
आला पाऊस पाऊस...
आला पाऊस पाऊस
वेडा वारा पिसाळला
झाडे वेली अवचित
म्हणे घातला गं घाला
सरी धावल्या ओळीने
धरतीला भेटायाला
गच्च मिठीत बिलगुनी
लागल्या गं भिजायाला
बंध बांधून पंखाचे
वारा ओढतो ढगाला
हट्ट किती करशील
पडू दे रे थांब मला
हट्टापुढे वादळाच्या
वारा रडाया लागला
गडगड हुंदक्यांनी
अश्रू ढाळत तो गेला
धरणाच्या कुशीमध्ये
दुःख जिरवून सारे
वर येऊन खेळला
कोंबासवे मोती हिरे
- प्रा. मानसी मोहन जोशी, ठाणे प.
पाऊस...
भरून येते आभाळ…
ऐकण्या रिमझिम पावसाची
मन बैचेन होते…
पावसाच्या रेषांची आभाळात
उमटते अचानक नक्षी…
हिरवा साज लेण्यासाठी
मग धरतीही आसावते…
भर पावसात झाडांच्या
हिंदोळ्यावर पाखरांची गाणी…
मन पाऊस भिजूनी
चिंब, चिंब होई…
असं येण पावसाचं
असते एक कविताच…
बरसते अविरत मनावर
कधी रिमझिम तर…
कधी कधी मुसळधार!
- ललिता पात्रे, मुलुंड
श्रावणराव आले...
श्रावणराव आले, श्रावणराव आले
सोनेरी पैंजण अलगद वाजले
धनूत सप्तरंग झळकले
सृष्टीला सलामी देऊन गेले ll१ll
महादेव शिवा मुठीत रंगले
व्रतवैकल्याने संयमाला जिंकले
गोविंदाने सवंगड्याना जमवले
दह्यादुधाच्या काल्यात भिजवले ll२ll
पोळ्याच्या सणाने बैल आनंदले
शेताला खुशीचे अंकुर फुटले
नागराज पुंगीत रमले
निसर्गचक्र सांगून गेले ll३ll
मंगळागौरीने परंपराना जपले
झिम्मा फुगडीने देवीला जगवले
सृष्टीलावण्य रंग, गंधाने नटले
मेघसरीत मयूर नाचू लागले ll४ll
प्रेम रेशीम धाग्यात बांधले
भावाबहिणीचे नाते बहरले
सागराने लाटांना थोपवले
नाखवानी त्यांना कवेत घेतले ll५ll
चैतन्य कणाकणात पाझरले
उत्साहाला उधाण आले
आनंद पक्षी गाऊ लागले
सृजनला पंख फुटले ll६ll
- अनुराधा मेहेंदळे, ठाणे
पाऊस (बालगीत)
आला आला पाऊस
ढगा आडून दारात
ढोल-ताशांचा आवाज
अचानक आला घरात...१
गार गार वाऱ्याची
झुळूक आली अंगणी
चिंब चिंब भिजण्यास
आल्यात सर्व मैत्रिणी...२
मौजमस्ती करण्यात
झालो आम्ही दंग
सर्वत्र दिसत होते
छान हिरवे हिरवे रंग...३
बेडकाचा डराव डराव
आला हळूच कानी
नाचत होती तरीही
मोरासोबत वर्षाराणी...४
कागदाची होडी
पाण्यावर तरंगली
चढाओढ आमची
पावसात रंगली...५
टपटप शुभ्र टपोऱ्या
आल्या अंगणी गारा
आईच्या हाकेने मात्र
धूम ठोकली घरा...६
- सपना भामरे, ठाणे
वाडा...
बालपणीचे वाड्यामधले
दिवस अजून ते स्मरती,
त्या दिसांच्या आठवणीत हे
दिवस आजचे सरती...
वाड्याच्या चौकातील तो
लपाछपीचा डाव,
सुतलेला मांजा अन्
पतंगाचा ताव...
विट्टी-दांडू, आट्यापाट्या
बुद्धिबळातील चाल,
भिंतीवरची चुकचूकणारी
सरपटणारी पाल...
सणासुदीला अंगणातली
रांगोळीची नक्षी,
वाड्यामधल्या पिंपळावरचे
किलबील, किलबील पक्षी...
शेजारच्या काकूंचा तो
पोरांवरचा धाक,
कोपऱ्यातल्या आजीची ती
मधाळ, प्रेमळ हाक...
भिंतीवरच्या खुंटीवरची
आजोबांची पगडी,
परसदारीच्या दोरीवरची
नऊ वाराची लुगडी...
गौरी-गणपतीतला तो
सजावटीचा थाट,
दिवाळीतले फराळाचे
गच्च भरलेले ताट...
ताई, माई, ठकी, दादा
साऱ्यांचा तो दंगा,
वाड्याच्या खांबावरचा
एकच काळा भुंगा...
असेच काही छोटे-मोठे
सुख-दुःखाचे क्षण,
वाड्याच्या दरवाजासारखे
मनात माझ्या बंद.
- स्वागत थोरात
श्रावण : प्रेमांकुर...
प्रेमांकुर फुटे आभाळा
बघूनी लावण्या अवनी |
आला भेटण्यास प्रियेला
सवे अमृतसंजीवनी ||१||
ताटवा मोहक फुलांचा
झुला वसुंधरेचा झुले |
गंधाळलेली तृप्त धरा
मनमोगरा माझा फुले ||२||
पंख बालदिवाकराचे
खुलवी शोभा आकाशाची |
दूर होता सारे मळभ
वाट मोकळी प्रकाशाची ||३||
उत्साह मोती उधळण
थेंब अल्लड झेलताना |
मोहरे काया रोमांचाने
स्पर्श खट्याळाचा होताना || ४||
बरसत्या श्रावणधारा
भव्य सण, उत्सव वेळ |
नागदेवता पूजा कधी
कधी मंगळागौर खेळ ||५||
निनादे गोकुळाष्टमीला
अति जल्लोष विलक्षण |
फडकवितांना तिरंगा
चढे रोमरोमी स्फुरण ||६||
भावते माझ्या शंकराला
शिवामूठ सात्त्विकतेची |
बंध राखीचे देई साक्ष
दृढ नात्याच्या जाणिवेची ||७||
मोहक निसर्गाविष्कार
मनभावन श्रावणात |
नवचैतन्य अनुभूती
तेजोमय चराचरांत ||८||
- दीपाली वाणी, ठाणे
मला वाटतं...
असावा कोणीतरी सुखदुःखात साथ देणारा,
कुठे जातेस काय करतेस सांभाळून राहा म्हणणारा...
वाटतं असावा कोणीतरी जीवाला घोर न लावणारा,
कशी आहेस म्हणत मला सतत समजून घेणारा...
वाटतं असावा कोणीतरी दिसताच भुरळ पाडणारा,
आपल्या सुंदर नेत्र कटाक्षाने अंतर्मन ओळखणारा...
वाटतं असावा कोणीतरी हळुवार मोर पीस फिरवणारा,
आपल्या प्रेमळ सहवासाने जगण्यातला आनंद सांगणारा...
वाटतं असावा कुणीतरी सतत भोवती रुंजी घालणारा,
घाबरू नकोस मी आहे मला केव्हाही साद घाल म्हणणारा...
वाटतं असावा कोणीतरी हातात हात घट्ट धरणारा,
कुठल्याही कठीण परिस्थितीत डोळसपणे मला शोधणारा....
- स्मिता शाम तोरसकर
श्रावणघन !
आली अंगणात माझ्या
घनश्रावणाची सर,
रिमझिम बरसते
सोनसळी मोतीचूर! ...१
गर्द पोपटी हिरवे
तृणपाते गोजिरवाणे,
धुंद-फुंद गंधाळते
काळ्या मातीचे उखाणे! ...२
धरित्रीने हिरवाई
जणू पांघरली शाल,
घेत गिरक्या मुरक्या
वारा वाहे झुळझुळ! ...३
ऊन केतकी कोवळे
वाहे दिशा ओसंडून,
अलवार येई कानी
एक मंतरलेली धून! ...४
शेत शिवारं झुलती
माथी केशरांचे मोर,
रानपाखरांच्या ओठी
गोड नादावतो सूर! ...५
रानावनात रंगतो
ऊन-पावसाचा खेळ
‘इंद्रधनू’ पालखीत
झुले निळाई आभाळ!.......६
सुगीच्या पावलांनी
आली सुखाची चाहूल,
कशी शिणल्या जीवाला
पडे श्रावणाची भूल!!.......७
- प्रा. डॉ. प्रकाश गोसावी, वायरी भूतनाथ, मालवण.