Sunday, March 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजShankar : शिवाच्या गळ्यातील अलंकार... नागदेवता

Shankar : शिवाच्या गळ्यातील अलंकार… नागदेवता

  • विशेष : रसिका मेंगळे , मुलुंड, पूर्व

नुकताच अधिकमास संपून श्रावण महिना चालू झालाय. श्रावण महिना गरिबातील गरीब असो वा गर्भश्रीमंत सर्वांच्या तनमनाला सुखावून जातो. हिरव्या झाडावरची ती रंगीबिरंगी सुहासिक फुले बघून प्रत्येकाचं मन प्रफुल्लित होते. श्रावणात फुले जशी बहरतात, त्याचप्रमाणे प्रसन्नचित्त, प्रफुल्लित होऊन मनातही तसाच प्रेमभाव बहरतो.

महाराष्ट्रात श्रावण महिन्याला अत्यंत महत्त्व आहे. श्रावण म्हणजे श्रवणाचा महिना. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून वर्णन केले जाते. श्रावण सरीवर कुसुमाग्रज लिहितात, हसरा लाजरा, जरासा साजिरा, श्रावण आला…

श्रावण महिन्यात कितीतरी सणसमारंभ येतात. म्हणून त्याला सणांचा राजा असे म्हटले जाते. कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांच्या आवडीचा श्रावण महिना. श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.

श्रावण महिना दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना. याच श्रावण मासारंभच्या पाचव्या दिवशी येणारा सण म्हणजे नागपंचमी. म्हणजेच व्रतवैकल्याचा राजा मानला गेलेल्या श्रावणातील पहिला सण हा नागपंचमी. श्रावण शुक्ल पक्षातील पाचवी तिथीनुसार ही नागपंचमी साजरी केली जाते. श्रावण सोमवारसोबतच भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या नागाची पूजाही केली जाते असे म्हणतात. नागपंचमीच्या दिवशी नाग, साप दिसले की ते शुभ मानले जाते. कारण नागाची पूजा केली की सुख, सौभाग्य तसेच धनप्राप्तीही होते असे मानले जाते. सापाबद्दलची समाजातील भय नाहिसे व्हावे व जनजागृती व्हावी असे नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे नागपूजन केले जाते.

यावर्षी आज २१ ऑगस्टला श्रावणातल्या पहिल्या सोमवारी नागपंचमी आली आहे. नाग शिवाच्या गळ्यातील अलंकार महादेवाचं या प्रतिकापैकी एक महत्त्वाचे प्रतीक आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक नाग. या सापाला शेतकऱ्याचा मित्रही म्हटले जाते. कारण साप शेतीतील उंदीर, घुशी खाऊन टाकतो आणि शेतीचे नासाडीपासून रक्षण करतो. यादिवशी घरोघरी नागदेवाची पूजाअर्चा करण्याची प्रथा आहे. यादिवशी स्त्रिया हळद-कुंकू,चंदनाने नाग-नागिणी व पिल्ल्यांचे चित्र एका पेपरवर काढून तो पेपर देव्हाऱ्यासमोर असलेल्या भिंतीवर चिटकवतात. दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजाअर्चा करतात.

शहरात होत नसले तरी गावात अजूनही प्रथा-परंपरेनुसार सण समारंभ साजरे होतात. मला आठवते माझ्या बालपणी आई सांगायची की, यादिवशी काहीही चिरू, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, भाजू नये, कुणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये, केस विंचरू नये, याचे कारण तसे विचारले असता नागदेवतेच्या बाबतीत होते. उदाहरणार्थ भाजी कापली तर नागाला कापल्यासारखे होते म्हणून तसे करीत नाही. यावर उपाय काय तर आम्ही आदल्याच दिवशी पुऱ्या बटाट्याची भाजी करून ठेवायचं. काही ठिकाणी फुलोरा केल्या जातात. प्रत्येक सण आपापल्या प्रथेप्रमाणे करण्याचा अजूनही प्रयत्न करतात. असे अनेक संकेत आहेत. नागपंचमीच्या प्रत्येक छोट्या छोट्या नागाच्या मंदिराला रंगरंगोटीने सजविले जाते. तिथे पुरुष मंडळीला फक्त परवानगी असते. तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती नागाला शेंदूर लावून, रुईच्या फुलाचा हार चढविला जातो, नारळ फोडून तिथेच ठेवायचा, धानाच्या लाह्या व प्रसाद ठेवून बाकी उरलेल्या लाह्या घरी आणून घरभर चार दिशांनी ठेवल्या जातात. कारण नागदेवता कोणत्याही दिशेने कधीही दर्शन देऊ शकतो. तसेच या दिवशी नागाला घेऊन फिरणारा, नागाचे खेळ दाखवणारा गारुडी प्रत्येक घरोघरी येऊन नागदेवतेचे दर्शन देतो. यादिवशी नागदेवतेचे दर्शन हे शुभ मानले जाते. नागाचे दर्शन झाले की, वाटीत दूध देण्याची परंपरा अजूनही आहे. अशा प्रकारे श्रावण महिन्यातला पहिला वाहिला सण आणि अगदी हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला सण म्हणजे नागपंचमी. आज २१ ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. या वर्षी दुर्मीळ योग जुळून आलेला आहे.

चला तर मंडळी, आपल्या या श्रावण महिन्यातल्या पहिल्या नागपंचमीची आपण पूजाअर्चा करू या. अशा हा शिवाच्या गळ्यातला अलंकार असलेल्या नागदेवतेचे पूजनही करू या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -