
मुंबई: मुंबई विद्यापीठाकडून (mumbai university) जाहीर करण्यात आलेल्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीला (senate election) शिंदे-फडणवीस सरकारने अचानक स्थगिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने परिपत्रक काढून सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला. निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे ठाकरे गट तसेच मनसे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच अचानक निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
येत्या १० सप्टेंबरला विद्यापीठाने जाहीर केलेल्या नोंदणी पदवीधर मतदरासंघाची सिनेट निवडणूक होणार होती. यासाठी मनसेकडून तसेच ठाकरे गटानेही जोरदार तयारी केली होती. मात्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र नाराजीचे सूर उमटत आहेत.
निवडणूक कार्यक्रम रद्द केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मनसेचे नेते संदीप देशपाडेंनी सांगितले की, सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत या हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे.तर दुसरीकडे ठाकरे गटाचे वरूण सरदेसाई यांनीही ट्विटरवरून ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली.
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली!
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे.
आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे.
निषेध !
— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 17, 2023
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली! निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे.आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे. निषेध असे ते ट्विटरवर म्हणाले.