
हा नेमका कशाचा परिणाम?
मुंबई : गेल्या महिन्यात हाहाकार माजवलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात मात्र दडी मारुन बसला आहे. मुंबईत तर अधूनमधून फक्त पावसाची रिपरिप सुरु असते अन्यथा तितकाही पाऊस पडत नाही. हिमाचल प्रदेशात पावसाने धुमाकूळ घातला आहे तर महाराष्ट्रात मात्र पावसाची गरज असतानादेखील पाऊस यायचे नाव घेत नाही. याचा शेतीला मोठा फटका बसत असून शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यावर्षीचा ऑगस्ट महिना हा गेल्या १०० वर्षांतील सर्वांत कोरडा महिना ठरला आहे. याचा उन्हाळी शेतीवर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला भारतीय हवामान विभागाने साधारण १३ तारखेपासून पुन्हा पाऊस सुरु होण्याची (Indian Rain updates) शक्यता वर्तवली होती. तसेच यावर्षी ऑगस्ट महिन्यात आठ टक्क्यापर्यंत पावसाची तूट अपेक्षित धरली होती. मात्र हवा तसा पाऊस झाला नाही. यापूर्वी सर्वात कमी पाऊस २००५ च्या ऑगस्ट महिन्यात झाला होता. २००५ मध्ये ऑगस्ट महिन्यात १९१.२ मिमी (७.५ इंच) इतका पाऊस झाला होता. यंदा त्याहीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. भारतात ऑगस्टच्या पहिल्या १७ दिवसांत फक्त ९०.७ मिमी (३.६ इंच) पाऊस पडला आहे. हा पाऊस सामान्यपेक्षा जवळपास ४० टक्के कमी आहे. एका महिन्याची सामान्य पावसाची सरासरी ही २५४.०९ मिमी (१० इंच) आहे.
यावर्षी देशातील पश्चिम आणि मध्य भागात कमी पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरी १८० मिमी (७ इंच) पेक्षा कमी पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. दरम्यान, आतापर्यंतचा पाऊस आणि उर्वरित महिन्यात पावसाचे प्रमाण नेमके कसे असेल तसेच ऑगस्टमधील एकूण पावसाची स्थिती काय असेल याबाबतची माहिती ३१ ऑगस्ट किंवा १ सप्टेंबरला हवामान विभागाकडून देण्यात येणार आहे.
एल निनोचा प्रभाव
एल निनोमुळे पाण्याचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे भारतीय उपखंडात सामान्यतः पावसाला अडथळा निर्माण होतो. यावर्षी जून महिन्यात सरासरीपेक्षा १० टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. भारत एका शतकाहून अधिक काळातील सर्वात कोरड्या ऑगस्टच्या दिशेने वाटचाल करत आहे. एल निनोच्या प्रभावामुळं देशातील अनेक भागात कमी पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याचे पर्जन्यमान हे १९०१ नंतर यावर्षी सर्वात कमी झालं आहे.
शेतीवर मोठा परिणाम
भारतातील जवळपास निम्म्या शेतजमिनीला सिंचनाची सोय नसल्यानं पाऊस महत्त्वाचा आहे. मान्सून हा घटक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. कारण एकूण पावसाच्या सुमारे ७० टक्के पावसाचे पाणी हे शेती पिकांना दिलं जाते. त्यासाठी नदी, नाले, धरण यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा केला जातो. मान्सूनने दमदार सुरुवात झाल्यावर केरळसह दक्षिणेकडील राज्यात १ जूनपासून भात, मका, कापूस, सोयाबीन, ऊस आणि शेंगदाणे, इतर पिकांसह लागवड करण्यास सुरुवात करतात. मात्र, यावर्षी पावसाच्या गैरहजेरीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या कमतरतेमुळं तांदूळ आणि सोयाबीन यासारख्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं किंमतीत वाढ होऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात पेरणी केलेल्या पिकांचे उत्पन्न देखील कमी होण्याची शक्यता आहे.
या भागात पावसाची शक्यता
पुढील दोन आठवड्यात ईशान्य आणि काही मध्य प्रदेशात मान्सूनचा पाऊस सुधारण्याची अपेक्षा हवामान विभागानं वर्तवली आहे. परंतु वायव्य आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.