
सफारी बुकिंग करणार्या एजन्सीविरोधात गुन्हा दाखल... नेमके प्रकरण काय?
चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासंदर्भात (Tadoba Andhari wildlife sanctuary) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या व्याघ्र प्रकल्पाला सफारी बुकिंग करणार्या एजन्सीने सुमारे १२ कोटी १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन (Wild connectivity Solutions) या सफारी बुकिंग करणार्या एजन्सीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करारनाम्यानुसार तीन वर्षांमध्ये एकूण २२,८०,६७,००० देय रकमेपैकी केवळ १०,६५,००,००० रकमेचा भरणा या एजन्सीने केला आहे. तर उर्वरित १२ कोटी १५ लाख रुपयांसाठी वारंवार पाठपुरावा करुनही उपयोग झाला नाही. त्यामुळे एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
नेमके प्रकरण काय?
'वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स' या कंपनीकडे गेल्या तीन वर्षांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी बुकिंगचे सर्व हक्क देण्यात आले होते. या कंपनीने बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करुन, अनेक प्रकारचे गैरव्यवहार करुन या प्रकल्पात चुकीच्या पद्धतीने बुकींग्ज केले, अशी शंका ताडोबाच्या अधिकार्यांना होती. त्यामुळे जुलै महिन्यापासून या कंपनीसोबतचं कंत्राट संपवण्यात आलं होतं.
मात्र त्यानंतर कंपनीबद्दलच्या गैरव्यवहारांची शंका अधिक बळावत गेली. ताडोबाच्या इतिहासात पहिल्यांदाच जिप्सी चालक आणि गाइड्स यांचाही दीड ते दोन महिने उलटून गेले तरीही पगार झाला नाही. यासंबंधी ताडोबाच्या समितीने एफआयआर दाखल केल्यानंतर आता कंपनीकडून फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळजवळ १२ कोटी १५ लाख रुपये या कंपनीकडे थकीत आहेत.
ताडोबाच्या नावलौकिकाला गालबोट
ताडोबा हा जगभरातील एक प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. हजारो लोक विश्वासाने ताडोबाच्या वेबसाईटला भेट देत असतात. अशा प्रकल्पाची तब्बल १२ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक होणं, ही गोष्ट ताडोबाच्या नावलौकिकाला गालबोट लावणारी आहे.