Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीPen Traffic : पेणमध्ये वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दादर सागरी पोलिसांचा मास्टर...

Pen Traffic : पेणमध्ये वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दादर सागरी पोलिसांचा मास्टर प्लॅन

जोहे-तांबडशेत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

पेण : देशासह संपूर्ण जगात पेणच्या गणेशमूर्तींची ख्याती आहे. मात्र ह्या मूर्ती विकत घेण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून विक्रेते हे स्वतःचे वाहन घेऊन येत असल्याने हमरापूर ते कळवे, दादर रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे जोहे-हमरापूर विभागातील सर्व सरपंच व ग्रामस्थांनी दादर सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे यांची भेट घेतली. अजित गोळे यांनी पोलिस व नागरिकांची एकत्र मीटिंग घेऊन योग्य नियोजन करत सदर मार्गातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला व तो यशस्वी देखील केला.

अजित गोळे यांनी गणपती कारखानदार, गणपती टेंपो चालक, मिनिडोअर रिक्षा चालक, एसटी प्रशासन व पोलिसांची दोन वेळा एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत सुंदर असा मास्टर प्लॅन तयार केला. दररोज पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी, गणपती कारखानदारांचे दोन सदस्य व नागरिक हे दररोज वाहतूक कोंडी दुर करण्यासाठी कार्यरत असणार असून दररोज त्यांचे नाव आणि नंबर या व्हॉट्स ॲप ग्रुपवर टाकण्यात येत आहेत. त्यातुन जर कुठे वाहतूक कोंडी झाली असेल तर ती दुर करण्यासाठी हे प्रयत्नशील असणार आहेत. त्याशिवाय जनजागृती म्हणुन दादर सागरी पोलिस स्टेशनच्या वतीने परिसरातील सहा ठिकाणी सूचनांचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत. संबंधीत सूचनांची व्हॉईस क्लिप तयार करून त्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार केला जात आहे.

‘गणपती वाहतूक नियोजन’ या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप तयार असून या ग्रुपमध्ये पोलीस, गणपती कारखानदार, एसटी प्रशासन, आजी – माजी सरपंच, पत्रकार, ग्राम पंचायत सदस्य, समाजसेवक व नागरिक यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झालीच तर त्याचा फोटो व माहिती सर्वांना समजण्यासाठी मोठी मदत होणार आहे. गणेशोत्सवा पर्यंत ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तयार केलेल्या आराखड्याचे सर्वांनी पालन करून सुखकर प्रवासासाठी सहकार्य करा असे आवाहन दादर सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित गोळे यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -