मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (Indian premier league) म्हणजेच आयपीएलचे (ipl) पाच खिताब जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने (chennai super kings) गुरूवारी कमाल केली. सध्या आयपीएलचा कोणताही हंगाम सुरू नाहीये की संघाचे कोणते सराव सत्र सुरू आहे मात्र आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने जे केले ते अद्याप कोणत्याच संघाला जमलेले नाही.
धोनीबद्दल प्रचंड प्रेम
भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करतो. धोनीची लोकप्रियताच इतकी आहे की त्याची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरलेले असतात. महेंद्रसिंग धोनीने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आता तो आयपीएलमध्ये खेळतो. ४२ वर्षीय धोनीचा फिटनेस लेव्हलही काही कमी नाही. आता धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सला पसंती दर्शवणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे.
चेन्नईची कमाल, ट्विटरवर धमाल
चेन्नई सुपर किंग्स ट्विटरवर १० मिलियन म्हणजेच १ कोटी फॉलोअर्स असलेला पहिला संघ बनला आहे. त्यांनी गुरुवारी १ कोटींचा आकडा पार केला. युवा तसेच अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाने आयपीएलच्या गेल्या हंगामात जेतेपद पटकावले होते. त्यांनी फायनलमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सला मात देत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरले होते.
धोनीचे सर्वत्र कौतुक
धोनीने अनेक वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७मध्ये टी-२०चे आणि २०११मध्ये वनडेचे वर्ल्डकप जेतेपद मिळवले होते. धोनीच्या संयमी स्वभावाचे कौतुक सगळीकेच होत असते.