
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदींची नवी खेळी
नवी दिल्ली : सध्या महागाई (Inflation) प्रचंड वाढली असून सामान्यांच्या खिशाला ती न परवडण्यासारखी आहे. हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, पेट्रोल, डिझेल यांसारख्या गरजेच्या वस्तूच महाग असल्याने सामान्य माणूस चिंतेत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम हा येत्या निवडणुकांवर होऊ शकतो हे मोदी सरकारने (Modi Government)ओळखलं आहे. याआधीही महागाईमुळे सरकार पडल्याची उदाहरणे आहेत. यावेळेस तसं होऊ नये याकरता मोदी सरकारने एक नवी योजना आखली आहे. ज्यानुसार पेट्रोल, डिझेल, भाज्यांचे दर (Petrol, Diesel, vegetable price) कमी करण्यासाठी पाऊलं उचलली जाणार आहेत.
गरजोपयोगी वस्तूंचे दर कमी करण्यासाठी भारतीय अधिकारी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून एकूण १ लाख कोटी रुपये कमी करण्याचा विचार करत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अन्न आणि इंधनाच्या किंमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी हा पैसा वापरला जाईल. किंमती कमी करण्याच्या प्रयत्नात अर्थसंकल्पीय तुटीचे जे लक्ष आहे त्यात बदल होऊ नये म्हणून मंत्रालयांच्या बजेटमधून ही कपात केली जात आहे.
भारत हा असा देश आहे, जिथे कांदे आणि टोमॅटोच्या किंमतींचा निवडणुकीवर मोठा परिणाम होत असतो. नुकतेच महागाई निर्देशांकाचे जे आकडे आले होते त्यामध्ये गेल्या महिन्यात महागाई पाच टक्क्यांवरून साडेसात टक्क्यांपर्यंत वाढली होती. येत्या डिसेंबर महिन्यात पाच राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे, तर एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुका आहेत. महागाईमुळे सरकार पडल्याचा इतिहास सर्वच राजकीय पक्षांना माहीत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, पंतप्रधान किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतील. येत्या आठवड्यात यासंदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.