
नितेश राणे यांचे संजय राऊतांना थेट आव्हान
कणकवली : पक्षाचे आदेश आले तर लोकसभेची ईशान्य मुंबईची (North east Mumbai Loksabha elections) जागा लढवेन, असं वक्तव्य उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) असून ती राष्ट्रवादीच लढवणार, असा शब्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय राऊत यांच्याविरोधी भूमिका घेत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत यांना थेट रत्नागिरी- सिंधुदुर्ग विभागात येऊन लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे.
नितेश राणे म्हणाले, संजय राजाराम राऊत म्हणतात की पक्षाने आदेश दिला तर मी ईशान्य मुंबईची लोकसभेची जागा लढवेन, त्याना माझा फार मोठा विरोध आहे. कारण ज्या वॉर्डमध्ये संजय राऊतचं घर आहे त्या वॉर्डचा नगरसेवक हा काँग्रेसचा आहे. जो स्वतःच्या वॉर्डमध्ये उबाठाचा वर्षानुवर्षे एक नगरसेवक निवडून आणू शकला नाही, तो लोकसभेची भाषा करतो आहे. तुझी लायकी ही सरपंचाची निवडणूक लढवण्याची आहे, त्यामुळे आधी एखादी सरपंचाची निवडणूक लढव आणि तिथे तुझं डिपॉझिट तरी राहतंय का ते बघ, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
पुढे नितेश राणे म्हणाले. ईशान्य मुंबईची जागा ही तर राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. म्हणजे मी जे वारंवार बोलतो आहे की संजय राऊत पवारांच्या गटात जाऊन बसेल आणि तिथून निवडणुका लढवणार आहे हे आता सत्य व्हायला लागले आहे. एवढीच त्याला लोकसभा निवडणूक लढवण्याची खाज असेल तर रत्नागिरी- सिंधुदु्र्ग विभागात ये, मग तुझं डिपॉझिट राहतंय का ते आम्ही बघतो, असं आव्हान यावेळी नितेश राणे यांनी दिलं.