दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम
“विचारांची गूढ आवर्तने
त्याची खोल खोल गुहा
वाटेत उभा नैराश्याचा रावण
त्याला तोंडे दहा”
खरंच मानसिक ताण हा आज सर्वात मोठा शत्रू म्हणून आजच्या मानवजातीसमोर उभा आहे. एकीकडे शरीर सुदृढ करण्यासाठी, आयुष्य सुरक्षित करण्यासाठी मोठ मोठे संशोधक कार्यरत आहेत. पण प्रत्येक माणसाच्या आत दडलेलं मन सुरक्षित करण्याचं कोणत औषध असेल ज्याने होणारी घालमेल, अस्वस्थता, हरल्याची सातत्याने येणारी भावना बाजूला करून आयुष्याकडे नव्याने बघण्याची ताकद मिळेल? आज त्याच औषधाची मनुष्याला नितांत गरज आहे.
गेले पंधरा ते वीस दिवस कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील युवती नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण कोकण ढवळून निघाले आहे. एका बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणारी ही युवती बँकेला सुट्टी असल्याने आपल्या घरी बसने निघाली होती. मात्र ती घरी पोहोचलीच नाही. दोन दिवसांनी या दुर्दैवी युवतीचा मृतदेह दाभोळ खाडीमध्ये आढळून आला. हा मृतदेह ज्या अवस्थेत होता, तो पाहता युवतीचा मृत्यू घातपाताने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आणि या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करण्यात येऊ लागली. कोकणासह राज्यभरातील अनेक संघटनांनी या युवतीच्या मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा पोलिसांबरोबरच शासनाला दिला होता. त्यामुळे सामाजिक तणाव असतानाही पोलिसांनी प्रत्येक तपशिलाचा योग्य तपास करून नीलिमाचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले आहे; परंतु रत्नागिरी पोलीस इतक्यावर थांबले नाहीत, तर नीलिमाने असा मोठा निर्णय का घेतला? या विषयाच्या तळापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला आणि त्यामध्ये नीलिमाचे नोकरीतील नैराश्य, होणारी घुसमट, वरिष्ठांकडून होणारा त्रास यातूनच नीलिमाने आत्महत्या केल्याचे उघड झाले. यामध्ये नीलिमा ज्या बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होती तेथील एका अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पण यातला महत्त्वाचा निष्कर्ष असा की, नीलिमा तिच्या कामामुळे, आजूबाजूच्या वातावरणामुळे तणावात होती आणि या तणावातूनच तिने आत्महत्येसारखा आयुष्य संपवणारा निर्णय घेतला.
हाच तणाव आज अनेकांची मने कुरतडत आहे. आयुष्य स्पर्धा झाली आहे, या स्पर्धेत टिकण्यासाठी सतत धावावं लागत आहे, टिकून रहावं लागत आहे. त्यामुळेच प्रत्येकजण एकमेकांवर आपापला ताण ढकलत आहे आणि अनेकजण त्याला बळी पडत आहेत. मनुष्य जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात होता तेव्हा त्याच्या गरजा कमी होत्या. पण तो सुखाने राहत होता, आनंदात राहत होता. पण मनुष्याला प्रगतीचा, भौतिक सुखाचा ध्यास लागला आणि तो हळूहळू मनाच्या गुंत्यात अडकू लागला. समाजातील आर्थिक स्थिती हळूहळू असमान होऊ लागली. आर्थिक विषमतेमुळे एकमेकांबद्दल असूया अडी, मत्सर या भावना वाढीस लागल्या, सुखाच्या बदललेल्या व्याख्या जीवनात सुखाऐवजी अस्वस्थता घेऊन आली. पूर्वी महानगरांपर्यंत असलेली स्पर्धा आता हळूहळू गावागावांत पोहोचू लागली आहे. सोशल मीडिया याला अधिक खतपाणी घालताना दिसत आहे. ताण या एका शब्दाने मनुष्याला घेरून टाकले आहे. कुटुंबात, कार्यालयात, समाजात वावरताना हा ताण दिसतो आहे. कुटुंबाला सुखी करण्याची जबाबदारी असते, तर ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कामाच्या ठिकाणी अपेक्षित ध्येय गाठण्याचा ताण असतो. आपल्यावरील काम पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर त्या कामाचा ताण टाकला जातो आहे. ताण कमी करण्यापेक्षा तो वाटला जातो आहे, तो राक्षसासारखा मोठा होतो आहे, लोकांच्या आयुष्यावर परिणाम करत आहे.
युवा वर्ग यात सर्वाधिक ओढला जात आहे. आजच्या तरुण पिढीचा ताण त्यांच्या जन्मापासूनच सुरू होत आहे. शिक्षणापासून करियर, नोकरी, लग्न, चांगलं राहणं अशा सगळ्यात या पिढीला स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. आजूबाजूला जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. टिकायच असेल, तर धावत राहा इतकेच त्यांना अनेकदा शिकवलं जात आहे. त्या स्पर्धेतून ताण-तणावाचा सामना या मुलांना लहानपणापासूनच करावा लागत आहे. ज्यांना हा ताण सहन होत नाही ते मग आयुष्य संपवण्याचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. अशा वेळी समुपदेशन, आपल्या माणसांची साथ, विश्वासाचे, आनंदाचे वातावरण, कुटुंबाचे भक्कम पाठबळ या सगळ्या गोष्टी जरी छोट्या दिसत असल्या तरीही त्या महत्त्वाच्या आहेत. आपल्या प्रथा, परंपरा आपल्याला याच गोष्टी शिकवत असतात. त्या जपून ठेवणे आवश्यक आहे, तरच या ताणाच्या राक्षसापासून सर्वांचीच मुक्तता होईल आणि नवी पिढी चांगल आयुष्य जगेल. ताणातून बाहेर पडाल, तरच एक निर्भेळ यश मिळेल.
“सापडेल तरीही यशाची वाट
हा अंधार मिटेल
आशेचा एक किरण येतोच
फक्त वाट शोधत राहा”