Thursday, November 7, 2024
Homeसाप्ताहिककिलबिल'नावात बरंच काही!' कविता आणि काव्यकोडी

‘नावात बरंच काही!’ कविता आणि काव्यकोडी

नावात बरंच काही! 

आई मीसुद्धा लिहिणार
ताज्या नवीन कविता
कवितेच्या खाली लिहीन
माझे टोपणनाव ‘सविता’…

राम गणेश गडकरींचे
जसे नाव ‘गोविंदाग्रज’
वि. वा. शिरवाडकरांचे
जसे नाव ‘कुसुमाग्रज’…

‘केशवकुमार’ नावाचे होते
प्रल्हाद केशव अत्रे
‘बी’ नाव धारण करणारे
नारायण मुरलीधर गुप्ते…

‘संत रामदास’ नाव ज्यांचे
ते नारायण सूर्याजी ठोसर
‘आरती प्रभू’ नावाचे होते
चिं. त्र्यं. खानोलकर…

कृष्णाजी केशव दामलेंना
‘केशवसुत’ म्हणे, जो तो
त्र्यंबक बापूजी ठोंबरेंना
‘बालकवी’ सारेच म्हणतो…

आत्माराव रावजी देशपांडे
कवी ‘अनिल’ नाव लावत
माणिक गोडघाटेंना सारे
‘ग्रेस’ म्हणूनच ओळखत…

आई यांच्या कवितांनी
आनंदाची फुलवली बाग
यांची कविता चक्क बोलते
म्हणते हवे ते माग…

मीही आज कविता लिहून
लाविला कवितेचा दिवा
माझ्याही कवितेने घ्यावा
तुमच्या हृदयात विसावा…

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

१) दातातील कीड, बरी करते
अन्न टिकवायला, उपयोगी पडते
पादेलोण, सैंधव, त्याचे साथीदार
आयोडिन त्यांच्यात, असते फार

प्रमाण वाढले की, आरोग्य बिघडते
मिरच्यांच्या सोबतीने, मसाल्यात दिसते
सागरापासून थेट, येई ते घरात
सर्व रसांचा राजा, कोणास म्हणतात?

२) पिवळीधम्मक दिसे ही, सगुणाबाई
तिच्याशिवाय स्वयंपाकाचं, पान हालत नाही
जंतुनाशक गुण तिचा, उपयोगी भारी
खरचटल्यावर लावताच, करे जखम बरी

चुन्यासोबत आल्यावर, कुंकू तयार होते
अंगाला चोळल्यास, उजळपणा देते
रोजच्या जेवणात, घरगुती उपचारात
कोणती बरं वनस्पती, हमखास वापरतात?

३) खेळ खेळता येतो, हिशेब ठेवता येतो
माहितीचा खजिना, उघडून नवा देतो
मेल पाठवून पत्राचे, मिळवतो उत्तर
मनोरंजन करायला, सदा असतो तत्पर

घरबसल्या खरेदी, त्याच्यामुळे होई
ऑनलाइन बँकिंगला, वेळ लावत नाही
पदोपदी माणसाच्या, उपयोगी पडतो
कोण हा मित्र, जगाशी जोडतो?

उत्तर :-
१) मीठ
२) हळद
३) संगणक

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -