- गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला
श्री गजानन महाराजांचा पुंडलिक भोकरे नावाचा एक भक्त मुंडगावी राहत असे. त्याच गावी भागाबाई नावाची एक स्त्री राहायची. ती फार दांभिक होती. तिची कोणावरही निष्ठा नव्हती. लोकांना भोंदविणे हाच तिचा धंदा होता. एक दिवस ही भागाबाई पुंडलिकाला म्हणाली, “तुझा जन्म वाया गेला. कारण तू सद्गुरू केला नाहीस. तू गजाननाच्या वाऱ्या करतोस. त्याला सद्गुरू मानतोस. पण सांग बरे त्यांनी तुझ्या कानी मंत्र सांगितला का? (मंत्र दीक्षा) अरे विधी पूर्ण केल्याशिवाय गुरू होत नसतो. तुझा ताप बरा झाला म्हणून तू त्याला मानतोस. या काकतालीय न्यायाला बळी पडू नकोस. अरे तो गण गणाचे भजन करतो. वेड्याप्रमाणे चाळे करतो. कोणाचेही खातो. त्यामुळे मी तुला सांगते, अंजनगावी माझ्यासोबत चल. तिथे एक संत आले आहेत. त्यांना आपण गुरू करू. गुरू हा महाज्ञानी असला पाहिजे, परम गुणी, चातुर्य शात्र चिंतामणी आणि भक्ती मार्ग दाखविणारा असा असला पाहिजे.” असे भागाबाईने सांगताच पुंडलिक भोकरे हा महाराजांचा भाविक भक्त घोटाळला. त्याने मनाशी विचार केला की, उद्या अंजनगावास कीर्तन ऐकावयास जाऊ. पुढचे काय ते पुढे पाहू. असा विचार करून त्याने भागाबाईला तिच्यासोबत अंजनगावास येण्याबद्दलचा आपला विचार कळविला. पुंडलिक रात्री झोपी गेला.
तिसऱ्या प्रहरी काय घडले बघा. त्याला स्वप्न पडले. त्याच्यासमोर दिगंबर अवस्थेतील एक पुरुष उभा राहिला. हा पुरुष दिसावयास समर्थांसारखा होता. तो पुरुष पुंडलिकाला म्हणाला, “अरे पुंडलिका, तू गुरू करण्याकरिता भागाबाईच्या सल्ल्याने अंजनगावी जातोस का? जायचे असल्यास त्वरित जावे. ज्याला भेटावयास तू निघाला आहेस, त्याचे नाव काशिनाथ आहे. तिथे गेल्यावर तुझी भ्रांत नक्कीच फिटेल. अरे कानात काही बोलला म्हणजे तो गुरू होत नसतो. अनेक लोक कानात गुजगोष्टी करीत असतात. मग काय ते एकमेकांचे गुरू होतात काय? अशा दंभाचाराच्या नादी तू लागू नकोस. तुझा कान इकडे कर. तुला मंत्र देतो.” असे म्हणून महाराजांनी पुंडलिकाच्या कानाजवळ “गण गण” असे शब्द उच्चारले आणि महाराज स्तब्ध झाले. पुढे महाराज बोलले, “अजून तुझी काही इच्छा आहे का? ती तू मला सांग. आज मी तुझी इच्छा पुरवेन.” हे शब्द ऐकून पुंडलिकास अतिशय आनंद झाला. त्याने महाराजांकडे निरखून पाहिले. त्यावेळी त्याला हे शेगावचे श्री गजानन महाराज असल्याचे भासमान झाले. यावर पुंडलिक महाराजांना बोलला, “महाराज मला तुमच्या पादुका नित्य पूजा करण्याकरिता द्याव्या. यापेक्षा माझी दुसरी काही आस नाही.” महाराज म्हणाले, “बरे. उद्याच्या दिवशी दुसऱ्या प्रहरी पादुकांची पूजा कर. मी तुला दिल्या.”
त्या पादुका घेण्याकरिता पुंडलिक उठून बसला असता त्याला जागृती आली (जाग आली). जागा झाल्यावर आजूबाजूला पाहू लागला, तर तिथे त्याला कोणी दिसेना आणि तिथे पादुकाही नव्हत्या. तेव्हा पुंडलिकाच्या लक्षात आले की, हे जे सत्पुरुष होते ते म्हणजे साक्षात श्री गजानन महाराजच. पादुका नसल्यामुळे तो गोंधळून गेला. त्याने मनाशी विचार केला की, आजवर महाराजांचे वचन कधी खोटे झाले नाही. त्यांनी स्वप्नात येऊन मला दर्शन दिले. भागाबाई कशी आहे हेसुद्धा सांगितले. महाराज तर म्हणाले, “उद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा कर.” त्याचा मी काय अर्थ समजावा? किंवा नवीन पादुका तयार करवून घ्याव्यात? असे नाना तर्क पुंडलिक मनामध्ये करू लागला. एवढ्यात भागाबाई त्याला बोलावण्याकरिता त्याच्या घरी आली व म्हणाली, “मोक्ष गुरू करण्याकरिता माझ्यासोबत अंजनगाव येथे चल.” यावर पुंडलिक उत्तरला, “अहो भागाबाई, मी काही अंजनगावास येत नाही. तुला जायचे असल्यास तू जावे. मी जे एकदा श्री गजानन महाराजांना गुरू मानले आहे, हा माझा निश्चय मी काही बदलणार नाही.” हे त्याचे बोलणे ऐकून भागाबाई अंजनगावास निघून गेली.
आता मुंडगावी. काय झाले ते पाहूया. झामसिंग राजपूत नावाचे मुंडगाव येथील गजानन महाराजांचे निस्सिम भक्त त्यावेळी शेगाव येथे महाराजांच्या दर्शनाकरिता गेले होते. ते परत येण्याकरिता निघाले असता महाराज बाळाभाऊंना म्हणाले, “या पादुका पुंडलिकाला देण्याकरिता याच्यापाशी (झामसिंग राजपूत) द्याव्या. समर्थांची अशी आज्ञा होताच बाळाभाऊंनी त्या पादुका झामसिंगाजवळ दिल्या आणि झामसिंग यांना असे सांगितले की, “तुमच्या गावी जे पुंडलिक भोकरे आहेत, त्यांना या पादुका पुजनाकरिता नेऊन द्याव्या.” ते ऐकून झामसिंग यांनी त्या पादुका घेतल्या आणि ते मुंडगावी येण्यास निघाले. झामसिंग मुंडगावच्या वेशीत पोहोचले, तेव्हा त्यांना पुंडलिक तिथे भेटला. समर्थांचे क्षेम-कुशल वृत्त विचारून त्याने झामसिंग यांना विचारले की, “महाराजांनी मला देण्याकरिता काही प्रसाद पाठविला आहे का?” असे पुंडलिकाचे बोलणे ऐकून झामसिंग यांना आश्चर्य वाटले. ते पुंडलिकास सोबत घेऊन आपल्या घरी आले व पुंडलिकास, “तू मला असे असे का विचारलेस?” असे वारंवार विचारू लगले. यावर पुंडलिकाने त्याला पडलेल्या स्वप्नाची गोष्ट झामसिंगास सांगितले. हे ऐकून झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली. त्यांनी शेगाव येथून आणलेल्या पादुका काढून पुंडलिकाजवळ दिल्या.
भक्तमंडळी, वाचकहो महाराजांनी स्वतः दिलेल्या या प्रसादी पादुका अजूनही मुंडगावात आहेत. तसेच तेथेदेखील या पादुकांचे भव्य आणि सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे. इथे विविध उत्सव, पालखी इत्यादी सुरू असतात. मुंडगावामधील भाविक भक्त नित्यनेमाने हे सर्व पार पाडत असतात. शेगावी येणे झाले असता हे मंदिर बघण्याकरिता मुंडगाव येथे अवश्य जावे.
गजानन विजय ग्रंथात उल्लेख असणारी मुंडगाव येथील भक्त मंडळी : पुंडलिक भोकरे, झामसिंग राजपूत, बायजाबाई तसेच हे संपूर्ण गावच महाराजांच्या भक्तीने परिपूर्ण आहे. अशा प्रकारे महाराजांनी पुंडलिक भोकरे या आपल्या भक्तास मार्गदर्शन करून प्रसादी पादुका त्याला पूजन करण्याकरिता दिल्या.
महाराजांच्या अशा अनेक लीला आणि भक्तांवर असणारी प्रीती ऐकून संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आठवतो आणि असेच मागणे आपणही मागावे असे वाटते : “न लगे मुक्ती आणि संपदा संत सांग देई सदा”.
क्रमशः
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra