गेल्या आठवड्यात एकदम चार नाटकं रंगभूमीवर आली आणि पुढल्या रविवारच्या पेपरात अजून चार नव्या येणाऱ्या नाटकांच्या जाहिराती पाहून प्रश्नच पडलाय की, गेले वर्षभर नाट्यनिर्माते जी बोंब मारतायत की, नाटकांकडे प्रेक्षकानी पाठ फिरवलीय, नाट्यउद्योग पूर्णतः डबघाईला आलाय, नाट्यनिर्मितीला पोस्टकोविड महागाईमुळे अत्यंत वाईट दिवस आलेत. हे जर खरं आहे, तर मग इतकी नवीन नाटकं का येताहेत? आणि ज्या अर्थी नवीन नाटके येताहेत तर मराठी नाटकांविरोधात आपल्याच मराठी निर्मात्यानी केलेला ओरडा खरा आहे की, ही निव्वळ धूळफेक केली जातेय? या सर्व बाबींचा परामर्श या लेखात घेणे अगत्याचे वाटले म्हणून एखाद्या नाटकाबाबत न लिहिता आजच्या रंगभूमीच्या अवस्थेबद्दल लिहिणे महत्त्वाचे आहे.
दिनांक ११ डिसेंबर २०२० रोजी कोविड बंदीनंतरचं पहिलं मराठी नाटक संगीत संत तुकाराम, पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात सादर झालं आणि दोन वर्षे ठप्प झालेला नाट्यव्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाला. मुंबईत पुण्याच्या तुलनेत जास्त निर्बंध असल्याने मुंबईतला नाट्यवसाय थोडा संथ होता. प्रशांत दामलेनी एका लग्नाची दुसरी गोष्टचे अर्ध्या प्रेक्षक संख्येत लागोपाठ तीन हाऊसफुल्ल प्रयोग केले. मराठी नाटक जसे शनिवार-रविवारप्रमाणे इतर वारांनाही चालते तसे इतर भाषिक नाटके होत नाहीत. ती फक्त शनिवार, रविवार ठरावीक नाट्यगृहातच सादर होत असतात; परंतु तेसुद्धा व्यावसायिकच होते, त्यामुळे त्यांचा मोर्चा मराठी नाट्यगृहांकडे वळला नसता, तरच नवल.
रवींद्र नाट्य मंदिर, साहित्य संघ मंदिर, दामोदर नाट्यगृह, शिवाजी मंदिर, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली, दीनानाथ नाट्यमंदिर अशा अस्सल मराठमोळ्या नाट्यगृहावर काही काळ गुजराती, हिंदी नाटकांचे बोर्ड झळकले होते. मात्र हे अतिक्रमण अमराठी प्रेक्षकांनीच हटवले होते. मराठी नाट्यगृहांची शिस्त, नियम व सोपस्कार, नाटक केवळ आणि केवळ एन्जाॅय करायला येणाऱ्या प्रेक्षकांना रुचले नाही आणि मराठी नाटकांचा मार्ग पूर्ववत मोकळा झाला; परंतु मर्यादित काळासाठी का होईना, घुसखोरी करणाऱ्या या अमराठी नाटकांनी तिकीट दर वाढवण्यास हातभार लावला. कमीत कमी ५० रुपयांचे तिकीट ३०० रुपयांवर नेऊन ठेवले. थिएटर व्यवस्थापनेच्या ही बाब लक्षात येताच तिकीट दरानुसार भाडे आकारणीचा मुद्दा कायमस्वरूपी नियम बनला. त्याचा परिणाम म्हणून वाढीव दरात तिकीट विक्री केल्यास प्रेक्षकांनी ती अंगीकारावी म्हणून “अ” वर्ग नटांची मांदियाळी आणि ती सुद्धा जास्तीत-जास्त चार पात्र संख्या नाटकातून दिसू लागली. कमीत कमी पात्र तीसुद्धा मराठी सीरियल्समध्ये “ब” वर्गात मोडणाऱ्या कॅरेक्टर्सची, नाटकात चलती झाली. हल्ली मालिकांमधून तुमच्या मूळ नावाऐवजी कॅरेक्टरच्या नावानेच नट-नट्यांची ओळख दृढ होण्याचा ट्रेंड मागील काही वर्षांपासून नियमित झालाच आहे. नाव दिसले नाही तरी चालेल मात्र ९० दिवसांनी मिळणारे घसघशीत पेमेंट, नटांची लाचारी आता नाटकांच्या प्रयोगातूनही दिसू लागली आहे.
मुंबईत होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर जगता येते, याची कल्पना पुण्यातील नाट्यनिर्मात्या संस्थांनी हेरली होती. पुण्या-नाशकातल्या नटांचा मुंबईत येणारा लोंढा, वाट्टेल त्या आर्थिक मोबदल्यात निर्मात्यांच्या अटींवर स्थायिक झाला. कुठलाही नाट्य व्यावसायिक निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या खर्च नियंत्रणासाठी हे बदल पथ्यावर पाडून घेत होता. अनेक नामवंत संस्थानी हा बदल पोस्ट कोविड असून नाटक चालायचे असेल, तर बदल स्वीकारायला हवा, अशी रणनिती आखून आर्थिक सूत्रं आपल्याच हाती राहतील याची पुरेपुर काळजी घेतली. हे विधान करण्यामागे उद्देश असा की, कोविडपूर्व काळात नाटक हे नटाधिष्ठित, दिग्दर्शकाधिष्ठित, संगीताधिष्ठित तथा लेखनाधिष्ठित असते असा ठोकताळी समज होता. हा समज मोडीत निघून ते निर्माणाधिष्ठित झाले आहे. निर्मात्यांच्या फसलेल्या अंदाजांमुळे प्रेक्षक न मिळवू शकणारी नाटके केवळ दहा-पंधरा प्रयोगात बंद केल्याची अनेक उदाहरणे पोस्ट कोविड काळात बघायला मिळाली.
पाच-पन्नास रुपये तिकीट दर असणारी बालनाट्ये ५०० रुपयांचा तिकीट दर मिरवू लागली. प्रायोगिक नाटकेही निःशुल्क प्रयोग घोषित करून स्वेच्छामूल्याचा डबा खुळखुळवू लागली. दोन वर्षांचा कोविड बॅकलाॅग भरून काढण्यासाठी आर्थिक रणनिती आखणारे वेगवेगळे प्रयोग समोर येऊ लागलेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर सारख्या शहरात प्रामुख्याने शासकीय वा निमशासकीय सेवेत स्थिरावलेल्या सरासरी ६५ टक्के नाट्यरसिक नोकरदार वर्गाने नाटक नामक मनोरंजनाचे माध्यम तारले.
मराठी माणसाचे, दिवाळी अंक, सेकंड होम, हाॅटेलिंग, मुलांचे परदेशी शिक्षण वा तिथेच सेटलमेंट आणि मराठी नाटक हे विषय विक पाॅइंट्स समजले जातात. त्यातला नाटक या मुद्याचा विचार करता असे दिसून येईल की मराठी माणसाने कोविड काळातही नाटक आॅनलाइन बघितले. नेटक या आॅनलाइन संकल्पनेद्वारे सादर केले गेलेले “मोगरा” हे पहिले नाटक थोडेफार पैसे मिळवून गेले. आॅनलाइन शिक्षण जर होऊ शकते, तर नाट्यप्रशिक्षण का नाही? म्हणून अनेक रंगकर्मींनी आपल्या नावाचा फायदा घेत ठरावीक काळासाठी सशुल्क शिबिरांचा घाट घातला. थोडक्यात रंगकर्मी जमात पोटापाण्यासाठी आणि आर्थिक विवंचनेतून सुटका मिळवण्यासाठी वाट्टेल ते काम मिळेल, त्या दामावर करू लागले.
मराठी नाट्यउद्योगात साधारणपणे ६० ते ८० नाटके प्रतिवर्षी जन्माला येतात. या नाटकांचे अर्थकारण अभ्यासता असे दिसून येईल की नाट्यउद्योगाची खरीखुरी उलाढाल १०० कोटींची आहे. हा उद्योग विस्तारीत आणि असंघटित असल्याने यास एकसंध नेतृत्व नाही. त्यामुळे प्रत्येक निर्माता आणि काही संस्था स्वतःच्या निर्णयानुरूप नाट्यव्यवसाय चालवत असल्याचे प्रकर्षाने दिसून येऊ लागले आहे. अर्थातच नाटक हे माध्यम निर्मितीमूल्यांस केंद्रस्थानी ठेऊन निर्माण अथवा सादर होऊ लागलेले आपण पहात आहोत.
