व्हायरल व्हिडीओमुळे आल्या होत्या चर्चेत
कोपरगाव बसस्थानकावर मागत होत्या भीक; अखेर जगणार स्थैर्याचे जीवन
शिर्डी : साधारण दोन महिन्यांपूर्वी एका व्हायरल व्हिडीओमुळे शांताबाई कोपरगांवकर (Shantabai Kopargaonkar) या लावणीसम्राज्ञी चर्चेत आल्या होत्या. एकेकाळी आपल्या सदाबहार लावणी नृत्याने महाराष्ट्र गाजवणाऱ्या आणि आपल्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या, शिट्ट्यांनी दणाणून टाकणार्या लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगाव बसस्थानकावर अक्षरशः भीक मागत असल्याचं या व्हिडीओमुळे कळलं होतं. त्यानंतर अनेकांनी पुढाकार घेत त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अखेर माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehlata Kolhe) यांच्या पाठपुराव्यामुळे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून पाच लाख रुपयांचा मदतीचा धनादेश शांताबाईंना देण्यात आला.
यापूर्वी स्नेहलता कोल्हे यांच्याच पुढाकारातून त्यांना येथील द्वारकामाई वृद्धाश्रमास हक्काचा आणि सुरक्षित निवारा मिळाला होता. शांताबाईंची अवस्था पाहून माजी आमदार कोल्हे यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला होता. त्यांना शिर्डीच्या द्वारकामाई वृद्धाश्रमात निवारा मिळवून दिला. शंभराहून अधिक वृद्धांचा सांभाळ करणारे, या वृद्धाश्रमाचे चालक श्रीनिवास व त्यांच्या पत्नी सुधा यांनी आनंदाने शांताबाईचे पालकत्व स्वीकारले. गेल्या दोन महिन्यांपासून त्या येथे आनंदात राहात आहेत.
त्यानंतर स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत संपर्क साधून शांताबाईंची परिस्थिती कथन केली. त्यानंतर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा जागृत झाली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी वृद्धाश्रमास भेट देऊन शांताबाईंची विचारपूस केली. त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
एकनाथ शिंदे यांनी आपण श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने त्यांना पाच लाख रुपयांची मदत करू, असे आश्वासन कोल्हे यांना दिले होते. आजच्या शिर्डी भेटीत त्यांनी दिलेला शब्द पाळत कोल्हे यांच्या उपस्थितीत शांताबाईंकडे पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. यावेळेस स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, शिर्डीच्या द्वारकामाई वृद्धाश्रमाचे सेवाभावी चालक श्रीनिवास व त्यांच्या पत्नी सुधा यांनी शांताबाईंचे पालकत्व स्वीकारल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मुख्यमंत्र्यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत पाच लाख रुपये दिले. ही मदत या शांताबाई आणि अन्य निराधारांचे संगोपन करणाऱ्या आश्रमाला दिली जाईल.
कसा आहे शांताबाईंचा प्रवास?
शांताबाईंची कला, सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून चाळीस वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी शांताबाई कोपरगावकर हा तमाशा काढला होता. या तमाशा फडाच्या पुढे शांताबाई मालक झाल्या आणि पन्नास-साठ लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिला. या फडाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि पैसाही मिळू लागला. पण अचानक काळाने घाला घातला. इमानेइतबारे आपली कला जोपासणा-या या लावणीसम्राज्ञीची कोणीतरी फसवणूक केल्याचे सांगण्यात येते. यानंतर हातचे सर्वकाही गेल्याने त्यांना मानसिक आजार जडला. त्या अवस्थेतच त्या भीक मागू लागल्या. त्यांना घरचं किंवा जवळचं असं कुणीच नसल्याने बसस्थानकालाच त्यांनी घर बनवलं. बरीच वर्षे भटकंती केल्यानंतर आता शासनाच्या मदतीमुळे शांताबाईंच्या जीवनात स्थैर्य येण्यास मदत होईल.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra