Tuesday, November 12, 2024
Homeसाप्ताहिककोलाजOld Hindi Songs : हम उस देशके वासी हैं...

Old Hindi Songs : हम उस देशके वासी हैं…

  • नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

आज बॉलिवूड चंगळवादाचा पुरस्कार करून, नव्या पिढीच्या मनातून बहुतेक भारतीय संस्कार पुसून टाकण्यात अग्रेसर असले तरी एके काळी अनेक दिग्दर्शक, कलाकार तत्कालीन नेत्यांच्या भाषणांनी, विचारवंतांच्या मोहिमांनी, पुस्तकांनी, प्रभावीत होत असत. अनेक निर्माते, दिग्दर्शक आपल्या कलाकृतीतून देशभक्तीचा, उच्च भारतीय नैतिक मूल्यांचा पुरस्कार करत. अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणण्यातही त्यांचा मोठा वाटा असायचा.

भूदान चळवळीचे अग्रणी विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचाराने भारून जाऊन कुणी एखादा सिनेमा काढला होता असे सांगितले, तर आज कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही. पण असे अनेक चित्रपट आले होते. उदाहरणच द्यायचे झाल्यास राजकपूरचा तब्बल ६३ वर्षांपूर्वीचा ‘जिस देशमे गंगा बहती हैं’चे देता येईल.

जयप्रकाश नारायणजींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक डाकूंनी शस्त्रे सरकारकडे समर्पित करून शरणागती स्वीकारली होती. चंबळचे डाकू विनोबा भावेंच्या विचाराने प्रभावित झाले आणि त्यांनी विनोबांना पत्र लिहून चंबळच्या खोऱ्यात येण्याचे निमंत्रण दिले. तब्येतीच्या कारणाने विनोबाजी जाऊ शकत नव्हते, पण त्यांनी हे काम जयप्रकाशजींवर सोपवले. पुढे अट्टल डाकूंच्या हृदयपरिवर्तनाने जो इतिहास घडला त्यामुळे जेपी आणि विनोबाजींची कीर्ती जगभर पसरली. एक आगळा संदेश सगळ्या गुन्हेगारी जगतापर्यंत पोहोचला.

या घटनेवर अर्जुन देव रष्क यांनी कथा लिहिली आणि राज कपूरने राधू कर्माकर यांच्या दिग्दर्शनाखाली त्यावर ‘जिस देशमे गंगा बहती हैं’(१९६०) काढला. डाकूंच्या शरणागती मागील तत्त्वज्ञानिक भाग बाजूला ठेवून कथेला रंजकतेची, भावनिकतेची जोड देताना हवे ते बदल केले. सिनेमाने त्या वर्षी अनेक पारितोषिके पटकावली.

‘राष्ट्रीय चित्रपट पारितोषिका’बरोबर ६ फिल्मफेयर नामांकने मिळाली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राधू कर्माकर, सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पद्मिनी, सर्वोत्तम सहायक कलाकार म्हणून प्राण यांना, तर संगीतासाठी शंकर-जयकिशन, गीतलेखनासाठी शैलेंद्र आणि गायक म्हणून मुकेश यांना नामांकन मिळाले होते.

अंतिम निर्णयात एकूण ४ पारितोषिके मिळाली. सर्वोत्कृष्ट निर्माता आणि अभिनेता म्हणून राज कपूर, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून प्राण आणि दोन पारितोषिके मराठी कलाकारांनाही मिळाली. सर्वोत्कृष्ट संपादनाचे जी. जी. मयेकरांना आणि सर्वोत्तम कलादिग्दर्शनाचे एम. आर. आचरेकर यांना!

राज कपूर ऊर्फ ‘राजू’ एका जखमी माणसाला मदत करून वाचवतो. त्याला हे माहीत नसते की, ज्याला आपण वाचवले तो डाकूंच्या टोळीचा सरदार आहे. तिकडे टोळीवाल्यांचा गैरसमज होतो की, राजू साध्या वेशातील पोलीस आहे. ते त्याला पळवून नेतात आणि एक रंजक कथा सुरू होते.

भोळाभाबडा ‘राजू’ डाकूंचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न करतो. त्याच्या तोंडी शैलेंद्र यांनी मुकेशच्या आवाजात दिलेल्या फिल्मफेयरप्राप्त गाण्यात तत्कालीन भारतीय समाजाचे फार सुंदर आणि खरे चित्र गीतकारांनी उभे केले होते. भारतीय मानसिकता सांगता-सांगता शैलेंद्रजींनी तत्कालीन भारताची व्याख्याच करून टाकली होती. गाण्याचे शब्द होते –
होठोंपे सच्चाई रहती हैं,
जहाँ दिलमें सफ़ाई रहती हैं,
हम उस देशके वासी हैं,
जिस देशमें गंगा बहती हैं…

आणि खरेच लोकांच्या बोलण्यात खरेपणा असायचा त्या काळी! माणसे भांडत नसत असे नाही पण तिसरा मध्ये पडला, तर समझोताही सहज होत असे. रागलोभ सोडून माणसे, नातेवाईक पुन्हा एक होत. माणुसकी आणि प्रेमाचा झरा आतूनच आटून जाण्याची आजच्यासारखी भयानक प्रक्रिया तेव्हा सुरू झालेली नव्हती!

खूप श्रीमंती, समृद्धी नसली तरी भारतीय माणूस तेव्हा आतिथ्यशील होता. ‘अतिथी देवो भव’ हे संस्कृतवचन हॉटेलमध्ये जाहिरात म्हणून लावले जात नव्हते. ती इथल्या जगण्याची रीत होती. संत कबीरदासनी म्हटल्याप्रमाणे ‘साई इतना देदे, जामे कुटुम समाय, मै भी भूखा न रहू, साधू भी भुखा न जाये.’ ही सर्वांच्याच मनातली प्रार्थना होती. सगळीकडेच एक ‘आहे त्यात समाधानाची’ भावना होती.
मेहमाँ जो हमारा होता हैं,
वो जानसे प्यारा होता हैं,
ज़्यादाकी नहीं लालच हमको,
थोड़ेमें गुज़ारा होता हैं,
थोड़ेमें गुज़ारा होता हैं.

शैलेंद्रजी, भारतीय मानसिकतेचे किती बारीक पदर स्पष्ट करतात पाहा. आपण सकाळी उठल्यावर जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी तिला नमस्कार करून पाय लागल्याबद्दल क्षमा मागतो.

ती उदात्त मूल्यव्यवस्था साहित्यात जमिनीला ‘धरणीमाता’ म्हणते आणि निसर्ग मानवरूपी आपल्या संततीचे कितीतरी अपराध सहन करत असतो हे लक्षात घेते. आम्ही अशा देशाचे रहिवासी आहोत ही गोष्ट कवीला गौरवाने सांगावीशी वाटते
म्हणून तो म्हणतो –
बच्चोंके लिये जो धरती माँ,
सदियोंसे सभी कुछ सहती हैं,
हम उस देशके वासी हैं…

साठच्या दशकापर्यंत केवळ १३ वर्षांपूर्वी मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव तो आनंद शिल्लक होता. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ, इंग्रजांविषयीचा रोष, स्वातंत्र्ययोद्ध्याबद्दल आदर, भक्ती याचे दर्शन अनेक सिनेमातून, गाण्यातून होत असे.

पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीची तुलना होऊन आपली संस्कृती कशी अधिक उदात्त आहे हे गीतकार/दिग्दर्शक गौरवाने सांगत. हल्लीसारखे जे जे भारतीय ते ते मागास असे मांडण्याची अहमहमिका विचारवंतात लागलेली नव्हती. त्यामुळे भारतीय जीवनपद्धतीचा गौरव साहित्यात, कलाविश्वात सहजच होऊन जाई –
कुछ लोग जो ज़्यादा जानते हैं,
इन्सानको कम पहचानते हैं,
ये पूरब हैं, पूरबवाले,
हर जानकी किमत जानते हैं,
मिलजुलके रहो और प्यार करो,
एक चीज़ यही जो रहती हैं,
हम उस देशके वासी हैं…

मात्र देशाभिमान म्हणजे केवळ वंशीय श्रेष्ठत्वाची जाणीव जोपासणे नाही. आम्ही जगाकडून जे चांगले ते शिकलो अशीही नोंद शैलेन्द्रजी घेतात. सहिष्णुतेचा उच्च वारसा असलेल्या हिंदू संस्कृतीने आक्रमकांचेही स्वागतच केले. त्यांना आपल्यात प्रेमाने सामावून घेतले, हेही गीतकाराला सांगावेसे वाटते.

त्याकाळी संपूर्ण देशावर नेहरूंचा प्रचंड प्रभाव होता. त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव होता. तरीही त्यांनी पूर्णत: साम्यवाद न स्वीकारता मधला मार्ग निवडला हेही शैलेन्द्रजी किती काव्यमय पद्धतीने सांगतात पाहा –
जो जिससे मिला, सिखा हमने.
गैरोंको भी अपनाया हमने,
मतलबके लिये अन्धे होकर,
रोटीको नहीं पूजा हमने,
अब हम तो क्या, सारी दुनिया,
सारी दुनियासे, कहती हैं
हम उस देशके वासी हैं…

आपला प्राचीन सांस्कृतिक वारसा, राज्य पद्धतीतील आधुनिक विचार, भारतीयाची उच्च नैतिक मूल्ये इतके सगळे एका गाण्यात बसवायचे, तेही डाकूंच्या हृदयपरिवर्तनासाठी? असले आव्हान लीलया पेलणारे गीतकार आता कुठे शोधायचे? म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -