रवींद्र तांबे
आज आपण ज्या व्यक्तींना विषयांचे तज्ज्ञ म्हणतो, ते त्यांनी विविध ग्रंथांचा अभ्यास करून मिळविलेल्या ज्ञानामुळे. हे ग्रंथ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ग्रंथालय होय. मात्र आजच्या युगात मोबाइलमुळे ग्रंथालयांची दुरवस्था होताना दिसत आहे. काही विचारवंत आपल्या परिसरातील ग्रंथालयात जाऊन, विविध ग्रंथांचे वाचन करून आपले विचार समाजापुढे मांडत असतात. यातून त्यांना समाज प्रबोधन करायचे असते. आजही जे वादविवाद होत असतात, त्याचे एकमेव कारण म्हणजे अपुरे वाचन होय. जे अभ्यासक असतात ते एखाद्या विषयावर व्याख्यान देत असताना जी उदाहरणे देतात त्याचे संदर्भ सुद्धा देत असतात. यासाठी संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याची पडताळणी सुद्धा करणे आवश्यक असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे वादविवाद होत नाहीत. अधिक सलोख्याचे संबंध निर्माण होतात. त्यात काही विचारवंत विविध वर्तमानपत्रे व नियतकालिकांमधून आपले विचार लिहीत असतात. त्यामुळे त्यांना लोक विचारवंत, लेखक म्हणतात. विचारवंत किंवा त्या विषयाचे तज्ज्ञ म्हणून घेण्यासाठी तसे त्या व्यक्तीला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यात जी व्यक्ती प्रामाणिकपणे मेहनत घेते ती यशस्वी होते.
सन २००० पर्यंत मोबाइल खूप कमी लोकांकडे होते. त्यांनतर लोकांच्या असुरक्षिततेबाबत अनेक प्रकार घडत असल्यामुळे मोबाइल सुद्धा मूलभूत गरजेच्या पंक्तीत बसला. अनेक लोकांना अपघातात मोबाइल वरदान ठरला. असे म्हणता म्हणता मोबाइलने सर्वच चित्र बदलून टाकले. मोबाइलच्या पायी नागरिक टीव्हीसुद्धा पाहत नाहीत. मग सांगा पुस्तके कशी वाचणार. आता तर प्रत्येक नागरिकांच्या हातात मोबाइल पाहायला मिळतो. सध्या नागरिकसुद्धा तासनतास मोबाइलवर वेळ घालविताना दिसतात. इतकेच नव्हे; तर मैदानात खेळायला गेलेली मुले मैदानाच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसून डोळे फाडून मोबाइलमध्ये रमलेली दिसतात.
मग सांगा मुले ग्रंथालयात जाणार कशी? आता सांगा मोबाइलवर निर्बंध जरी घातले तरी त्याची अंमलबजावणी कशी होणार? किंवा कोण करणार, याचे उत्तर अनुत्तरित राहते. तेव्हा मोबाइल धारकांनी याचा गांभीर्याने विचार करून आपल्या भविष्याचा विचार करता कामापुरता मोबाइलचा वापर करावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी उद्या म्हणण्यापेक्षा आजपासून शाळा, अभ्यास व इतर कामे करीत असताना आपण आपल्या शाळेच्या किंवा आपण राहात असलेल्या परिसरातील ग्रंथालयात गेले पाहिजे. प्रथम एखादे पुस्तक वाचायला आवडणार नाही. त्यासाठी ग्रंथालयात गेल्यावर ग्रंथालयाची इमारत पाहावी. त्यानंतर इमारतीच्या कपाटामध्ये कशाप्रकारे पुस्तकांची मांडणी केलेली आहे, त्याचे निरीक्षण करावे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे, अभ्यासाला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करावे. काही दुर्मीळ ग्रंथ असतील ते पाहावेत. तसेच भिंतीवर असणाऱ्या प्रतिमांकडे पाहावे. म्हणजे आपोआप आपल्या मनात पुस्तक वाचनाची आवड निर्माण होईल.
मुलांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन वाढवले पाहिजे. वाचनामुळे आपल्या जीवनाला गती मिळते. त्यासाठी मोबाइलचा कामापुरता वापर करावा. वेळ वाया न घालविता अधिकाधिक वेळ ग्रंथालयात घालवावा. कोण काय करतो, यापेक्षा आपण कोणत्या लेखकाची पुस्तके वाचली किंवा पाहिली हे महत्त्वाचे. मुलांना वाचनच सुसंस्कृत बनवू शकते. ग्रंथालयांचा विचार करता बऱ्याच शाळांच्या इमारती जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात गळती मोठ्या प्रमाणात होते. याचा परिणाम पुस्तके पावसाच्या पाण्यात भिजून जातात.
काही ठिकाणी ग्रंथालयात गेल्यावर ज्या ठिकाणी पाऊस लागल्यावर पाणी गळते, त्याठिकाणी बादली लावलेली दिसते. त्यात अनेक ग्रंथ भिजून चिंब झाल्याने एका कोपऱ्यात पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेले दिसतात. तर काही ठिकाणी लाखो रुपये खर्च करून इमारत बांधून कित्येक वर्षे पुस्तकांची वाट इमारत बघत असताना दिसते. तर काही ठिकाणी साफसफाई करायला स्टाफ नसल्यामुळे ग्रंथालयात धुळीचे साम्राज्य असल्यामुळे विद्यार्थी तिकडे जाणे दुर्लक्ष करतात. त्यात कपाटामध्ये असलेली पुस्तकेसुद्धा जुनी झाल्याने पुस्तकांमधील आतील काही पाने गहाळ झालेली दिसतात. तेव्हा विद्यार्थ्यांची एकच अपेक्षा असते ती म्हणजे पुस्तके नवीन असावीत. त्यात ग्रंथालयाची जागा स्वच्छ असावी.
मी प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ग्रंथालयात जाऊन जे वाचायला मिळत असे, त्याचे मन लावून वाचन केले. केवळ वाचन अभ्यासापुरते मर्यादित ठेवू नये. वाचनामध्ये सातत्य असावे. वाचनच प्रत्येकाच्या प्रवासात नवीन दिशा देत असते. त्यासाठी मोबाइलच्या दुनियेत ग्रंथालयांची जी दुरवस्था झालेली आहे, त्यासाठी शासनस्तरावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शासनमान्य जी ग्रंथालये आहेत, त्यांची स्वतंत्र इमारत आहे का? त्या इमारतीची डागडुजी दरवर्षी केली जाते का? पुस्तकांची वर्गवारी केली जाते का? विद्यार्थी नियमित येतात का? स्थानिक
दैनिकं वेळेवर येतात का?
त्याचप्रमाणे लोकांचा प्रतिसाद कसा आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावी लागतील. तसेच विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. जेणेकरून सध्याची पिढी मोबाइलपासून चार हात दूर राहील आणि तो वेळ ग्रंथालयात घालवतील. म्हणजे ग्रंथालयांची दुरवस्था होणार नाही. त्यासाठी शासन स्तरावर मोबाइलचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सांगून त्यांना मोबाइलपासून काही काळ दूर ठेवून ग्रंथालयात बसावयास सांगावे लागेल. म्हणजे आपोआप मोबाइलवर निर्बंध येऊन ग्रंथालयांची दुरवस्था दूर होण्याला मदत होईल.