Tuesday, July 2, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सSalaam Shaab : सलाम शाब

Salaam Shaab : सलाम शाब

  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

मी नेहमीप्रमाणे घरातली कामं आवरत होते. तेवढ्यात मोबाइलवर मेसेज ट्यून वाजली. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण आज जरा उशिराने जाग आल्याने वेळेवर शाळेत पोहोचण्यासाठी माझी धावपळ सुरू होती. आवरून झाल्यावर एकदाची बाहेर पडले. पण आज बिल्डिंगच्या गेटमधून जाताना चुकचुकल्यासारखं झालं, कारण?… कारण त्याचा रोजचा, नेहमीचा ‘सलाम’ हा शब्द माझ्या कानी पडला नव्हता. आमचा वॉचमन आठ दिवसांसाठी त्याच्या गावी म्हणजे नेपाळला गेला होता. त्याऐवजी कोणी दुसरा बदली वॉचमन तिथे आलेला होता.

शाळेत गेल्यावर स्टाफ रूममध्ये मी मोबाइल उघडला तर चक्क वॉचमनचा मेसेज – “दीदी वो बदली लडका पानी बराबर छोड रहा हैं ना?” मला त्याच्या या मेसेजचं आश्चर्य वाटलं आणि कौतुकही. कारण इतक्या लांब जाऊनही तो त्याच्या कर्तव्याला विसरला नव्हता.

वाॅचमनच्या सलाम शाब, सलाम दीदी या शुभेच्छांनी आमची सकाळ सुरू होते. कोणतंही काम करायला तो कधीच नकार देत नाही, आपल्याला हवी ती वस्तू तत्परतेने आणून देतो, पैसे दिल्यावर नीट हिशोब करून ते परतही करतो. सकाळी वेळेत टाकीत पाणी सोडणं, बिल्डिंगमधील लाइट चेक करणं, बिल्डिंग व आवारातील झाड-लोट करून बिल्डिंग स्वच्छ ठेवणं, प्रत्येकाच्या अडी-अडचणीला धावून जाणं हा त्याचा सेवा भाव प्रत्येकाला भावतो. मदत करण्याचा जणू त्याने वसाच घेतला आहे. असं कोणतंही काम नाही की, जे त्याला जमत नाही. एकदा दिवाळीला मला लाइटचं डेकोरेशन करायचं होतं, तर त्याने स्वतः सारं सामान आणून दिव्यांच्या रोषणाईने आमचं घर उजळवून टाकलं.

वॉचमनच्या प्रामाणिकपणाचा सर्वांनाच खूप चांगला अनुभव आहे. हे लोक त्यांचं काम अथकपणे करतात. रात्री डोळ्यांत तेल घालून पहारा देतात आणि बिल्डिंगची राखण करतात. जोडीला फावल्या वेळात कार धुणं, दिवसभरात पडेल ते काम करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाकडेही वाईट नजरेने ते पाहत नाहीत. सर्वांशी नम्रपणे बोलतात.

बहुसंख्य वॉचमन नेपाळहून थेट भारतात येतात. एक-दोन वर्षं घरापासून दूर राहून नोकरी करतात आणि स्वतःचा व परिवाराचा पूर्ण खर्च भागवतात. त्यासाठी ते अतोनात मेहनत करतात. नेपाळहून थेट भारतात आल्यावर स्थानिक बोलीभाषाही ते लवकर आत्मसात करून इथल्या मातीशी घट्ट नातं निर्माण करतात. प्रत्येक कामात तरबेज असल्याप्रमाणे ते काम हे लोक हसतमुखाने पूर्ण करतात.

एकदा मी त्याला गावी जाताना त्याच्या मुलीसाठी म्हणून पैसे दिले, तर त्याने त्यातून आपल्या मुलीला नवीन फ्रॉक घेतला व व्हाॅट्सॲपवर तत्परतेने मुलीचा नवीन फ्रॉकमधील फोटो मला पाठवला. त्याला व त्याच्या मुलीला आनंदात पाहताना मला खूप बरं वाटलं.

आमचा हा वॉचमन एवढा कार्यतत्पर आहे की कधी आजारी असला तरीसुद्धा बिल्डिंगची रोजची लाइट आणि पाण्याची कामं तो न कंटाळता करत असतो. आजही तो एवढ्या दुरून आपलं कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करत होता.

रोज गेटमधून बाहेर पडताना त्याच्या सलाम शाब, सलाम दीदी या विनम्रतेने दिलेल्या शुभेच्छांवर आपणही एक छानसं स्माईल देऊन त्याला प्रतिसाद दिला की, तो समाधान पावतो. बाकी त्याला कसलीच अपेक्षा नसते. आज शाळेतून घरी आल्यावर समोरून ब्रेड आणण्यासाठी म्हणून नेहमीच्या सवयीने मी वाॅचमनलाच फोन लावला.

“अरे दीदी, आप कैसे फोन किये? मै इधर गांव आया हूं ना…कैसे हो आप शब लोग?” त्याने विचारलं.
“ठीक है ठीक है, आप लोग कैसे हो?”

“हम भी ठीक है दीदी… आपको मेसेज मिल गया ना? वह पानी वाला…”

“हां भाई मिल गया-मिल गया… आप यहां की चिंता छोडिये और वहा अब कुछ दिन मस्त रहिये”, असं सांगून मी फोन ठेवला आणि त्याच्या कर्तव्यदक्षतेला मनातल्या मनात सलाम ठोकला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -