
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात अजितदादांचे वक्तव्य
शिर्डीत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री साईबाबांचे घेणार दर्शन
शिर्डी : आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील काकडी गावात 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी मुख्यमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केले. तसंच 'शासन आपल्या दारी' या उपक्रमामुळे झालेला फायदा सांगितला.
अजित पवार म्हणाले, देशामध्ये अनेक राज्य सरकार असतात जे आपापल्या पद्धतीने सरकार चालवतात, राज्यकर्ते मंत्रालयात बसून निर्णयदेखील घेतात. परंतु ज्या योजना सर्वसामान्य, अगदी शेवटच्या माणसाकरता असतात दुर्दैवाने त्या योजनेचा लाभ त्या माणसापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम सुरु करुन वेगवेगळ्या गटातील लाभार्थ्यांना हुडकून स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचायचे ठरवले.
पुढे ते म्हणाले, आम्ही महिला व वयस्कर कलावंतांनाही लाभ दिला. शेवटी कुठलाही कलावंत असला तरी त्याच्या अंगात कला असतेच, पण प्रत्येकाचा एक काळ असतो. उतारवयात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि कधीकधी दोन वेळचं अन्नदेखील या कलावंतांना मिळत नाही. त्याहीकरता शासन कटीबद्ध आहे, जागरुक आहे. आज करोडो रुपयांचा खर्च आपण त्यांच्यासाठी करत आहोत. असं अजित पवार म्हणाले.
साईबाबांचे घेणार दर्शन
साईबाबांच्या शिर्डीत 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणं हा एक उत्तम योगोयोग आहे. साईबाबांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश आपण सर्वांनी कायम पाळला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री साईबाबांचे दर्शन घेऊन मग मुंबईला रवाना होणार आहेत.