नाटककार अतुल पेठेंनी दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट म्हटलं होतं की, नाटक ही मूर्तिकला, चित्रकला सारखी एकल कला नसून ती समूहकला आहे. समूहाने घेतलेले निर्णय आणि संकटांवर काढलेला तोडगा या काळात नाट्यसृष्टीचा तारणहार ठरला आहे; परंतु सद्यस्थिती काही वेगळेच चित्र आपल्यासमोर उभं करतेय. नाट्यव्यवसायातील संयम या संक्रमण काळात लोप पावलेला आपण पाहात आहोत. नैसर्गिक आपत्ती ही परीक्षा घेणारीच असते कारण आपल्याला कधीही मृत्यू येऊ शकतो याची जाणीव या काळातून सर्वाइव्ह झालेल्या प्रत्येकाला झाली. त्यामुळे असेल कदाचित, प्रत्येक असंघटित क्षेत्रात स्वकेंद्री वृत्ती बळावत गेली आहे. मला जे वाटते, तेच बरोबर आणि अंतिम असल्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. कला क्षेत्रासाठी हे अत्यंत मारक असून पुढील अनेक वर्षांसाठी नाट्य-सृजनतेची वाढ खुंटलेली दिसणार आहे. जगण्यातला कठोरपणा, मानसिक क्रुरता, श्रेष्ठत्वाची भावना कदाचित कमी होऊन काॅम्प्रमाइज जगण्याभोवती आपल्या जीवनाच्या कक्षा आखल्या जातील. भावनिक आणि शारीरिक ताकद आजमावून पाहायला या कालखंडासारखी दुसरी वेळ नाही. कला ही पोटासाठीच आहे, असेल व राहील या विधानास अधोरेखित करण्याचाच हा काळ आहे.
नाटक जिवंत राहणारच आहे फक्त ते पोस्ट कोविडच्या परिणामात तावून-सुलाखून निघालेल्या तडजोडीच्या भट्टीतले असेल. तांत्रिकदृष्ट्या नाटक माध्यम स्ट्राँग झालेले आपणास दिसू लागेल. आवश्यक वाजवी मनुष्यबळ खर्च नियंत्रित करतो, हा कायदा बनेल. त्यामुळे आता मराठी नाट्यसृष्टीचे जे संभ्रमित अवस्थेतील चित्र दिसतेय ती अल्पकालीन संक्रमावस्था आहे, असे म्हणता येईल.
असे असले तरीही या पोस्ट कोविड काळात काही समूहपात्रांची नाटके पुनरुज्जीवित झाली, तर काही नव्याने जन्मास आली. वाडा चिरेबंदी, करून गेलो गाव, यदा कदाचित रिटर्न्स, चारचौघी ही नाटके पुनरुज्जीवित झाली ज्यात चारपेक्षा अधिक पात्रांचा समावेश होता; परंतु ही नाटके, प्रेक्षकांनी नाटक का बघावे? हा निकष कित्येक वर्षांपासून सेट केला गेलाय, त्या श्रेणीतली आहेत. माइलस्टोन ठरलेली आहेत. आज संतोष पवारसारख्या एक खांबी नाटक करणाऱ्या रंगकर्मीचा स्वतःचा हक्काचा असा प्रेक्षकवर्ग आहे. ही खर्चिक नाटके तरून जात आहेत, कारण त्यातील पुन्हा पुन्हा बघण्याचा आनंद प्रेक्षकांना मिळत आहे. मुंबई कोणाची, यू मस्ट डाय, सफरचंद सारखी समूहपात्रांची नाटके आज गटांगळ्या खाताना दिसतील. सफरचंदसारखे अतिभव्य नाटक, तर प्रयोगागणिक दीड लाखांचा ‘आ’ वासते. म्हणजे जर दीड लाखांचे बुकिंग झाले नाही, तर प्रत्येक प्रयोगागणिक दीड लाखांचा तोटा हात जोडून उभा असतो.
नाटकाचे तिकीट ५०० रुपये असण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे नोकरदार वर्गाची आर्थिक व्यय शक्ती. राजकारणी जरी महागाईच्या नावाने बोंब मारत असले तरी नोकरदारवर्गाचे पगार आज बऱ्यापैकी वाढल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारण मध्यमवर्गाच्या मनोरंजनावरील खर्चात तिकीट दर वाढूनही किमान तीन महिन्यांतून एखादा सिनेमा किंवा नाटक बघणे सुरू आहे. मात्र हे नाटक नेमके कुणाला परवडते आहे, त्या वर्गाची आवड, निवड आणि नाट्यगृहाचे लोकेशन याचा सखोल विचार व अभ्यास केल्यास पोस्ट कोविड आटोपशीर नाटकांना चांगले दिवस येऊ शकतात. थँक्स डिअर, देवमाणूस, येतोय तो खातोय यासारखी दिग्गज निर्मात्यांची नाटके का बंद पडली? यावर शांतपणे विचार केल्यास कळेल की, यांचा टार्गेट आॅडियन्स चुकला होता. ज्या वर्गासाठी ही नाटके होती त्या प्रेक्षकवर्गाला एकतर नाटक या माध्यमात रस राहिलेला नाही किंवा नाटकाचे तिकीट त्याना परवडत नाही. महाविद्यालयीन प्रेक्षकवर्गाला ५०० रुपयांच्या मनोरंजनावरील खर्चासाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना काहीतरी टूकार कथानकासाठी पैसे खर्च करणारी आजची तरुण पिढी नाही, हे मी खात्रीलायकरीत्या सांगू शकतो.
तसेच परवडण्याच्या मुद्याबाबत चर्चा करायची झाल्यास वगनाट्यासाठीचा प्रेक्षकवर्ग ५०० रुपये तिकीट काढून कितीही उंची स्टारकास्ट असली तरी येणं शक्य नाही. चटपटीत विनोदाची सुप्परफास्ट करमणूक हे तमाशावजा वगनाट्याचे आर्थिक समीकरण असते, हे आजवर अनेकदा आपण पाहत आलो आहोत. संथ गतीचं वगनाट्य पाहताना प्रेक्षक भर नाटकातून उठून जाताना मी स्वतः पाहिलाय. त्यामुळे मराठी नाटक आता केवळ निर्माता आणि सूत्रधार यांच्या बौद्धिक क्षमतेचा खेळ राहिला नसून ‘सेल्स व मार्केटिंग’ विभागातील तज्ज्ञांच्या सल्ल्याचा भाग बनला आहे. मराठी माणसाला मग तो निर्माता असो वा सूत्रधार, सेल्स मार्केटिंगमधले काहीही कळत नाही. अदमासपंचे दाहो दर्सेचे नाट्यव्यवसायाचे गणित भलेभले नाट्यनिर्माते छातीवर शड्डू ठोकत स्व-केंद्रीवृत्तीने मांडत असतात. मुंबईतील मराठी प्रेक्षकवर्गामधे ग्रुप बुकिंग किंवा सभासद नोंदणीने नाटक पाहायला लावणाऱ्या योजना कधी रुजल्याच नाहीत आणि त्याच योजनेद्वारे अमराठी नाटक सद्यस्थितीत तरलेले आपण पहात आहोत. प्रयोगागणिक प्रायोजकत्वाची संकल्पना शासनाच्या अनुदान तत्त्वांमुळे वाढीसच लागू शकली नाही. तीच संकल्पना अमराठी नाटकांना तारत आहे. केवळ निर्मात्याच्या समीकरणात आणि चाकोरीत बसणारे नाटक आज मराठी प्रेक्षकांना बघावे लागत आहे. हॅम्लेट, आरण्यक, नटसम्राट आणि अशी अनेक नाटके एककेंद्री व्यवस्थापकिय निर्णयांमुळे बंद पडली. या नाटकांचा प्रकाशनकाळ जरी कोविडपूर्व असला तरी चुकीच्या व्यवस्थाकिय पद्धतीचा पाया याच काळात रोवला गेला. पुढे हीच मानसिकता व्यक्तिसापेक्षी बनली आणि पोस्ट कोविड काळात सर्वज्ञ निर्मात्यांचा जन्म झाला.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…