मुंबई: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची(indian space research centre) मोहीम चांद्रयान ३ (chandrayaan 3)हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी अवघे काहीच तास बाकी आहेत. संपूर्ण जगाची नजर या चांद्रयान ३च्या लँडिंगकडे आहे. इस्रोच्या या मिशनची खिल्ली उडवल्याबाबत एकीकडे प्रकाश राज यांनी टीकेचा सामना करावा लागला होता तर दुसरीकडे करीना कपूरसारखे सिनेस्टार या मोहिमेसाठी अतिशय उत्सुक आहे.
सोमवारी करीनाने सांगितले की ती आपला मुलगा तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान यांच्यासोबत ‘चांद्रयान ३’चे लाईव्ह लँडिंग पाहणार आहे. करीनाशिवाय बॉलिवूडचे अनेक स्टार्स तसेच दाक्षिणात्य स्टार्सही आहेत जे ही यशस्वी मोहीम पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
अभिनेत्री करीना कपूर म्हणाली, ती इतर भारतीयांप्रमाणेच ‘चांद्रयान ३’ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची वाट पाहत आहे. माझ्या मुलांसोबत मी याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहणार आहे. राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत एका ब्रँडचा प्रचार करण्यासाठी आलेल्या करीनाने देशाच्या चांद्रमोहिमेबद्दल आपले मत व्यक्त केले तसेच ही मोहीम म्हणजे देशासाठी गर्वाचा क्षण असल्याचेही ती म्हणाली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या माहितीनुसार चांद्रयान ३ हे २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. हे चांद्रयान ३ इस्रोकडून १४ जुलैला लाँच करण्यात आले होते. ही मोहीम फत्ते होण्यासाठी अवघे काहीच तास बाकी आहेत. रशियानेही चंद्रावर लूना २५ हे यान सोडले होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळल्याने रशियाची ही मोहीम अयशस्वी ठरली.