Friday, November 15, 2024
Homeताज्या घडामोडीगेमिंग कंपन्यांकडून क्रिप्टोच्या माध्यमातून हजारो कोटीचा गंडा!

गेमिंग कंपन्यांकडून क्रिप्टोच्या माध्यमातून हजारो कोटीचा गंडा!

मुंबई : गेमिंग कंपन्या भारतातील पैसा गुपचूपपणे परदेशात पाठवत असल्याचे समोर आले आहे. यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जात असल्याचेही उघडकीस आले असले तरी विदेशी गेमिंग कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी कर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दमछाक होताना दिसत आहे.

या कंपन्या भारतात कमावलेले पैसे बाहेर नेण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करत आहेत. यासाठी शेल कंपन्यांचा आणि इतर माध्यमांचा वापर करत असल्याने देशाला कोट्यावधींचा फटका बसला आहे.

स्मार्टफोनचा प्रसार जसा झाला त्याचप्रकारे भारतात वेगवेगळ्या ॲप्सचा प्रसार वाढला आहे. अशातच, गेमिंग ॲप्सने बाजारात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये आज एकतरी गेमिंग ॲप डाऊनलोड केलेले असेल. अनेक जण त्याच्या आहारी देखील गेली असली आणि त्या खेळासाठी अनेक पैसे देखील खर्च केली असतील आणि हेच तुमचे खर्च झालेल्या पैशातून ह्या गेमिंग कंपन्यांकडून कर चुकवेगिरी केली जात असल्याचे समोर आले आहे. ही रक्कम छोटी मोठी नसून तब्बल हजारो कोटींच्या जवळपास असल्याची माहिती जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने दिली आहे.

पारिमॅच ही ऑनलाइन स्पोर्ट्स बेटिंग कंपनी आहे. ज्याचे मुख्यालय सायप्रस देशात आहे. पारिमॅच कंपनीसाठी भारतात अनेक शेल कंपन्या काम करत असल्याची माहिती आहे. पारिमॅचसाठी शेल कंपन्यांमार्फत आतापर्यंत देशाबाहेर तब्बल ७०० कोटी रुपये देशाबाहेर पाठवल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून यासंदर्भात कर यंत्रणा तपास करत होत्या, ज्यात गेमिंग कंपन्यांसंबंधी ४०० जणांची चौकशी केल्यानंतर यासंदर्भातील रॅकेट समोर आले आहे.

क्रिप्टोमार्फत पाठवण्यात आलेली अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. मात्र, यापूर्वीच मोठी रक्कम देशाबाहेर पाठवण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. यासोबतच हा पैसा क्रिप्टोमार्फत पाठवण्यात आल्याने तो कुणाच्या वॉलेटमध्ये गेला आहे, हे देखील शोधणे कठीण आहे.

परदेशी गेमिंग कंपन्यांमार्फत भारतातील शेल कंपन्यांमध्ये पेमेंट ॲग्रीगेटर निवडला जातो. ज्या अॅग्रीगेटर कंपनीची नोंदणी असते किंवा विना नोंदणीची देखील कंपनी निवडली जाते. आता हे गेमिंग ॲप वापरणाऱ्या लोकांचा पैसा याच पेमेंट ॲग्रीगेटरमार्फत गोळा होतो आणि तो पुढे क्रिप्टोमध्ये रुपांतरीत करत दुबई आणि अखाती देशांमध्ये वळता केला जातो.

भारतात अशा परदेशी गेमिंग कंपन्यांसाठी असंख्य शेल कंपन्या कार्यरत आहेत. मात्र, त्यांची कार्यालये आणि नोंदणी मात्र परदेशात आहेत. परदेशातील कंपन्यांना भारताचे कर नियम लागू होत नाही. त्यामुळे कर चोरी करणे शक्य होते. दरम्यान, याप्रकरणी केंद्र सरकारकडून गेमिंग कंपन्यांविरुद्ध कारवाई होताना दिसते आहे. दुसरीकडे, सरकारकडून गेमिंग कंपन्यांवर २८ टक्क्यांचा जीएसटी कर लावण्यात आला आहे. अशात, क्रिप्टोमार्फत कर चुकवेगिरी करणाऱ्या गेमिंग कंपन्यांवर आळा कसा घालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -