Monday, July 1, 2024
Homeताज्या घडामोडीChandrayaan-3 : चांद्रयान-३ चा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण; विक्रम लँडर मुख्य...

Chandrayaan-3 : चांद्रयान-३ चा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण; विक्रम लँडर मुख्य यानापासून झाला वेगळा

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष…

श्रीहरीकोटा : भारताच्या ‘इस्रो’ (ISRO) या अवकाश संशोधन संस्थेची चांद्रयान-३ (Chandrayaan-3) ही मोहिम भारताच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या मोहिमेचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या पार पडला असून चांद्रयान-३ लवकरच म्हणजे २३ ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे. मोहिमेसाठी ठरवल्याप्रमाणे आज चांद्रयान-३ च्या मुख्य यानाला जोडण्यात आलेला ‘विक्रम लँडर’ (Vikram lander) यानापासून वेगळा झाला. ‘इस्रो’च्या अधिकृत पेजने यासंबंधी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रावर प्रत्यक्ष उतरणारे ‘विक्रम लँडर’ हे मुख्य यानापासून वेगळे झाले आहे आणि आता त्याने मुख्य यानापासून काही अंतरावर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आहे. उद्या म्हणजे १८ ऑगस्टला लँडरची कक्षा आणखी कमी केली जाईल आणि ते आणखी चंद्राजवळ आणले जाईल. तेव्हा पुढील सर्व नियोजित टप्पे सुरळीत पार पडले तर येत्या २३ ऑगस्टला चांद्रयान-३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे, असं इस्रोने स्पष्ट केलं आहे.

चांद्रयान-३ चं १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरत्या प्रक्षेपण पार पडलं. १ ऑगस्ट रोजी चांद्रयानाने पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरु केला. चांद्रयान-३ द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. जर सॉफ्ट लँडिंग मिशन यशस्वी झाले तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर असं करणारा भारत हा चौथा देश ठरेल. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी चंद्रावर यशस्वीरीत्या उतरण्यापूर्वी अनेक अंतराळयान क्रॅश झाले होते. २०१३ मध्ये चांगई-३ मिशनच्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेला चीन हा एकमेव देश आहे. त्यामुळे भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -