- ऐकलंत का! : दीपक परब
प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘तीन अडकून सीताराम’
‘तीन अडकून सीताराम’ हे… नाव ऐकून जरा वेगळेच वाटत असेल ना? हे असे कसे नाव? तर हा कोल्हापुरातील एक वाकप्रचार आहे. अर्थात याचा अर्थ तुम्हाला हा चित्रपट आल्यावरच कळेल. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात कोण प्रमुख भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुनिया गेली तेल लावत, अशी टॅगलाइन असणारा हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
नुकत्याच झळकलेल्या ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तीन अंक दर्शवणारा एक हात दिसत असून त्या हातात बेडी दिसत आहे, तर बेडीच्या दुसऱ्या बाजुला स्माईली दिसत आहे. याचा नेमका संबंध काय, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. हृषिकेश जोशी हे नेहमीच हटके विषय हाताळतात, त्यामुळे या चित्रपटातही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की!
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, संपूर्ण कुटुंबासोबत पाहावा, असा हा विनोदी चित्रपट आहे. प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढेल. चित्रपटाचे निर्माते अतिशय ताकदीचे आहेत. त्यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. अशा निर्मात्यांसोबत काम करताना चांगली ऊर्जा मिळते. साहजिकच त्याने उत्कृष्ट कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर होते. एकंदरच चित्रपटाची संपूर्ण टीम भारी आहे. हळूहळू एक एक गोष्टी समोर येतीलच.
‘राणी मी होणार’च्या कलाकारांनी केले ग्रुमिंग
आयुष्य बदलवणाऱ्या स्वप्नांची उमेद बाळगणाऱ्या ‘ती’ची कहाणी आता लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ खिरीद आणि संचिता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘राणी मी होणार’ या मालिकेचा प्रोमो झळकला असून हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रोमोमध्ये सिद्धार्थ आणि संचिता एका पार्लरमध्ये काम करताना दिसत आहेत. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेतील कलाकारांनी एक ॲक्टिव्हिटी मीडियासोबत केली. त्यांनी खऱ्याखुऱ्या पार्लरमध्ये जाऊन एक्सपर्ट्सच्या मदतीने पत्रकार मंडळींचे, कस्टमर्सचे ग्रुमिंग केले. नेलआर्ट, आय मेकअप, हेअर स्टाईल अशा सलोन सर्व्हिस त्यांनी दिल्या. या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, त्यांचे ब्युटी, मेकअप सिक्रेटस् शेअर केले. यानिमित्ताने कलाकारांनीही खऱ्या पार्लरमध्ये सर्व्हिस देण्याचा अनुभव घेतला. ‘राणी मी होणार’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांची मालिकेविषयीची उत्सुकता वाढली आहे. येत्या २१ ऑगस्टपासून सोनी मराठीवर रात्री आठ वाजता ‘राणी मी होणार’ ही नवी मालिका सुरू होत असून ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार पाहाता येणार आहे.
‘डायरी ऑफ विनायक पंडित’चे गीत प्रदर्शित
एका कलाकाराची जीवनगाथा सांगणाऱ्या ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ या वेबफिल्ममधील ‘चाहूल’ हे सुरेल गाणे प्रदर्शित झाले असून नव्या नात्याचे पाऊल टाकणाऱ्या या गाण्याला अभय जोधपूरकर यांचा हृदयस्पर्शी आवाज लाभला आहे. तर निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मयूर करंबळीकर यांचे बोल लाभले आहेत. हळुवार फुलत जाणाऱ्या नवीन नात्याचे खूप सुंदर वर्णन या गाण्यातून केले आहे.
चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॅम प्रोडक्शन सहनिर्मित या वेबफिल्मचे दिग्दर्शन मयूर शाम करंबळीकर यांनी केले असून अक्षय विलास बर्दापूरकर हे ‘डायरी ऑफ विनायक पंडित’चे सादरकर्ते आहेत, तर आदित्य विकासराव देशमुख, वेदांत विवेक मुगळीकर हे निर्माते आहेत. हे गाणे थेट मनाला भिडणारे आहे. अतिशय अर्थपूर्ण असे हे गाणे नवीन नात्यातील बंध दर्शवत आहे. हे तरल गीत संगीत प्रेमींना नक्कीच आवडेल, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक मयूर शाम करंबळीकर यांनी व्यक्त केली आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra