
मुंबई: वेस्ट इंडिजविरुद्ध (west indies) टी-२० मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया (team india) आयर्लंड दौऱ्यावर आहे. भारत(india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.या सामन्यात भारताचे नेतृत्व टीम इंडियाचा युवा खेळाडू जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) करत आहे. बुमराहने तब्बल वर्षभरानंतर मैदानावर पुनरागमन केले आहे.
बुमराहने रचला इतिहास
आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात उतरताच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. तो टी-२०चा पहिला गोलंदाज कर्णधार आहे. आतापर्यंत टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व फलंदाजांनी केले आहे.
केवळ तीन खेळाडूंनी केले ५०हून अधिक सामन्यात नेतृत्व
जसप्रीत बुमराह हा टी-२०चा ११वा कर्णधार आहे. याआधी टी-२० संघाचे नेतृत्व कऱणाऱ्या कर्णधारांच्या यादीवर नजर टाकली असता केवळ तीनच असे खेळाडू आहेत ज्यांनी ५०हून अधिक सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने सर्वाधिक ७२ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.
त्याच्या नेतृत्वात भारताने ४१ सामने जिंकले आहेत तर २८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना अनिर्णीत राहिला. धोनीच्या विजयाची टक्केवारी ६० टक्के आहे. तर दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. त्याने ५१ सामन्यात नेतृत्व केले आहे. याशिवाय तिसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. त्याने ५० सामन्यांत नेतृत्व केले आहे.
यांनी केलेय भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व
जसप्रीत बुमराहआधी भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व १० खेळाडूंनी केले आहे. वीरेंद्र सेहवाग पहिला कर्णधार आहे. यानंतर एमएस धोनी, सुरेश रैना,अजिंक्य रहाणे, विराट कोहली, शिखर धवन, ऋषभ पंत, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी नेतृत्व केले आहे.