- कथा : रमेश तांबे
फडकणारा राष्ट्रध्वज जमिनीला टेकणे हा राष्ट्रध्वजाचा, राष्ट्राचा अपमान आहे, हे माहीत असल्याने पाहुण्यांना सलामी न देताच आकांक्षा सारे नियम मोडून राष्ट्रध्वजाला जमिनीवर पडू न देण्यासाठी जीवाच्या आकांताने धावली. सारे लोक श्वास रोखून तिच्याकडे बघू लागले.
आकांक्षाच्या शाळेत १५ ऑगस्टनिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने भारतीय लष्करातले माजी अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. त्यांच्यासमोर ध्वज संचलनाचा मुख्य मान आकांक्षाला मिळणार होता. गेला महिनाभर रोज शाळा सुटल्यावर शाळेच्या मैदानात कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू होती. लेझीम पथक, मल्लखांबाची प्रात्यक्षिके, झांज पथक, संचलन पथक शिवाय एक बॅण्ड पथक अशी तयारी सुरू होती आणि या सर्व पथकांचे नेतृत्व करणार होती आकांक्षा!
होय, कुमारी आकांक्षा राजाराम सातपुते! इयत्ता आठवी. उंच, शिडशिडीत बांध्याची, निमगोरी, जराशी सावळी वाटावी अशी आकांक्षा. गेली दोन वर्षे सतत संपूर्ण शाळेतून सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून विशेष प्रावीण्य मिळवलेली. कबड्डी, खो-खो याशिवाय सर्व मैदानी खेळांत तिने शाळेला भरपूर बक्षिसे मिळवून दिली होती. याच गुणांच्या जोरावर तिला ध्वज संचलनाचा बहुमान मिळाला होता. आपल्या मुलीचं कौतुक पाहण्यासाठी आकांक्षाचे आई-बाबाही उपस्थित होते. आकांक्षा वेळे आधीच शाळेत पोहोचली. सर्व सहभागी मुले हजर झाली होती. बरोबर ८ वाजता पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होते. शाळेचे मैदान गर्दीने फुलून गेले होते. त्यामुळे वातावरण भारून गेले होते.
क्रीडा शिक्षक भारदेसरांनी शिट्टी वाजवताच सारी पथके एका रांगेत उभी राहिली. आकांक्षा दोन्ही हातात तिरंगा धरून उभी होती. समोर एका उंच खांबाला तिरंगा झेंडा गुंडाळून बांधला होता. तेवढ्यात भारदे सरांनी “सावधान” असा कडकडीत “हुकूम” दिला अन् एकच मिनिटात कर्नल लक्ष्मीकांत सरपोतदार यांनी भारताचा तिरंगा आसमंतात फडकवला. तसा आज सकाळपासूनच वारा होता. त्यामुळे ध्वजारोहण होताच तिरंगा जोरात फडफडू लागला. तिरंग्यात ठेवलेल्या फुलांच्या पाकळ्या सगळीकडे विखुरल्या गेल्या अन् लगेच राष्ट्रगीताला सुरुवात झाली. सारे मैदान एकजात शांत होऊन राष्ट्रगीत म्हणू लागले. राष्ट्रगीत संपल्यावर प्रत्यक्ष कवायतीला म्हणजे संचलनाला प्रारंभ झाला. एक मोठा वळसा घालून सर्व पथके म्हणजे वाद्य पथक, पाठोपाठ कवायतीमधील मुले, मग लेझीम, पुढे झांज नंतर मल्लखांब प्रात्यक्षिके आणि सर्वांच्या पुढे आपली आकांक्षा! एक एक दमदार पावले टाकीत आकांक्षा पुढे चालली होती. गेला महिनाभर केलेल्या परिश्रमाचं आज चीज होणार होतं. तिरंगा लावलेली काठी छातीशी घट्ट धरून, ताठ मानेने आकांक्षा एक एक कदम पुढे चालली होती. सारेजण राष्ट्रप्रेमाने नुसते प्रफुल्लित झाले होते. मघापासून हळूहळू वाहणारा वारा आता जोरात वाहू लागला होता. मैदानावरची धूळ हवेत उधळू लागली होती. आकांक्षाच्या मनात पाल चुकचुकली. आता काही सेकंदातच आकांक्षा पाहुण्यांना सलामी देणार होती. आतापर्यंत समोर पाहून चालणाऱ्या आकांक्षाची मान क्षणभरासाठी डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याकडे गेली अन् त्या भरभर वाहणाऱ्या वाऱ्यात काय घडले कुणास ठाऊक तो उंचावर फडकणारा तिरंगा त्या उंच खांबावरून निसटला! अन् एकच आरडाओरडा झाला. ‘तिरंगा निसटला तिरंगा उडाला!’
आकांक्षा सर्वात पुढे अन् सावधही होती अन् तिला हेही माहीत होतं की तिरंगा मातीत पडू द्यायचा नाही. फडकणारा राष्ट्रध्वज जमिनीला टेकणे हा राष्ट्रध्वजाचा, राष्ट्राचा अपमान आहे. काही कळायच्या आत पाहुण्यांना सलामी न देताच आकांक्षा सारे नियम मोडून राष्ट्रध्वजाच्या मागे धावली. एक राष्ट्रध्वज आधीच तिच्या हाती होता आणि दुसऱ्या राष्ट्रध्वजाला जमिनीवर पडू न देण्यासाठी ती जीवाच्या आकांताने धावली. सारे लोक श्वास रोखून तिच्याकडे बघू लागले. चपळाई दाखवत आकांक्षाने शेवटी तो तिरंगा धावत जाऊन एका हाताने पकडला आणि ती जमिनीवर पडली, तिच्या गुडघ्यांना खरचटले, पण तिने दोन्ही तिरंगे वरचेवरच धरले. तसा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. कर्नल सरपोतदार, भारदेसर आकांक्षाच्या मागे धावले. कर्नलांनी तिच्या हातातला एक तिरंगा स्वतः घेतला अन् तिला हाताला आधार देत उभे केले. आकांक्षाने कर्नल सरपोतदारांना जखमांकडे दुर्लक्ष करीत एक कडकडीत सलाम ठोकला. कर्नलांनी आकांक्षाचा सलाम स्विकारून पुन्हा एकदा तिरंगा सरकफास मारून खांबाला व्यवस्थित बांधला. राष्ट्रध्वज पुन्हा फडकवला गेला. नंतर कर्नल सरपोतदारांनी आपल्या भाषणात आकांक्षाने दाखविलेल्या प्रसंगावधनाचे तोंडभरून कौतुक केले. राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी आकांक्षाने केलेल्या प्रयत्नांचा खास बक्षीस देऊन गौरव केला गेला. कर्नलांच्या शाबासकीची थाप पाठीवर घेऊन आकांक्षा घरी परतली, तेव्हा युद्धभूमीवरून परतणाऱ्या विजयी वीरासारखे तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होते. आकांक्षाकडे पाहून आई-वडिलांना तर आकाशच ठेंगणे झाले होते!
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra