
- ओंजळ : पल्लवी अष्टेकर
समाजात सभोवताली अनेक स्त्रिया आपण पाहातो. यातल्या अगदी मोजक्याच आपल्या व्यथा बोलून दाखवितात. नाहीतर अन्याय सोसणाऱ्या स्त्रिया भरपूर असतात. कुणाला कौटुंबिक, तर कुणाला आर्थिक अडचणी. अशा अनेक आघाड्यांवर लढताना कितीतरी स्त्रिया मानसिक घुसमट व कुचंबणा सहन करतात. आपल्या ‘व्यथा’ आपल्याच मनाशी दडवून ठेवतात.
वत्सलाबाईंचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आज मोठ्या थाटामाटात साजरा होत होता. त्यांच्या मुलाने, वसंतने घराजवळील मोठे कार्यालय या समारंभासाठी तीन-चार महिने आधीच ठरविले होते. वसंत आता एका चांगल्या, नावाजलेल्या बँकेत उच्च पदावर कार्यरत होता. त्याची पत्नी, दोन मुली आलेल्या पै-पाहुण्यांचे स्वागत करीत होत्या. कुणी फुलांचे सुंदर पुष्पगुच्छ, कुणी नक्षीदार साड्या, कुणी पैशांची पाकिटे अशा गोष्टी आहेर म्हणून आणल्या होत्या.
वत्सलाताई कार्यालयातील एका खुर्चीवर बसून आपल्याच विचारात गर्क होत्या. मध्येच डोळे पुसत होत्या. वत्सलाताईंचा भूतकाळ तसा संघर्षमय होता. याला कारण म्हणजे त्यांचे पती विश्वासराव यांनी आपल्या विक्षिप्त व संशयी वृत्तीने आपला संसार मोडला. वसंतच्या जन्मानंतर तीन-चार महिन्यांतच त्यांनी वत्सलाताई व लहानग्या वसंतची रवानगी अनाथाश्रमात केली. वत्सलाताईंच्या पायाखालची जणू जमीन सरकली. जेमतेम शिक्षण, पदरात पोर, बाहेरच्या जगाचा शून्य अनुभव. पुढचे आयुष्य आपल्या पोराला घेऊन कसे काढायचे? या प्रश्नाच्या विचाराने त्यांचे डोळे वारंवार पाण्याने भरून येत. कुठून तरी ही बातमी वत्सलाताईंच्या वडिलांपर्यंत पोहोचली व त्यांनी आपल्या लेकीसाठी अनाथाश्रमात धाव घेतली व तिला घरी आणले. वत्सलाताई तशा मानी स्वभावाच्या. त्यामुळे माहेरी राहणे, भावाच्या संसारात लुडबूड, उपऱ्यासारखे जीवन जगणे त्यांना कठीण वाटू लागले. ही व्यथा त्या वारंवार आपल्या आई-वडिलांकडे बोलून दाखवू लागल्या.
मग शेवटी वत्सलाताईंच्या वडिलांनी त्यांना एक भाड्याचे घर घेऊन दिले. आता खऱ्या अर्थाने वत्सलाताईंचे आयुष्य कष्टप्रद वळणावर येऊन ठेपले. लहानग्या वसंतला त्या जणू डोळ्यांत तेल घालून जपू लागल्या. नशीब एवढेच की त्यांचा सर्व घरखर्च, भाडे वडील द्यायचे. त्यामुळे नोकरीसाठी त्यांना कुठे बाहेर पडावे लागले नाही. यथावकाश वसंत मोठा होऊ लागला. दरम्यानच्या काळात वत्सलाताईंना जवळजवळ बारा-तेरा वेळा भाड्याची घरे बदलावी लागली. वसंत बुद्धिमान होता. त्याने उच्चशिक्षण घेऊन, बँकेच्या परीक्षा देऊन उत्तम नोकरी मिळवली. कर्ज काढून स्वतःचे घर घेतले. आईच्या कष्टाचे पारणे फेडले. विवाहबद्ध झाला. त्याची बायको व मुली वत्सलाताईंना प्रेमाने सांभाळायच्या. मुळातच मितभाषी असलेल्या वत्सलाताईंनी नियतीचा हा धक्का इतकी वर्षे मुकाटपणे सोसला. आपली व्यथा मनातच लपवत. पण आज त्यांना कृतकृत्य वाटत होते. मुलावर चांगले संस्कार करण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. ही सारी दृश्ये वत्सलाताईंच्या डोळ्यांसमोरून झरझर पुढे जात होती. तेवढ्यात त्यांच्या बहिणीने प्रेमाने त्यांचा हात धरला, तशा त्या भानावर आल्यावर व त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात समरसतेने सहभागी झाल्या.
कित्येक महिला आपल्या व्यथा मोकळेपणाने इतरांकडे व्यक्त करत नाहीत व मानसिक कुचंबणा सहन करत राहतात. आपल्या मैत्रिणीशी, बहिणीशी संवाद साधून त्यांनी आपली घुसमट, व्यथा तिच्यासोबत मांडली पाहिजे. यातून काही ना काही सकारात्मक मार्ग नक्कीच निघेल.
अजूनही खेडोपाड्यात बालविवाह, हुंडा यांसारख्या अनिष्ट प्रथा सुरू आहेत. अचानक पडलेल्या जबाबदाऱ्या, लहान वय, कमी शिक्षण अशा बाजूंनी स्त्रीच्या व्यथा वाढत जातात. मग ती आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकणार कशी?
मृदुला आपल्या माहेरच्या घरात नेहमी एका कोपऱ्यात काहीतरी कामात बुडून राहिलेली असायची. कुठे एखादी भाजी निवडत बस, कधी एखादे पेंटिंग रंगव, तर कधी खिडक्यांच्या काचा पूस. मी मृदुलाच्या वहिनीला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स शिकवायला जायचे. मृदुलाच्या वहिनीचे नाव प्रभा. प्रभाला दोन मुले होती.
मृदुला कधी-कधी आपल्या लहान भाच्यांना खेळवत बसे. घरात सतत माणसांची ये-जा असे. प्रभाचे सासू-सासरे, नणंद, नवरा, स्वतःची दोन मुले असा त्यांचा कौटुंबिक व्याप मोठा होता. कोणतेही काम करताना मृदूला सदैव आपल्याच विचारात गुंग असायची; परंतु तिच्या चेहऱ्यावर कधीही स्मितहास्य नसायचे. एकदा प्रभाने, तिच्या वहिनीने माझ्यापाशी आपले मन मोकळे केले.
प्रभा म्हणाली, “ताई, आम्हा घरच्यांना नेहमीच मृदुलाची चिंता वाटते. ती आपले सासर सोडून तीन वर्षे इथे आली आहे. तिकडे परतण्याचे नाव काढत नाही. “मला तिथे जायचे नाही”, इतकेच म्हणत राहाते. त्या लोकांशी भांडून ती इथे आली आहे. मुख्य म्हणजे तिचा नवरा, सासरची माणसे देखील तिला न्यायला इकडे आली नाहीत. मृदुला आमच्याशी सुद्धा कधी मोकळेपणाने बोलत नाही. आपली व्यथा सांगत नाही.” मध्ये कितीतरी वर्षे लोटली, पण मृदुलाने आपले माहेर काही सोडले नाही. आपल्या भाच्यांमध्ये रमणे, आवडीचे छंद जोपासणे, वहिनीला स्वयंपाकात मदत करणे अशा प्रकारचे आयुष्य ती व्यतित करू लागली.
आपल्या समाजात सभोवताली अशा अनेक स्त्रिया आपण पाहात असतो. यातल्या अगदी मोजक्याच स्त्रिया आपल्या व्यथा बोलून दाखवितात. नाहीतर अन्याय सोसणाऱ्या भरपूर असतात. कुणाला कौटुंबिक, तर कुणाला आर्थिक अडचणी. अशा अनेक आघाड्यांवर लढताना कितीतरी स्त्रिया मानसिक घुसमट व कुचंबणा सहन करतात. आपल्या व्यथा आपल्याच मनाशी दडवून ठेवतात व याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर सुद्धा दिसू लागतो.
तरीही इथेपर्यंत पोहोचलेले सामाजिक परिवर्तन, सुधारणा हे काही समाजसुधारकांची देणे आहे. स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या प्रयत्नात धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, महात्मा जोतिबा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, नानाजी देशमुख ही नावे पुढे येतात. त्या त्या काळाला अनुरूप अशा समाज सुधारणा या लोकांनी केल्या, त्यासाठी त्यांची लढाई मोठी होती.
भारत सरकारने काही वर्षांपासून महिलांना आर्थिक सुरक्षितता, शिक्षण, व्यवसाय, रोजगार अशा विभागात विविध योजनांचा समावेश केला आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘वर्किंग वुमेन हाॅस्टेल स्कीम’, ‘वन स्टाॅप सेंटर स्कीम’, ‘स्वाधीन ग्रेह’, ‘महिला शक्ती केंद्र’ अशा विविध योजनांचा त्यात समावेश आहे; परंतु या योजना गरजू घटकांपर्यंत पोहोचून, त्या समजावून घेऊन त्याचा फायदा महिला वर्षांनी घेतला पाहिजे. महिलांना सक्रियतेने या योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी निर्णयक्षमतेत त्यांची जाणीवपूर्वक गुंतवणूक असणे जरुरीचे आहे. महिलांना समान संधी मिळण्यासाठी व सामाजिक प्रगतीकडे झेप घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असेल.
समाजातील माणुसकी जिवंत ठेवायची असेल, तर आपण प्रत्येकाने यासाठी खारीचा वाटा उचलायला हवा. खासकरून, सुशिक्षित महिलांनी गरजू महिलांना बँका, पोष्ट यांचे फाॅर्म भरायला शिकवणे ही आपली नैतिक जबाबदारी समजून पार पाडली पाहिजे. थोडक्यात, इतरांच्या व्यथा दूर करण्याएवढी करूणा आपण जवळ बाळगूया.