Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीPhulawa Khamkar in Shrawansari : श्रावणसरींसारखी झरझर बरसणारी फुलवा

Phulawa Khamkar in Shrawansari : श्रावणसरींसारखी झरझर बरसणारी फुलवा

मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य (मल्याळम) चित्रपटांत नृत्यदिग्दर्शनाचा ठसा उमटवणाऱ्या फुलवा खामकर यांनी दैनिक प्रहारच्या “श्रावणसरी” कार्यक्रमात आपल्या गप्पीष्ट स्वभावाने यशस्वी कारकिर्दीतील एक एक पदर उलगडले. संघर्षापासून यशापर्यंतच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी दै. प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर, प्रशासन लेखा विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.

भालचंद्र कुबल

श्रावणसरींतून खळखळत वाहणारा गप्पांचा झरा म्हणजेच सध्याच्या मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीला लाभलेली आघाडीची नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर होय. आजवर अनेक मराठी चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन करून अनेक पुरस्कार मिळवलेली मराठीतील एकमेव नृत्यदिग्दर्शिका असा त्यांचा उल्लेख करता येईल. अचूक आणि थेट संभाषण, गप्पीष्ट आणि ओघवत्या संवादाची कला लाभलेल्या फुलवा खामकर यांनी आपल्या मुलाखतीतून जवळपास दीड तास, संपादकीय मंडळींना आपल्या वाक्चातुर्याने अक्षरशः गुंतवून ठेवले.

करिअरची सुरुवात

सर्वप्रथम स्वतःबद्दल बोलताना त्यांनी करून दिलेली कुटुंबाची ओळखच मुळी चकित करून सोडणारी होती. शाहीर अमर शेख यांची नात, नाटककार-लेखक अनिल बर्वे यांची मुलगी, नामदेव ढसाळ व मल्लिका अमर शेखांची भाची आणि ‘तुंबाड’ चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक राही बर्वेची बहीण असा कलेच्या विद्यांचा वारसा लाभलेल्या मध्यमवर्गीय घरात त्यांचा जन्म झाला. बालमोहन विद्यामंदिरमधून शिक्षण घेत असतानाच त्यांना जिम्नॅस्टिक्स या खेळाची गोडी निर्माण झाली. वडील अनिल बर्वे यांच्या आकस्मित निधनामुळे निर्माण झालेल्या शोकाकुल वातावरणातून ही मुले बाहेर पडावीत याकरिता त्यांच्या मामाने, संध्याकाळी खेळात मन रमावे म्हणून शिवाजी पार्कमधल्या समर्थ व्यायाम मंदिरात नेण्यास सुरुवात केली. उदय देशपांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण सुरू झाले. खेळाडू म्हणूनच करिअर करायचे हे उद्दिष्ट बाळगून शालेय स्तरावरील अनेक जिम्नॅस्टिक स्पर्धांमधून त्यांना यश मिळत गेले. पुढे आर. ए. पोदार महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यावर मल्हार, मूड आय, डायमेन्शन्स यांसारख्या इंटरकॉलेजिएट युथ फेस्टिव्हल्समधून सादर होणाऱ्या समूहनृत्याच्या स्पर्धांतून भाग घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना पोदार महाविद्यालयाचे प्राचार्य आर. आर. साहूराजा यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्हारमधील एका नृत्याचे दिग्दर्शन त्या स्पर्धेचे परीक्षक जावेद जाफरी यांना चकित करून गेले. स्पर्धेत फुलवा खामकर यांना जरी दुसरा क्रमांक मिळाला होता, तरी नावेद-जावेद यांनी स्टार वाहिनीसाठी सादर करण्यात येणाऱ्या पहिल्या डान्स रिॲलिटी शोचे आमंत्रण त्यांना दिले होते. जिम्नॅस्टिक्सच्या आधारे निर्माण केलेले आकर्षक रंगमंचीय नृत्याविष्कार त्यांना ‘बुगी वुगी’ या नृत्यस्पर्धेचे अव्वल विजेतेपद मिळवून गेले. खेळातून अचानक नृत्यात यश मिळाल्याने त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरविण्यास सुरुवात केली.

स्वतःच्या वैयक्तिक नृत्यावर भर न देता कोरिओग्राफी त्यांना आव्हान वाटू लागले. त्यातील ठेहराव, कंपोझिशन्स यांचा विविधअंगी वापर करून त्यांनी उमेदीच्या काळात अनेक स्टेज शोज, पुरस्कार सोहळे गाजवले. एका मराठी मुलीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोहळ्यांसाठी नृत्यदिग्दर्शनात उमटवलेली मोहोर अचंबित करून सोडणारी आहे.

सिनेसृष्टीतील पदार्पण

हिंदी सिनेसृष्टीपेक्षा फुलवा खामकर मराठीत जास्त रमतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले. मराठीत ‘स… सासूचा’ हा किशोर बेळेकर दिग्दर्शित पहिला चित्रपट होता. त्यातील अंगाई गीतासाठी केलेली कोरिओग्राफी त्यांना बरेच काही शिकवून गेली. कॅमेराचे तंत्र, गाण्याचे शॉट डिव्हिजन, पात्रांच्या कपड्यांपासून ते त्यांची रंगसंगती, लोकेशन्सचा वापर इत्यादी अनेक अंगांचा विचार करून मग नृत्य दिग्दर्शनासाठी किंबहुना चित्रीकरणासाठी तुम्ही परिपूर्ण होता, हे अनेक मान्यवरांनी केलेल्या सहकार्यामुळे शिकायला मिळाल्याने शक्य झाले, हे त्या मानतात.

नावेद, जावेद जाफरीबरोबर रेमो, फराह खान, मर्झी पेस्तनजी या नामवंत कोरिओग्राफर्सबरोबर फुलवा खामकर हे नाव देखील आज आदराने घेतले जाते. जिम्नॅस्टिक्स खेळात केलेल्या अपार मेहनतीमुळे २०१० सालचा छत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतरचे सर्व मानाचे पुरस्कार नृत्यक्षेत्रातील प्रावीण्याचे आहेत. पहिल्या चित्रपटातून सोनाली कुलकर्णीशी जोडली गेलेली नाळ नटरंग सिनेमातील ‘अप्सरा आली’ या गाण्याने उंची मिळवून गेली. या गाण्याला अनेक पुरस्कार लाभले आणि झी गौरव पुरस्कार फुलवा खामकरांना सेलिब्रिटी स्टेटस मिळवून गेला. गेल्या काही वर्षांच्या कारकिर्दीत फराह खान यांच्यासोबत सहाय्यक म्हणून काम केले आहे. त्यातही नृत्यदिग्दर्शनातील अनेकविध अंगे त्यांच्याकडून शिकता आली. कोरिओग्राफर्सवर नियंत्रण ठेऊन नेतृत्वगुण शिकायला मदत झाल्याचे त्या प्रांजळपणे कबूल करतात.

डान्स रिॲलिटी शोज

२०१३ साली गाजलेल्या डान्स इंडिया डान्स शीर्षकांतर्गत सुपर मॉमची स्पर्धा न जिंकताही केवळ परफॉर्ममन्सच्या जोरावर चर्चिली गेली. पुढे मग ‘एकापेक्षा एक’ आणि ‘ढोलकीच्या तालावर’ यातील ज्युरींच्या अचूक निर्णयासाठी फुलवा खामकरांचे नाव सर्वतोमुखी झाले.
नृत्य दिग्दर्शन करता करता आणि ऐश्वर्या राय ते सोनाली कुलकर्णी या नृत्यांगनांना घडवता घडवता अभिनयाचे धडे देखील त्या आत्मसात करत राहिल्या. झी युवावरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत त्यांना अभिनयाची संधी मिळाली.

मागील वर्षी मिफ्फ (मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल) मध्ये ‘मासा’ या लघुपटासाठी दिग्दर्शिका म्हणून नव्या क्षेत्राकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या शॉर्टफिल्मच्या अनुभवातून पुढे मोठा चित्रपट करण्याचा मानस असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. लिजो जोसची मल्याळम फिल्म ‘मलाईकोट्टई वालिबान’ या बहुचर्चित चित्रपटात मोहनलाल या साऊथ सुपरस्टारला नृत्य दिग्दर्शन करण्याचे भाग्य त्यांना लाभले.

शाहीर अमर शेखांपासून सुरू झालेला कलेचा वारसा जपण्याचे कार्य फुलवा खामकरांनी अविरत सुरू ठेवण्याचा मनोदयही या मुलाखतीत बोलून दाखवला. त्यांनी स्थापन केलेल्या नृत्यशाळेत शास्त्रोक्त शिक्षणानुसार चित्रपट माध्यमांसाठी परिपूर्ण नर्तक तयार करणे हे पुढील काही वर्षांतील त्यांच्यासमोरील उद्दिष्ट आहे.

फुलवाचा नृत्यफुलोरा!

रुपाली केळस्कर

अधिक मासातला श्रावण संपून आता निज श्रावणाला सुरुवात झाली आहे. श्रावणाच्या हिरवाईचा फुलोरा डोकावू लागला आहे. इटुकली पिटुकली फुले पर्णसंभारातून मानाबाहेर काढून डुलू लागली आहेत. हा फुलोरा उल्हासाचे शिंपण करणारा आहे. अशा भारावलेल्या वातावरणात दैनिक ‘प्रहार’च्या ‘श्रावणसरी’ कार्यक्रमात आनंदाचे कोंदण घेऊन एक अप्सरा अवतरली… अन् क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे… याची अनुभूती प्रत्यक्षात आली. ती आली त्यावेळेस खरोखर असाच पाऊस पडत होता. ती अप्सरा म्हणजे फुलवा खामकर. ती आली, तेव्हा १५ दिवस उसंत घेतलेल्या पावसाने जोराचा शिडकावा केला.

‘फुलवा’ म्हणजे अप्सरांना आपल्या तालावर नाचवणारी नृत्यांगना, नृत्य शिक्षिका, नृत्य दिग्दर्शिका सुद्धा. फुलवाने नटरंग, मितवा अशा प्रसिद्ध चित्रपटांतील बड्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवले. त्याची पाळंमुळं ‘जिम्नॅस्टिक्स’च्या मैदानात रुजलेली आहेत. तिला बालपणीच ‘जिम्नॅस्टिक्स’ची आवड होती. वडिलांच्या जाण्यानंतर स्वतःचे मन गुंतवण्यासाठी दादरच्या समर्थ व्यायामशाळेत जाऊ लागली. तिथल्या वातावरणातून तिला सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि शिस्तीचे धडेही मिळाले. पुढे तिने कथ्थकचे प्रशिक्षण घेतले आणि तिच्या नृत्याचा फुलोरा फुलत गेला. तिने पुरुषांची गाणी देखील नृत्यदिग्दर्शित केली हे तिचे वेगळेपण. तिने मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनाही नाचवले.

फुलवासाठी खेळ आणि गाणे हातात हात घालून आले. ‘जिम्नॅस्टिक्स’ हा कसरती खेळ. यात खेळाडूची लवचिकता, ताकद आणि तोल यांचा कस पणाला लागतो. फुलवाने ते आव्हान पेलले. आईकडून मिळालेली नृत्याची कला एका उंचीवर नेली. तिच्या आवाजात कमालीचा मोकळेपणा, गोडवा, वागण्यात ती म्हणते तसा तुडतुडेपणाही जाणवला. जिम्नॅस्टिक्स आणि नृत्यातही ती चॅम्पियन आहे.
देशातील पहिला डान्स रिॲलिटी शो बुगी वुगी, सीझन १ची ती विजेती आहे. इंडिया डान्स सुपर मॉम्स, परीक्षक, सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक अशी बरीच मोठी तिची कारकिर्द आहे. नावाप्रमाणे तिने आपल्या कारकिर्दीचा फुलोरा फुलवला आहे.

संकटे झेलणारी, अभ्यासू आणि मेहनती, स्वावलंबी आणि स्वाभिमानी, बिनधास्त आणि हसरी मराठी मुलगी कमालीची वेगात बोलते. ती म्हणते तसे बोलण्यात स्वल्पविराम, पूर्णविराम नसले तरी तिचे कर्तृत्व ‘अवतरण’ चिन्हात बंदिस्त झाले आहे.

…म्हणून ती ‘फुलवा’!

सखी गुंडये

“बाबा, भाऊ आणि मावशी लेखक, आई नृत्यांगना, आजोबा शाहिर आणि सासुरवाडीचे खामकर मसालेवाले. चौसष्ट कलांपैकी तीन-चार कला आमच्या घरातच आहेत, असे प्रसिद्ध नृत्यांगना फुलवा खामकरने अगदी उत्साहात सांगायला सुरुवात केली. लहानपणी फुलवाच्या घराची असलेली बिकट परिस्थिती, बाबा गेल्यानंतर आईने केलेला घराचा सांभाळ, समर्थ व्यायाम मंदिरात घेतलेले जिम्नॅस्टिकचे शिक्षण, मग पदवीनंतर नृत्याचे शिक्षण ते नृत्य दिग्दर्शिकेपर्यंतच्या प्रवासाबद्दल ती भरभरून बोलली.

‘बुगी वुगी’ हा तिचा पहिला रिॲलिटी शो. यातून ओळख मिळाल्यावर तिला पुढे बरीच कामे मिळत गेली. पण मराठी इंडस्ट्रीसारखा कम्फर्ट तिला बॉलिवूडमध्ये जाणवला नाही. एखादी चांगली ऑफर आली, तर विचार करेन, पण बॉलिवूडमध्ये काम मिळावे यासाठी मुद्दाम प्रयत्न करायची इच्छा नाही, असेही ती म्हणाली. बोलण्यातून तिचे मातृभाषेवरील प्रेम आणि पैसे, प्रसिद्धीच्या मागे न धावता प्रामाणिक माणसांमध्ये राहून काम करण्याची इच्छा दिसून आली.

‘बुगी वुगी’ या डान्स शोमध्ये त्यावेळी नव्या गाण्यांवर धांगडधिंगा नाचणारे स्पर्धक आणि जुन्या गाण्यांवर अगदी हलके पण तालबद्ध नाचून फायनलला पोहोचलेली फुलवा खरेच एका ऊर्जेच्या स्रोताप्रमाणे भासली. फक्त नृत्यच नाही, तर ‘मासा’ या लघुपटाच्या माध्यमातून तिने दिग्दर्शनातही पाऊल ठेवले. मराठी माध्यमाची असल्याने पोदार कॉलेजमध्ये आपला निभाव लागेल का?, असा प्रश्न पडलेल्या फुलवाने आज केवळ मराठी, हिंदीच नव्हे, तर मल्याळम चित्रपटासाठीही नृत्य दिग्दर्शन केले आहे. आपण कितीही उंच उडालो, तरी आपली पाळेमुळे विसरू नयेत, हा तिचा स्वभाव तिच्या वागण्यातून पदोपदी जाणवत होता. कार्यक्रमादरम्यान तिच्या ‘फुलवा’ या नावामागचा किस्सा तिने सांगितला. तिच्या वडिलांनी सुरू केलेल्या ‘फुलवा’ या मासिकाला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा “नाव फुलवा आहे ना, म्हणून चालले नाही, काहीतरी वेगळे ठेवायला पाहिजे होते”, असे त्यांच्या एका मित्राने म्हटले होते. यावर “ही अंधश्रद्धा आहे. माझ्या मुलीचे नाव फुलवा ठेवेन, मग बघू कसे चालत नाही ते!” असे म्हणत वडिलांनी हट्टाने मुलीचे नाव ‘फुलवा’ ठेवले. आज खरंच नृत्य दिग्दर्शिका म्हणून ‘फुलवा’ हे नाव किती चालतेय हे वेगळे सांगायची गरज नाही!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -