
- कोकणी बाणा : सतीश पाटणकर
कोकणातील रस्त्याला चौक्याच्या पुढे असलेल्या धामापूर गावाजवळ अगदी रस्त्यालगत आणि निर्मनुष्य जागेत असलेल्या कासारटाका या देवस्थानाला महाराष्ट्रातून खूप लोक येतात. कोकणातील कुडाळ-मालवण रोडवर असणारे कासारटाका देवस्थान भक्तांच्या नवसाला पावणारे आहे. श्रावण महिना वगळता वर्षभर या ठिकाणी नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी गर्दी असते.
मालवण शहरापासून सुमारे ११ कि.मी.वर असणारे कासारटाका हे धार्मिक ठिकाण. येथे असलेली हिरवीगार वनराई, त्यात खळखळत वाहणारे नदीनाले आणि येथील ओहोळावर वसलेले एक घुमटीवजा मंदिर म्हणजे बैरागी कासारटाका. श्रावण महिना वगळता वर्षभर या ठिकाणी नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी गर्दी असते. मात्र आषाढ महिन्यात तर येथे रविवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवसांत भाविकांची जत्राच भरलेली दिसून येते. येथे काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी जेवण शिजविण्यासाठी ओहोळाच्या काठावर एक छोटीशी इमारत बांधली आहे. पण ही इमारत अपुरी पडत असल्याने भाविक येथील जंगलातच जागेची साफसफाई करून अन्न शिजवितात. येथील भ्रमंती एक वेगळा आनंद देणारा असतो.
कासारटाका ते धामापूर हा भाग केवळ वनभोजन व धार्मिक पर्यटनासाठी आजवर प्रसिद्ध होता. मात्र या परिसरात जैवविविधतेचा अनमोल ठेवा आढळून आला आहे. अनेक दुर्मीळ प्रजातीमधील पशुपक्षी, फुलपाखरे, साप, बेडूक येथे दिसून आले असून यामुळे निसर्ग पर्यटनालाही या परिसरात मोठी संधी दिसून आली आहे. येथील वन्यजीव व पशुपक्षी अभ्यासक चंद्रवदन कुडाळकर यांनी आपल्या कॅमेऱ्यातून येथील जैवविविधतेचे अनेक दुर्लक्षित पैलू उघड केले आहेत.
या बैरागी कासार टाक्याविषयी एक दंतकथा प्रचलित आहे. शिवपूर्वकाळात येथे वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती. तेव्हा येथील लोक नद्या-डोंगरातून वाट काढत, पायी चालत व्यापारउदीम करत. त्या काळात कासार जमातीचे लोक महिलांना कंकण भरण्यासाठी गावोगावी हिंडायचेत. असा एक कासार मालवणहून चौकेमार्गे आपल्या धामापूर गावात जायचा. पहाटेच्या प्रहरी घराच्या बाहेर पडलेला हा कासार सूर्यमाथ्यावर आला की, मालवणला पोहोचायचा. मग दिवसभर महिलांच्या हातात कंकण भरून सूर्य पश्चिमेला झुकला की, उरलेल्या कंकणाचे गाठोडे घेऊन व कमरेला पैशाची थैली खोचून घरी परतायचा. हा या कासाराचा नित्यक्रम बनला होता. हा कासार घरी परतताना भरपूर पैसा अडका घेऊन येतो. याचा सुगावा काही लुटारूंना लागला आणि एक दिवस हा कासार घरी परतताना डोंगरात लपून बसलेल्या लुटारूंनी त्या कासाराला चहुबाजूने घेरून त्याच्याकडे पैशाची मागणी केली आणि त्या कारासाने याला नकार देताच त्या निर्दयी लुटारूंनी कासाराची मान धडावेगळी करून पैसा-अडका लुटून ते पसार झाले.
कासाराची धडावेगळी झालेली मान पाण्याच्या डबक्यात पडली. काही कालावधीनंतर कासाराचा अतृप्त आत्मा जागृत होऊन त्या भागात फिरू लागला व त्या निर्जन डोंगरामधून जाणाऱ्या वाटसरूंना मदत करू लागला. म्हणून लोक त्या कासाराला नवस बोलू लागले व मनोकामना पूर्ण होताच नवस फेडू लागले. नवसाला पावणाऱ्या या कासाराची मान टाकीत पडली म्हणून या स्थळाला बैरागी कासारटाका हे नाव पडले. बैरागी कासाराला मटणाचे जेवण फार आवडायचे. घरोघरी कंकण विकून आल्यावर मटण आणून जेवण करायचे आणि त्यावर मस्तपैकी ताव मारायचा आणि शांतपणे झोपायचे हा त्याचा दिनक्रम बनला होता. या कासारटाक्याला मटणाच्या जेवणाचा नवस बोलला की, आपली इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची भावना असल्यामुळे आजही लोक कासाराला जेवणाचा नवस बोलतात.
नवस फेडण्यासाठी भाविकांना येथेच जेवण बनवावे लागते. कासारटाक्याच्या डोंगरात पुरुष मंडळीच ओहोळाच्या पाण्यात अन्न शिजवितात. येथे शिजविलेल्या अन्नांची चव न्यारीच असते. येथे शिजविलेले अन्न घरी नेऊ नये असे सांगितले जाते. या ठिकाणी पूर्वी महिलांना प्रवेश नसायचा. पण आता पुरुषांबरोबरच महिलाही मोठ्या संख्येने येथे उपस्थिती दर्शवितात.कासारटाक्याच्या ओहोळात जेवणापूर्वी मनसोक्त डुंबणे ही इथे येणाऱ्या भाविकांची नित्याचीच बाब बनली आहे. रोजच्या ताण-तणावाच्या जीवनापासून अलिप्त राहणारे, रुक्ष जीवन विसरायला लावणारे असेच हे ठिकाण आहे. मालवण तालुक्यातूनच नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह, कोल्हापूर, गोवा, कर्नाटक येथून दरवर्षी हजारो भाविक कासारटाक्याला मटणाचा नैवेद्य दाखविण्यासाठी येथे येतात.
कासारटाका ते धामापूर गोड्याचीवाडी परिसरात केरळ, गोव्यासह सह्याद्रीच्या डोंगर कपारीत आढळून येणारे अनेक दुर्मीळ पक्षी त्यांनी चित्रबद्ध केले असून यामध्ये ‘क्लिपर’ या दुर्मीळ फुलपाखराबरोबरच ‘तामिळ लेसविंग’, ‘सावर्दन बर्डविंग’ या फुलपाखरांसह अनेक पक्ष्यांचाही समावेश आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ‘व्हेरीडीएटर फ्लाय कॅचर’, ‘ब्लॅकनेप मोनार्च’, ‘मिनी व्हेट’, ‘एशियन फ्लाय कॅचर’, ‘मलाबार व्हीस्लिंग ट्रश’, ‘व्हाईट रम्पेड शमा’, ‘रुफोर्स वुडपेकर’ आदी पक्ष्यांचा या परिसरात वावर दिसून आला आहे. तसेच ‘पन्पाडोअर ग्रीन पिजन’, ‘एम्बर्ल्ड ग्रीन पिजन’ म्हणजेच ‘पाचू कवडा’ या कबुतरांसह राज्यपक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एलोफुटेड ग्रीन पिजन’ हा पक्षीही येथे दिसून आला आहे. या परिसरात ‘ड्रॅगन फ्लाय’, ‘मलाबार डार्ट’, ‘स्टिमरुबी’, ‘फॉरेस्ट ग्लोरी’, ‘क्लिअरविंग फॉरेस्ट ग्लोरी’, ‘रिव्हर होली केअर’ हे पक्षीही दिसून आले आहेत.
हा परिसर निसर्ग संपन्नतेने नटला असून या नदीतील पाणी प्रदूषणविरहित असल्यानेच असे दुर्मीळ पक्षी येथे दिसून आले आहेत. झाडावर राहणारा ‘जांभळा खेकडा’देखील येथे दिसून आला असून ‘लाल खेकडा’, वेगवेगळे बेडूक व रंगीबेरंगी कीटक, देव गांडूळही येथे दिसून आले आहेत. या भागात पशूपक्ष्यांच्या अभ्यासासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून अभ्यासक व वन्यजीवप्रेमी फोटोग्राफर दाखल होत असून यातून निसर्ग पर्यटनाला चालना मिळत आहे.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)