चावल्यास इलाज करीत असत. या मंत्राच्या आणि झाडपाल्याद्वारे इलाज करणाऱ्या मंडळींना आरवाडी असे म्हणतात. (शुद्ध शब्द आरवाडी/ ग्रामीण शब्द अरबडे, अरबडी) ही मंडळी हा पाच दिवसांचा मोठा उत्सव साजरा करतात. या काळात रोज नागोबाचे पूजन, नैवेद्य, आरती आणि रात्री नागोबाची भजने असा हा छान कार्यक्रम ही मंडळी मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. ही जी भजने म्हणून जागरण करणे ह्या प्रकाराला ठाव्याचे भजन किंवा ठावा मांडणे असे म्हटले जाते. ह्याच्या मांडणीमध्ये एक तांब्याचा हंडा, त्यावर पालथी ठेवलेली परात (कोपर) ठेवतात व लोखंडी कड्यांनी ह्यावर वाजवून नाद निर्माण करत ढोलकीच्या तालावर ही भजने म्हटली जातात. यावेळी म्हटल्या जाणाऱ्या भजनास बारी असे म्हणतात. (संगीत बारी हा प्रकार वेगळा.)
या भजनातून अनेक कथा सांगितल्या जातात. त्यात काही कथा या कृष्णलीलेच्या असतात, तर काही कथा ह्या सांब सदशिवाच्या तर काही नाग देवतेच्या. या काळात ही मंडळी अनेक कडक नियमांचे, व्रताचे अनुपालन करतात. हे नियम सामान्य मंडळींना माहीत देखील नसतात. पंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा करून माती आणून त्यापासून नागदेवतेची प्रतिमा तयार करतात. रांगोळीचे घट आखून त्यावर कलश ठेवून त्या नाग देवतेचे पूजन केले जाते. नंतर ठावा करून रात्री (पहाटे) आरती केली जाते. दुसरे दिवशी सायंकाळी म्हणजेच षष्ठी तिथीला गोपाळकाल्याचे कीर्तन संपन्न होते. या नागदेवतेच्या प्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत दिंड्या, भजने गात गात श्री नागराजाला मिरवत आणून नदीवर विसर्जन करण्यात येते. पुन्हा मंदिरात येऊन प्रसाद, पान-सुपारी कार्यक्रम होऊन पुन्हा ही मंडळी रात्रीच्या भजनाला उपस्थित होतात. पुढील दिवशी ठावा करून ही मंडळी पुन्हा आपापल्या कामाला लागतात.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra