Monday, April 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाजBlue Mountain in Sydney : सिडनी : ‘ब्ल्यू माऊंटन’!

Blue Mountain in Sydney : सिडनी : ‘ब्ल्यू माऊंटन’!

गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

जॅमिसन व्हॅलीमधील निळे धुके आणि नीलगिरीच्या झाडांतील तेलामुळे क्षितिजावर विखुरलेल्या निळ्या रंगाच्या छटेत पसरलेली पर्वतरांग म्हणजे जगप्रसिद्ध ‘ब्ल्यू माऊंटन’! ब्ल्यू माऊंटन हा पर्वतीय प्रदेश ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील न्यू साऊथ वेल्स राज्यात सिडनी येथे आहे. निलगिरी जंगलाचे वर्चस्व असलेले वाळूच्या खडकांचे हे पठार…

ऑस्ट्रेलिया; जगातील एक प्रगत देश! ऑस्ट्रलियाच्या व्हिसाची तारीख संपायच्या आधी आम्हाला ऑस्ट्रेलियाला जायचे होतेच. तरी योग यावा लागतो. त्याच दरम्यान सिडनी येथील ऑस्ट्रेलियन रहिवासी याचे मित्र डॉ. जोसेफ व पत्नी राणी यांचे आग्रहाचे आमंत्रण मिळाले. पूर्णतः सिडनीमधील आठ दिवसांच्या स्थानाचे आयोजन त्यांनीच केले. त्यातील हा एक दिवस.

‘उद्या १००-२०० पाऱ्याच्या चढायच्या आहेत’, असे डॉ. जोसेफ यांनी सांगताच माझी धडधड सुरू झाली. मला दमा असल्याने जमेल का? जावे का रद्द करावे या विचारांत रात्रभर झोप आली नाही. नास्ता करून निघालो. रस्त्यात गर्दी अजिबात नव्हती. गप्पा मारत बाजूचे डोंगर, झाडे परिसर पाहत दोन तासांनी जेनोलन लेणीपाशी आम्ही पोहोचलो. बाजूलाच निवास लॉज, हॉटेल, वॉशरूम सर्व सोयी होत्या.

जेनोलन नदीजवळील जेनोलन गुहा, निळ्या पर्वताच्या पश्चिमेकडील वाळवंटात स्थित आहे. हा एक अदभुत नैसर्गिक चमत्कार! लाखो वर्षांपूर्वीची सर्वात मोठी व जुनी चुनखडीच्या कोरल रिफचे अवशेष समाविष्ट असलेली एक खुली गुहा! ‘जेनोलन लेणी’ ही ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय संपत्ती आहे. आम्हा दोघांचे बुकिंग होते. बाजूचा बोर्ड वाचल्यावर लक्षात आले गुहेतील लेणी पाहण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

पर्यटकांचा एक ग्रुप आल्यानंतर एका विस्तारलेल्या डोंगराखाली आम्ही जमलो. मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार सर्व वयोगटातील पर्यटक पायऱ्या चढू लागले. सुरुवातीच्या पायऱ्या वगळता गुहेतील रस्ता खूप अरुंद, निमुळता, नैसर्गिक कमी-जास्त उंचीच्या पायऱ्या चढल्यानंतर विस्तीर्ण गोलाकार भागात निवेदकाने माहिती सांगितली. मला काही कळाले नाही. असे तीन वेळा काही चढ चढून, एका विशिष्ट उंचीपर्यंतच, दिवे असलेल्या जागेत सर्वजण थांबलो. ज्यामध्ये भूमिगत नद्या आणि वेगवेगळ्या आकाराचे शुद्ध पांढऱ्या, पिवळ्या, तपकिरी रंगाच्या छटेत नेत्रदीपक चुनखडीचे पुंजके, ग्रँड कॉलम स्फटिक लोंबकळताना आपण पाहतो. त्यावर पाडलेल्या गुहेतील रंगीबेरंगी विद्युत प्रकाशामुळे ते अधिकच चमकदार दिसतात. सागरी जीवाष्म आणि कॅल्साइटमुळे क्रिस्टलच्या अद्भुत सौंदर्याच्या चमकदार रचना पाहताना मला आपल्या भारतातील विशाखपट्टणच्या गुहेची आठवण आली. तेथेच नास्ता करून निळ्या पर्वताची जादूई बघण्यासाठी निघालो.

पर्यटकांच्या गर्दीवरून स्थळाची प्रसिद्ध समजते. कार पार्किंग मशीन बंद होते का काही प्रश्न होता हे आम्हाला कळले नाही; परंतु पार्किंगचे पैसे भरण्यासाठी तीन-चार ठिकाणी मित्र गेले. पैसे भरल्यानंतरच आम्ही चालू लागलो हे महत्त्वाचे.

प्रतिध्वनी पॉइंटकडे जाताना सुविचाराचे संदेश लिहिलेले खडक ठरावीक अंतरावर उभे होते. सरळ चालत टोकापाशी कठडा बांधलेल्या विस्तारित प्रतिध्वनी पॉइंटवर उभे राहताच जॅमिसन दरीतील खडकाळ वैभव, स्वच्छ मोकळे वातावरण, शुद्ध गार वारा आणि या प्रतिध्वनी पॉइंटच्या बाजूलाच स्थित असलेल्या, युनेस्कोचा जागतिक वारसा लाभलेल्या तीन बहिणीवर नजर स्थिरावते. दगड बनलेल्या तीन बहिणींचे, ‘थ्री सिस्टर्स सॅण्ड फॉर्मेशन!’ हे ऑस्ट्रेलियातील एक उल्लेखनीय ठिकाण. थ्री सिस्टर्सची स्वप्नवत उत्कट प्रेमाची कथा जागवत काही काळ तेथे थांबतो.

मिहनी, विमलाह, गुनेडू अशा तीन बहिणी जॅमिसन व्हॅलीमध्ये आपल्या जमातीसोबत राहात होत्या. त्यांचे दुसऱ्या एका नेपीयन जमातीतील तीन भावांसोबत प्रेम जमले. जातीबाहेर लग्न करायला परवानगी नसल्याने भावांनी जबरदस्तीने लग्न करायचे ठरविले. परिणामी दोन जमातीत झालेल्या युद्धात त्या मुलींचे आयुष्य धोक्यात आल्याने त्याच जमातीतील एका डॅाक्टरने त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे दगडांत रूपांतर केले. युद्ध संपल्यावर त्यांना मुली बनविण्याचे ठरविले. दुदैवाने युद्धांत तोच डाॅक्टर मारला गेला आणि त्या तीन बहिणी राॅक बनूनच राहिल्या. तीन बहिणींच्या डोंगरावर व दरीत जाण्यासाठी वेगळी वाट आहे.

प्रतिध्वनी पॉइंटच्या समोरील जॅमिसन व्हॅलीमधील निळे धुके आणि सभोवतालच्या नीलगिरीच्या झाडांतील तेलामुळे डोंगरांना प्राप्त झालेला, क्षितिजावर पसरलेल्या निळ्या रंगाच्या छटेत पर्वतरांग पाहणे हा आनंदायी अनुभव घेतला. हाच तो जगप्रसिद्ध ‘ब्ल्यू माऊंटन’! ब्ल्यू माऊंटन हा एक पर्वतीय प्रदेश, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील न्यू साऊथ वेल्स राज्यात सिडनी येथे आहे. निलगिरी जंगलाचे वर्चस्व असलेले वाळूच्या खडकांचे हे पठार. जागतिक वारसा लाभलेल्या निळ्या पर्वताचे क्षेत्र अंदाजे १०,००० स्क्वेअर मीटर असावे. कोतम्बा येथील निळ्या पर्वताजवळील हे निसर्गरम्य जग, डोंगराच्या कड्यापासून जॅमिसन व्हॅलीपर्यंत पसरलेले आहे. येथील सिनिक जगताचा अगदी जवळून अनुभव घेण्यासाठी जोसेफ सरांनी कोटाम्बोच्या सिनिक रेल्वेपाशी आम्हाला आणले.

१. दरीतील कोळशाच्या खाणीतून कोळसा आणण्यासाठी तयार केलेली ही सिनिक रेल्वे, आता पर्यटकांसाठी वापरली जाते. जास्त प्रवासी नेणारी, सर्वात वेगवान, पूर्णतः उतरत्या स्थितीत, ५२ अंशांच्या कोनातून सर्वात जास्त झुकणाऱ्या सिनिक रेल्वेत बसताच मी अक्षरशः कापत होते. वरून पारदर्शक आच्छादन असल्याने, ती रेल्वे खाली दरीत जाताना, दरीतील पर्जन्य वृष्टी असलेले डोंगर, निलगिरीचे बन पाहत जॅमिसन दरीतील बोस्टन स्टेशनला उतरतो. बोर्ड वॉक मार्गिकेमधून चालताना वेळ नसल्याने बाजूचे जंगल बघायलाही मन धजत नव्हते. बहुधा ही शेवटची गाडी असल्याने मनात भीती होती. संध्याकाळ झाल्याने उशीर झाला होता. आम्हीच पाठी होतो.

२. जास्तीत जास्त (८४) पर्यटकांना दरीत खाली घेऊन जाणे किंवा परत वर आणणारी सर्वात मोठी सिनिक केबल कार. वृक्षराजी बघायला अगदी डोंगराजवळ जातो.

३. काचेचा मोठा सुरक्षित डबा असलेली सिनिक स्काय वे आकाशमार्गातून, जॅमिसन दरीवरून जाताना काटुम्बाचा धबधबा जवळून पाहतो. तळाशी काच असल्याने आपण किती उंचावरून जात आहोत हे कळते. दरीच्या २७० मीटर उंचावरून जाणारी ऑस्ट्रलियातील सर्वात उंच एरीयल केबलकर!

४. तिन्ही केबल कारना जोडणारा २.४ किलोमीटरचा बोर्ड वॉक (सिनिक वॉकवे) जो जंगलातून जातो.

बाहेर येताच जोसेफ सर आमची वाट पाहत उभेच होते. त्यांच्यामुळे आम्हाला काहीच चौकशी करावी लागली नाही. तेथेच नाश्ता केला. सिनिक वर्ल्डमुळे, ‘ब्ल्यू माऊंटन’ येथील तीन वेगवेगळ्या वाहनांतून जात अगदी जवळून निसर्गरम्य जगाचा मिळणारा हा अनुभव जगात इतरत्र कुठे नसावा.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -