Thursday, July 10, 2025

Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली कोलंबियाची राजधानी

Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली कोलंबियाची राजधानी

बोगोटा: कोलंबियाची (colombia) राजधानी बोगोटामध्ये (bogota) गुरूवारी ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे (earthquake) जोरदार हादरे बसले. भूकंप आल्यानंतर सायरन वाजू लागला आणि काही वेळातच लोकांमध्ये दहशत पसरली. यादरम्यान घाबरलेल्या एका महिलेने १०व्या मजल्यावरून उडी मारली. त्यात तिचा मृत्यू झाला.


दरम्यान, भूकंपामुळे कोणाचा मृत्यू झाल्याची अथवा हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. भूकंप स्थानिक वेळेनुसार गुरूवारी दुपारी १२.०४ मिनिटांनी झाला. या भूकंपाचे केंद्र बोगोटा येथून ४० किमी दक्षिण-पूर्व देशातील केंद्रामध्ये स्थित एल कॅल्वारियो शहर आहे.


वृत्त वाहिनी एएफपीच्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी गुरूवारी भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगितले. तर तेथील महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपादरम्यान लिफ्टमध्ये लोक अडकल्याची तसेच इतर लहान मोठ्या घटना घडल्या.



भूकंपाच्या तीव्रतेबाबत वेगवेगळे दावे


भूकंपाच्या तीव्रतेच्या आकड्यांबाबत कोलंबिया आणि अमेरिकन भूवैज्ञानिकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. कोलंबियन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती तर अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार याची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू एल कॅल्वारियो शहर होते.



घराच्या खिडक्यांचे नुकसान


अचानक झालेल्या जोरदार तीव्रतेच्या भूकंपामुळे बोगोटामधील अनेक घरांच्या खिडक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र त्यामुळे कोणास दुखापत झाल्याची अद्याप माहिती नाही.


सोशल मीडिया युजर्सनी भूकंपाच्या केंद्राजवळील ठिकाणी विलाविसेंशियो, बुकारामांगा, तुंजा आणि इबागु शहरातही भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती दिली. महापौर लोपेज यांनी ट्विटरवरून माहिती दिली की बोगोटामध्ये भूकंपाचे झटके जाणवले. शांत आणि सतर्क राहा. सगळ्यांनी सावधानता बाळगावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment