Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सCredit card fraud : क्रेडिट कार्डचा वापर करून महिलेची फसवणूक

Credit card fraud : क्रेडिट कार्डचा वापर करून महिलेची फसवणूक

  • गोलमाल : महेश पांचाळ

एका वेळी ४० हजार रुपयांचा वापर करण्याची क्रेडिट कार्डला मुभा होती. मात्र क्रेडिट कार्डमधून एक लाख २० हजार रुपये गायब कसे झाले? असा प्रश्न दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका व्यावसायिक महिलेला पडला. आपल्या क्रेडिट कार्डमधून पैसे खर्च कसे झाले याबाबत ती गोंधळून गेली. ना ओटीपी नंबर आला, ना कोणाला पासवर्ड नंबर शेअर केला होता. तरीही नक्की ही फसवणूक झाली कशी याचा शोध घेण्यासाठी तिने कफ परेड पोलीस ठाणे गाठले. रितसर तक्रार केली. प्रकरण तांत्रिक असल्याने पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला. पैशांचे ट्रान्झिन्शन कसे झाले, याचा शोध घेतला. एक लाख २० हजार रुपयांपैकी ४० हजार रुपये कोपरखैरणे पेट्रोल पंपावर जमा करण्यात आल्याची माहिती प्रथम कफ परेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पेट्रोल पंपावरील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता पोलिसांना रोखपाल मनोज चौधरी (३४) आणि दुसरा कर्मचारी दीपक जानबा (३८) यांच्या चौकशीत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. या चौकशीत गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पुढे आली. एचपी पेट्रोल पे अॅप (इंधन भरण्यासाठी पेमेंट करण्यासाठी वापरला जाणारा) पैसे जोडण्यासाठी पीडितेच्या क्रेडिट कार्डचा वापर करण्यात आला आणि ही रोख रक्कम मदन जयलाल साव याला देण्यात आली, असे उघड झाले.

फिर्यादी महिलेच्या क्रेडिट कार्डची माहिती बेकायदेशीरपणे मिळवल्याबद्दल त्याला ताब्यात घेण्यात आले. तो मूळचा झारखंडचा आहे. चौधरी आणि जानबा या दोघांनी पेट्रोल पंपाच्या अॅपद्वारे उत्पन्न केलेल्या पे कोडचा वापर ग्राहकांना लुटण्यासाठी केला, अशी धक्कादायक माहिती समोर आली. “पेट्रोल पंपाच्या अॅपद्वारे उत्पन्न केलेल्या पे कोडमध्ये प्रवेश मिळवणे ही त्यांची मोडस ऑपरेंडी होती. पे कोड तयार झाल्यानंतर आरोपींनी ऑनलाइन व्यवहारांच्या मदतीने ही रोख रक्कम काढली होती. त्या बदल्यात प्रत्येकाने दोन टक्के कमिशन घेतले होते.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कमी शिकलेल्या सावने या फसवणुकीच्या कामात जी कुशलता दाखवली, ते पाहून पोलीसही अवाक् झाले होते. सायबर गुन्ह्यातील त्याच्या पूर्वीच्या सहभागामुळे मलबार हिल पोलिसांनी त्याला अटक केली होती. साव याचीसुद्धा पेट्रोल पंपच्या कॅशियरबरोबर आधी थेट ओळख नव्हती. त्याचा सहकारी अमन सिंग हा पेट्रोल पंपावरील कॅशियरच्या ओळखीचा होता. सिंगने ओळख करून दिल्यानंतर कॅशियर मनोज चौधरी आणि दीपक जानबा यांच्यात पेट्रोल पंपावरील रोख रक्कम देवाण-घेवाण करण्यावरून अनेकदा चर्चा झाली होती. आपण जी हेराफेरीचा व्यवहार करत आहोत हा सायबर फसवणुकीचा एक प्रकार आहे याचा सिंग किंवा पंप कर्मचाऱ्यांना थांगपत्ता नव्हता. तसे असते तर कदाचित त्यांनी पेट्रोल पे अॅपवरील कोड (पॉइंट रिडीम करण्यासाठी) आणि वन टाइम पासवर्ड सावला शेअर केला नसता.

या प्रकरणातील मास्टरमाइंड अद्याप फरार आहे आणि तो झारखंडमध्ये लपून असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पीडित महिलेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेट्रोल पंपाच्या खात्यात पैसे कसे पोहोचले याचा पोलीस अजूनही तपास करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे. मास्टरमाइंड सापडल्यानंतर क्रेडिट कार्ड घोटाळ्यातील गुन्ह्यांच्या पद्धतीवर प्रकाश पडेल, असा पोलिसांचा कयास आहे.

maheshom108@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -