Sunday, May 4, 2025

कोलाजसाप्ताहिक

नशा...

नशा...
  • क्राइम : अॅड. रिया करंजकर

कॉलेजमध्ये असताना माधुरीने एका टपोरी मुलाशी पळून जाऊन लग्न केलेलं होतं. नंतर सुबोधला कळलं की, माधुरीच्या नवऱ्याला अनेक गोष्टींचे व्यसन होतं आणि या सर्व गोष्टींचा म्हणजे त्याचा व्यसनाचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये होत असून त्यांना मूल होत नाहीये.

अचानक एक दिवस सुबोधला फोन आला. ट्रू कॉलरवर वेगळंच नाव दिसत होतं. आपल्या क्लाएंटचा फोन असेल, असा विचार करून सुबोधने तो फोन उचलला. कारण सुबोध हा पेशाने वकील होता म्हणून त्याला वाटलं की, आपल्या क्लाएंटचा फोन असावा. फोन उचलल्यावर त्याला ओळखीचा आवाज वाटला पण नेमकं कोण आहे ते मात्र त्याला समजेना. समोरून ‘अरे, सुबोध मी माधुरी बोलते विसरलास की काय?’ असं जेव्हा विचारण्यात आले, तेव्हा सुबोध नेमकी कुठली माधुरी हा विचार करू लागला. अरे आपण कॉलेजमध्ये एकत्र होतो ना? तेव्हा कुठे सुबोधला लक्षात आले की, आपल्या कॉलेजची फ्रेंड माधुरी बोलत आहे.

सुबोधने तिला विचारलं, ‘अगं पण माझा फोन नंबर तुला कसा मिळाला, तर तिने फेसबुक, ट्रू कॉलर वगैरे असं काहीतरी कारण सांगून तिथून मला तुझा फोन नंबर मिळाला, असे उत्तर दिलं. कॉलेजमधली जुनी ओळख असल्यामुळे इकडच्या-तिकडच्या दोघांनी गप्पा मारल्या आणि सुबोधला काम असल्यामुळे त्याने तो फोन ठेवून दिला. त्यालाही प्रश्न पडला की, हिने एवढ्या वर्षाने मला का कॉल केला?

नंतर माधुरीने फोन केला होता, ही गोष्ट तो विसरून गेला. नेहमीप्रमाणे तो आपल्या कामाला लागला. दुसऱ्या दिवशी परत माधुरीचा कॉल आला. पण सुबोध आपल्या कोर्टाच्या कामात बिझी असल्यामुळे ‘नंतर करतो’ असं सांगून त्याने तो फोन बंद केला. थोड्या वेळाने व्हाॅट्सअॅपवर ‘कसा आहेस, जेवलास की नाही?’ असा मेसेज माधुरीने सुबोधला पाठवला. वेळ मिळाल्यावर त्याने व्हाॅट्सअॅप बघितला, तेव्हा माधुरीचा मेसेज त्याला दिसला. सुबोधला वाटलं की तिच्या नातलगाची कोणाची तरी केस असेल म्हणून तिने मला कॉन्टॅक्ट केलं असेल. आपण तिच्याशी बोललं पाहिजे.

सुबोधला असे अचानक कॉलेजमधले दिवस आठवू लागले. माधुरी त्याच्याच वर्गात होती. त्यांच्यात फक्त आणि फक्त मैत्रीच होती. कॉलेजला असताना माधुरीच वागणं हे चंचल असं होतं. कोणत्याही मुलाशी जाऊन ती लगेच मैत्री करत असे. कॉलेजमध्ये असताना तिने एका मुलाशी पळून जाऊन लग्न केलेलं होतं. ज्या मुलाशी माधुरीने लग्न केलेलं होतं. तो मुलगा टपोरी होता, एवढेच तिच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींना माहीत होतं आणि कॉलेज संपल्यावर प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे झाले. त्यामुळे कोणाचाही कोणाशी कॉन्टॅक्ट नव्हता. सर्व मित्र-मैत्रिणींचे लग्न झालेली होती. सुबोधला तर एक मुलगाही होता. वकिली व्यवसायामध्ये त्यांनी चांगला जम बसवला होता.

परत काही दिवसांनी माधुरीचा सुबोधला फोन आला. त्यावेळी सुबोधने तिला विचारलं, ‘तू आमच्या अगोदर लग्न केलं. कॉलेजला असतानाच मुलं काय करतात तुझी. चांगली मोठी मुलं असतील ना तुला.’ तेव्हा माधुरीने सुबोधला सांगितलं, ‘तिला काही मूलबाळ नाहीये आणि सुबोधने औपचारिकरित्या म्हणून नवरा काय करतो, कुठे नोकरीला आहे म्हणून विचारलं. माधुरी सांगायला लागली की, ‘माझा नवरा कुठेही नोकरी वगैरे करत नाही. तो लग्नकार्यामध्ये बँजो वाजवण्याचे काम करतो व काय मिळेल ते उद्योग तो करत असतो. कोणती नोकरी त्याला नाही.’ तेव्हा सुबोधला आठवलं की, कॉलेजला असताना आपले मित्र-मैत्रिणी बोलत होते की, माधुरीने एका टपोरी मुलाबरोबर लग्न केलेले आहे ते खरंच होतं.

