एखाद्या गोष्टीचा ध्यास लागणे किंवा झपाटून ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे. पण ‘सुलभ इंटरनॅशनल’चे डॉ. बिंदेश्वर पाठक हे अशीच एक चळवळ पूर्णत्वास नेण्यासाठी आयुष्यभर झटले आणि ती पूर्णत्वास नेली. बिंदेश्वर पाठक महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झाले होते. ‘आधी भारत स्वच्छ करू, स्वातंत्र्य आपण नंतर मिळवू’ हे गांधीजींचे वचन बिंदेश्वर यांच्या मनावर कायमचे कोरले गेले आणि त्यांनी गांधीजींच्या स्वच्छता मिशनला स्वत:ला वाहून घेतले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडींच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. एकदा केनेडी म्हणाले होते, “हे विचारू नका की देशाने तुमच्यासाठी काय केले, हे विचारा की तुम्ही देशासाठी काय केले.” भारतात उघड्यावर शौचासाठी जाणे ही आजही खूप मोठी समस्या आहे. मग जेव्हा बिंदेश्वर यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा ही समस्या किती कठीण असेल, याचा अंदाज आता लावणे कठीण आहे. बिंदेश्वर यांनी उघड्यावर शौचास जाण्याच्या फार मोठ्या समस्येच्या मुळावर घाव घालण्यासाठी सरसावले. या क्षेत्रात त्यांनी अामूलाग्र असे काम केले. अनेक आविष्कार घडवले आणि त्यातलाच एक आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तब्बल ४४ वर्षांपूर्वी पूर्णपणे स्वदेशी आणि अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने बनवण्यात आलेले सुलभ शौचालय.
एका मूलभूत समस्येला हरविण्यासाठी जंगजंग पछाडणारा अवलिया म्हणून आज बिंदेश्वर पाठक हे नाव सगळ्यांनाच ठाऊक आहे. पद्मभूषणसारखा केंद्र सरकारचा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालाय. पण आतापर्यंतचा हा प्रवास त्यांच्यासाठी फारच कठीण होता. कारण पाठक यांनी जेव्हा काम सुरू केले, त्या काळात जातिव्यवस्थेने भारतीय समाजात आपली पाळेमुळे अतिशय घट्ट रोवली होती. बिंदेश्वर पाठक यांचा जन्म बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातल्या रामपूर या छोट्याशा गावात झाला. त्यांचे आजोबा मोठे प्रसिद्ध शास्त्री होते आणि त्यांचे वडील आयुर्वेदाचे डॉक्टर होते. तसे पाहायला गेले, तर एक समृद्ध कुटुंब. पण त्या मोठ्या घरात शौचालय नव्हते. शौचासाठी घरातल्या सगळ्यांनाच बाहेर जावे लागत होते. घरातल्या सगळ्या महिलांना पहाटे ४ वाजता अगदी सूर्योदय होण्याआधी बाहेर जाऊन प्रातर्विधी उरकावे लागत होते.
अगदी लहानपणापासूनच गावात पक्के शौचालय नसल्यामुळे कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे त्यांनी पाहिले होते. याशिवाय त्या काळात जातिव्यवस्थेचा इतका पगडा होता की, समाज एक असूनही वेगवेगळ्या गटांमध्ये विभागला गेला होता. पण अशा विपरित परिस्थितीतही ते अजिबात ढळले नाहीत, मागे हटले नाहीत. कारण, त्यांना माहिती होते की, जरी आज समाजाने त्यांना, त्यांच्या कामाला विरोध केला असेल, तरी ते या कामात यशस्वी झाल्यानंतर ते समाजासाठी क्रांतिकारी ठरेल. त्यामुळेच त्यांनी समाजाकडून वारंवार मारल्या जाणाऱ्या टोमण्यांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांनी समाजशास्त्र विषयात बी. ए. परीक्षा उत्तीर्ण केली आणि अपराधशास्त्र या विषयात एमएची पदवी घेतली. याच विषयात संशोधन करण्याचे त्यांचे स्वप्नं पूर्ण होऊ शकले नाही. पण हाच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. बिंदेश्वर पाठक थेट पाटण्याला आले व ‘गांधी संदेश प्रचार समिती’ नावाच्या एका समितीसोबत काम केले.
जिथे महात्मा गांधीजींचं स्वप्न पूर्ण करण्याच्या कामी त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यावेळी शौचालयासाठी बकेट टॉयलेटचा वापर केला जायचा, जे नंतर हाताने स्वच्छ करावे लागायचे. बकेट टॉयलेटसाठी पर्याय शोधण्याचे काम करताना ज्या वर्गातून बिंदेश्वर आले होते, त्या वर्गातूनही त्यांना कडाडून विरोध झाला. बिंदेश्वर पाठक यांना अशी पद्धत शोधून काढायची होती, ज्यामध्ये पैसा आणि पाणी या दोन्ही गोष्टी कमी लागाव्यात. त्याचसोबत कमी वेळात आणि कुठेही बनवता यायला हवे. यातूनच पुढे सुलभ शौचालय पद्धतीचा उगम झाला. बिंदेश्वर पाठक यांना १९७०मध्ये बिहारमध्ये सुलभ शौचालय बनवण्यासाठी प्रथम परवानगी मिळाली. त्यानंतर त्यांनी सुलभ नावाने आपली एक संस्थाही सुरू केली. पुढे सरकारनेही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत देऊ केली. पण फक्त डिझाइन बनवून ते थांबले नाहीत, तर त्यासोबतच त्यांनी तशा प्रकारच्या सुलभ शौचालयांची निर्मिती करणेही सुरू केले. या जगावेगळ्या पण यशस्वी प्रयोगाच्या जोरावर आज सुलभ इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय ख्यातीची संस्था आहे.
शौचालये बांधणे ही आजही एक मोठी समस्या आहे. यासाठी सरकारतर्फे स्वच्छता अभियानही राबवले जात आहे. लोकांमध्ये घरात शौचालय बांधण्यासाठी आणि वापरण्यासाठी जनजागृतीही केली जात आहे. बिंदेश्वर पाठक गेल्या कित्येक वर्षांपासून हेच काम करत आले आहेत. पाठक यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अनेक नावाजलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. या पुरस्कारांमध्ये एनर्जी ग्लोब पुरस्कार, प्रियदर्शिनी पुरस्कार, दुबई आंतरराष्ट्रीय पुरस्कार, अक्षय ऊर्जा पुरस्कार आणि भारत सरकारचा मानाचा पद्मभूषण पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचा समावेश आहे. सुलभ शौचालय म्हणजे समाजाला एका शापापासून मुक्त करण्याची चळवळ आणि या चळवळीचे जनक डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्या निधनाने सुलभ शौचालयाच्या क्रांतीचे जनकच हरपले, असे म्हणावे लागेल.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…