मुंबई: दिल्लीवरून मुंबई जाणाऱ्या स्पाईसजेटच्या (spice jet) फ्लाईटमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशावर एअरहोस्टेस आणि एक महिला प्रवाशाचे आक्षेपार्ह फोटो काढल्याचा आरोप आहे. विमानाच्या पहिल्या रांगेत बसलेल्या आरोपीने केबिन क्रूचे सदस्य आणि एका महिला प्रवाशाचे फोटो काढले. स्पाईसजेटने या घटनेला दुजोरा दिला असून नंतर त्या प्रवाशाने आपल्या फोनमधून ते फोटो डिलीट केले आणि माफी मागितली असेही सांगितले.
एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की दोन ऑगस्टला स्पाईसजेटची फ्लाईट नंबर १५७मध्ये पहिल्या रांगेत एक प्रवासी बसला होता. हे विमान दिल्लीहून मुंबईला जात होते. या दरम्यान प्रवाशाने केबिन क्रूचे फोटो काढले. जेव्हा क्रू मेंबर्सनी याला विरोध केला तेव्हा तेव्हा त्याने आपल्या फोनमधून फोटो डिलीट केले आणि यासाठी माफीही मागितली. तसेच प्रवाशाने माफीनामाही लिहिला.
दिल्ली महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
दिल्ली महिला आयोागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई सुरू केली. आयोगाने सांगितले की व्हिडिओमध्ये दिसत आहे की प्रवासी महिला फ्लाईट अटेंडंट आणि महिला सह प्रवाशाचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा त्याचा मोबाईल फोन चेक करण्यात आला तेव्हा त्याच्या फोनमध्ये विमानात प्रवास करणाऱ्या महिलांचे आक्षेपार्ह फोटो आढळले.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल म्हणाल्या, फ्लाईटमध्ये लैगिंक शोषणाच्या तक्रारी वाढत आहे. हे भयानक आहे. या प्रकऱणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली गेली पाहिजे. तसेच यातील दोषी व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. डीजीसीएची विमानातील लैंगिक शोषणाविरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसी असली पाहिजे.