स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षी १५ ऑगस्टला सलग दहाव्यांदा राजधानीतील लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केले. आपल्या भाषणातून देशहिताच्या पंचवीस महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केल्या. देशाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. जाहीर केलेल्या केंद्राच्या योजनांचा लाभ थेट सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी तळमळीने प्रयत्न केले. एकीकडे देशाची आर्थिक उन्नती झाली पाहिजे व दुसरीकडे सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावले पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता व आजही आहे. सन २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी लाल किल्ल्यावरून पहिले भाषण केले. प्रत्येक घरात शौचालय ही त्यांनी पहिली घोषणा केली. २०१४ पासून आजतागायत ११ कोटी ६८ लाख घरांमध्ये शौचालय उभारले गेले. उघड्यावर लोक शौचाला जायचे ते बंद होऊ लागले. शौचमुक्त गावांची संख्या ६ लाखांवर गेली. तसेच शौचमुक्त जिल्ह्यांची संख्याही ७०० वर गेली.
पहिल्या भाषणात त्यांनी जनधन योजनेची घोषणा केली होती. दि. २८ ऑगस्ट २०१४ ला त्याची सुरुवात झाली. देशातील सर्व परिवारांना त्याचा लाभ होतो आहे. या योजनेखाली देशात ४९ कोटी ७२ लाख जनधन खाती उघडण्यात आली आहेत. पैकी ग्रामीण भागातील खाती ६० टक्के आहेत. या खात्यांमध्ये २ लाख कोटी रक्कम जमा आहे.
पहिल्या भाषणात त्यांनी आदर्श ग्राम योजना जाहीर केली. त्याची सुरुवात ११ ऑक्टोबर २०१४ रोजी झाली. योजनेखाली ३३०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. पाचशे पंचायती बाकी आहेत. सन २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून स्टार्ट अप इंडियाची घोषणा केली. दि. १६ जानेवारी २०१६ रोजी त्याची सुरुवात झाली. आजवर १ लाख स्टार्ट अप सुरू झाले आहेत. सरकारदरबारी सात लाख उद्योजकांनी स्टार्ट अपसाठी नोंदणी केली आहे. याच भाषणात मोदींनी ‘ग्राम ज्योती योजना’ जाहीर केली. एक हजार दिवसांत देशातील १८ हजार ४५२ गावांना वीज देण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले. पण ९५७ दिवसांतच लक्ष्य पूर्ण झाले. सैन्य दलासाठी ‘वन रँक वन पेन्शन’ योजना त्यांनी २०१५मध्ये घोषित केली. २५ लाख माजी सैनिकांना त्याचा लाभ झाला. सन २०२२ मध्ये पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आली. सैन्य दलातील शिपाई १९ हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेत आहे.
सन २०१६ मध्ये मोदींनी प्रधानमंत्री पीक योजना जाहीर केली. १८ फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी झाली. ही योजना २७ राज्यांत तसेच केंद्रशासित प्रदेशात योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी १८ विमा कंपन्या, पावणेदोन लाख बँकेच्या शाखा, ४५ हजार सेवा केंद्रांची मदत घेण्यात आली. ऑक्टोबर २०२२ पर्यंत २५ हजार कोटींपेक्षा जास्त पीक विमा प्रीमियमचे वाटप झाले.
प्रगती प्रोजेक्ट या घोषणेनुसार स्वत: पंतप्रधानांनी दीर्घ काळ प्रलंबित अललेल्या साडेसात लाख कोटी खर्चाच्या ११९ योजनांचा आढावा घेतला व त्यांना लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
सन २०१७ मध्ये लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात जम्मू-काश्मीर प्रश्न सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी योजना सुरू झाली. काश्मीर खोऱ्यामध्ये सेम्पोरा औद्योगिक वसाहतीत मोठी विदेशी गुंतवणूक झाली. श्रीनगरमध्ये १० लाख चौरस फूट जागेवर मॉल व आयटी पार्क उभारण्यात येत आहे. तेथे १५ हजार जणांना रोजगार मिळू शकेल. गॅलेंट्री अॅवॉर्ड वेबसाइट या वर्षी सुरू झाली. वेबसाइटवर गॅलेंट्री अॅवॉर्ड विजेत्यांची सर्व माहिती उपलब्ध आहे. एक कोटीपेक्षा जास्त लोक वेबसाइटवर आहेत.
सन २०१८ मध्ये ‘आयुष्यमान भारत योजने’ची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू झाली. जवळपास १८ कोटी लोकांनी आयुष्यमान भारतसाठी कार्ड बनवले आहे. देशातील ५० कोटी जनतेला या योजनेचा लाभ मिळावा, असे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. देशभरातील १३ हजार इस्पितळातून ही योजना राबवली जाणार आहे. याच वर्षी पंतप्रधानांनी ग्राम स्वराज अभियान योजना जाहीर केली. देशातील २१ हजार गावांमध्ये ही योजना राबवली जाईल व केंद्र सरकारच्या योजना गाव पातळीपर्यंत पोहोचवल्या जातील. सन २०१९ मध्ये ‘जल जीवन मिशन’ची मोदींनी घोषणा केली. २०२४ पर्यंत सर्व गावांत घराघरांत नळावाटे पाणी पुरविणे हे लक्ष्य ठरवले आहे. एकूण १९ कोटी घरांत नळद्वारे पाणी पुरविण्याचे ठरविले आहे. आजवर १२ कोटी घरांना नळाची जोडणी देण्यात आली आहे.
या वर्षी देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन करण्याची पंतप्रधानांनी घोषणा केली. सन २०३० पर्यंत हे लक्ष्य गाठायचे आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था ३ ट्रिलियन असून भारत जगात ५व्या क्रमांकावर आहे. याच भाषणात पंतप्रधानांनी चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ नियुक्त करण्याची घोषणा केली. दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी जनरल बिपीनचंद्र रावत यांची या पदावर नेमणूक झाली. दुर्दैवाने ८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टर कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ३० सप्टेंबर २०२२ रोजी अनिल चौहान यांची चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ या पदावर नेमणूक झाली.
सन २०२० मध्ये पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची घोषणा केली. देशातील सर्व नागरिकांचा मेडिकल डेटा ऑनलाइन करणे हे त्याचा हेतू आहे. आजवर ३० कोटी लोकांनी आपले हेल्थ कार्ड लिंक केले आहे. याच वर्षी नवे शैक्षणिक धोरण जाहीर झाले. त्याची अंमलजबावणी जुलै २०२० मध्ये सुरू झाली. सन १९६८ व १९८६ नंतर स्वतंत्र भरतातील हे तिसरे शौक्षणिक धोरण आहे. याच वर्षी मोदींनी आपल्या भाषणात ‘भारत नेट प्रोजेक्ट’ची घोषणा केली, त्यानुसार प्रत्येक गावात इंटरनेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एक हजार दिवसांत ६ लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्शन देण्यात येणार आहे. या वर्षी ३१ जुलैपर्यंत १ लाख ९५ हजार ९१८ गावांतील पंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत.
सन २०२१ मध्ये १५ ऑगस्टला केलेल्या भाषणात मोदी यांनी ७५ वंदे भारत ट्रेनची घोषणा केली. आजपर्यंत २५ वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या होत्या. पहिल्यांदा या ट्रेनचा रंग निळा होता. नंतर तो भगवा करण्याचे ठरवले. सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याची घोषणा त्यांनी याच भाषणातून केली. देशभरात ३३ सैनिकी शाळा आहेत. सन २०२१-२२ पासून या शाळांमध्ये मुलींना प्रवेश देणे सुरू झाले.
सन २०२२ मध्ये पंतप्रधानांनी ‘पंचप्रण’चा उल्लेख केला. पुढील २५ वर्षांच्या प्रगतीचे ध्येय गाठण्यासाठी पंचप्रणांवर त्यांनी प्रकाशझोत ठेवला. ऐक व एकात्मता, देशाचे नागरिक म्हणून कर्तव्याची भावना, गुलामीच्या मानसिकतेला तिलांजली देणे, हे मुद्दे त्यांनी मांडले.
सन २०२३ मध्ये नवीन भव्य, शानदार व अत्याधुनिक सुखसोयींसह उभारलेल्या संसद भवनचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. १६३ वर्षांपूर्वीचे आयपीसी व सीआरपीसी कायदे बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गेल्या वर्षी त्यांनी भारतीय नौदलाचा ध्वजही बदलला. अगोदरच्या ध्वजावरील पंचम जॉर्जची प्रतिमा हटवून त्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा आणली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावर तब्बल १६ वेळा तिरंगा फडकवला. नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांनी प्रत्येकी १० वेळा, अटलबिहारी वाजपेयी यांनी ६ वेळा, राजीव गांधी व नरसिंह राव यांनी प्रत्येकी ५ वेळा, लाल बहादूर शास्त्री व मोरारजी देसाई यांनी प्रत्येकी २ वेळा, चौधरी चरणसिंग, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांनी प्रत्येकी एकदा लाल किल्ल्यावर पंतप्रधान म्हणून तिरंगा फडकवला. मोदी यांना पं. नेहरूंचा विक्रम मोडण्यासाठी अजून ७ वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवावा लागेल.