नंतर बोलण्या-बोलण्यात सुबोधला कळलं की, त्याला अनेक गोष्टींचे व्यसन होतं. माधुरीने बोलताना या सर्व गोष्टी सुबोधला सांगितल्या आणि या सर्व गोष्टींचा म्हणजे त्याचा व्यसनाचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये होत असून त्यांना मूल होत नाहीये. ज्या गोष्टी सुबोधला सांगितल्या जाऊ नये, त्या सर्व गोष्टी माधुरीने सुबोधला सांगितल्या. नवरा-बायकोमधलं पर्सनल आयुष्य तिने सुबोधला सांगितलं. त्यानंतर तिचे रात्रं-दिवस सुबोधला सतत मेसेज येऊ लागले. ‘आज माझा नवरा घरी नाही, आपण बोलू’ अशा वगैरे प्रकारचे मेसेज सुबोधला येऊ लागले त्याच्यामुळे सुबोध हैराण झाला. आपण केव्हातरी भेटू आणि दोघेच कुठेतरी फिरायला जाऊ, अशा प्रकारचे मेसेज ती त्याला टाकू लागली. माधुरीचे सतत फोन, मेसेज सुबोधला येऊ लागले.

सुबोधला यामध्ये काहीतरी गडबड आहे असे वाटल्याने आपल्या वकील मैत्रिणीकडून सल्ला घेण्याचे त्याने ठरवलं. वकील मैत्रीणच का, कारण एक मैत्रीण त्याला अशा प्रकारचे मेसेज पाठवत होती म्हणून एक लेडी वकीलच सल्ला देऊ शकते असा सुबोधच्या मनात विचार आला. चाललेला सगळा प्रकार त्याने वकील मैत्रिणींना सांगितला. त्यावेळी वकील मैत्रिणीने सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला सांगितलं की, हा एक ट्रॅप आहे आणि त्याच्यात तुला अडकवलं जाणार आहे. कारण माधुरीचं तुमच्या कॉलेजमध्ये असताना लग्न झालेला आहे, तेही तिने पळून लग्न केले आणि एका टपोऱ्या, नशेबाज मुलाशी तिने लग्न केले. तिचा नवरा सगळ्या प्रकारचे व्यसन घेत असल्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळे तिला तिच्या नवऱ्याकडून कोणत्याही प्रकारचे शारीरिक सुख मिळत नसल्यामुळे त्यांना मूल होत नाहीये, हे तिच्या डॉक्टरने तिला सांगितलेला आहे. तिला तिच्या नवऱ्यापासून वेगळं व्हायचं नाही, कारण तिने पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिला परत घरातली लोक स्वीकारणारही नाहीत. हा टपोरी नवरा त्याला सोडून गेला, तर तिला जगणं मुश्कील करून ठेवणार आहे आणि आता तिला मूल हवे आहे. कोणत्याही स्त्रीला आपलं स्वतःचं मूल हवे असतं. कदाचित तिला तिचे नातेवाईक आता दोष देत असतील. म्हणून ती कदाचित तुला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे की, जेणेकरून तू तिच्या जाळ्यात अडकून तुझ्यापासून ती बरोबर राहील व हे तिच्या नवऱ्याचा आणि तिचं मूल आहे, असं जगाला ती सांगू शकेल.

मूल होण्यासाठी सुबोधचा वापर माधुरीला करायचा होता आणि पुढे मागे कदाचित मूल सुबोधचे असल्यामुळे तुला ती पैशासाठी ब्लॅकमेलही करू शकते. त्यावेळी सुबोधने वकील असूनही वकील मैत्रिणीला विचारलं की, मी माझ्या मिसेसला तिला दम द्यायला सांगतो आणि झालेला प्रकार मी माझ्या मेसेजच्या कानावर घालतो. वकील मैत्रिणीने त्याला सल्ला दिला की, तू तुझ्या मिसेसला याच्यातला अजिबात काय सांगू नको. जर तिला कळालं, तर ती तुझ्यावर कायमची आयुष्यभर संशय घेत राहील. तुझं काहीही नसताना तुझ्याकडे संशय आणि ती बघेल आणि विनाकारण तुझ्या संसारात विष कालवलं जाईल. सुबोधला आपल्या वकील मैत्रिणीचा सल्ला योग्य वाटला. कारण तो आपल्या कॉलेजची मैत्रीण आहे. म्हणून तिच्याशी बोलत होता. पण समोरची व्यक्ती पर्सनल गोष्टी त्याला सांगू लागल्यावर त्याला काहीतरी गोंधळ वाटला. पण तो नेमकं निर्णय घेऊ शकत नव्हता, म्हणून त्यांनी वकील मैत्रिणीचा सल्ला घेतल्यावर किती भयानक प्रकार असू शकतात, हे त्याला कळले आणि एका मोठ्या संकटात तो अडकला जाऊ शकत होता. त्यापासून तो योग्य वेळी सावरला गेला. आपल्याला ट्रॅप लावून अडकवलं जात होतं, याचा विचार त्याच्यात मनात आल्यावर त्याला मोठा धक्का बसला.

माधुरीचा नवरा नशिबाचा आहे, त्याचा परिणाम त्याच्या वैवाहिक जीवनावर होत आहे, म्हणून एखाद्या मित्राकडून आपल्या इच्छा पूर्ण करून घेऊन मुलाला जन्म देणे, असा भयाण विचार आज-काल नशेबाज असलेल्या नवऱ्यांच्या बायका करत आहेत, याची जराही कल्पना सुबोधला नव्हती. सुबोधला ब्लॅकमेल केलं जाऊ शकत होतं. योग्य वेळी योग्य अशा वकील मैत्रिणीचा सल्ला घेऊन स्वतःला या फासात अडकवण्यापासून वाचवलं होतं.

आज-काल सरास तरुण मुलं नशा करतात व त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर होतो. त्यांच्या आयष्यातील जोडीदार भरकटली जाते.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 

Comments
Add Comment